राज ठाकरेंना कोण विचारतंय? भोजपुरी स्टारने ललकारले; जोरदार हल्लाबोल
छठ पूजेवरून महाराष्ट्रात पुन्हा राजकारण तापले आहे. रेल्वे स्थानकात छठची गाणी वाजवल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाले, त्यांना काँग्रेसचे समर्थन मिळाले. यावर भोजपुरी सुपरस्टार मनोज तिवारी यांनी राज ठाकरे व काँग्रेसवर जोरदार टीका केली. अशा कृतीमुळे त्यांचे राजकीय पतन होत असल्याचे तिवारी म्हणाले.

छठ पूजेवरून पुन्हा एकदा महाराष्ट्र तापला आहे. रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकांमध्ये छठची गाणी वाजवून आगीत तेल ओतण्याचं काम केल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाले असून काँग्रेसनेही राज ठाकरे यांचं समर्थन केलं आहे. हा वाद सुरू असतानाच आता त्यात भोजपुरी सुपरस्टार आणि भाजपचे खासदार मनोज तिवारी यांनी उडी घेतली आहे. मनोज तिवारी यांनी प्रकरणी काँग्रेस आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. अशा प्रकारच्या वागण्यानेच काँग्रेस आणि राज ठाकरे राजकीय दृष्ट्या कमकुवत होत आहेत, अशी टीका मनोज तिवारी यांनी केली आहे.
मनोज तिवारी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. अशा प्रकारच्या वागण्याने त्यांचं पतन होत आहे. हे लोक रसातळाला जात आहेत. महाराष्ट्रात या लोकांचं कोण ऐकतंय? यांना कोण विचारतंय? कोणताही मराठी माणूस या लोकांना महत्त्व द्यायला तयार नाहीये. त्याचं कारण त्यांची अशी कामे आहेत, अशी टीका मनोज तिवारी यांनी केली आहे.
फडणवीस महाभक्त
यावेळी मनोज तिवारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं. महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छठ पूजेची चांगली तयारी केली आहे. छठ पूजेनिमित्ताने राज्यातील लोकांमध्ये जोरदार उत्साह आणि समर्थन आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: छठ महापर्वाचे मोठे भक्त आहेत. या पावन पर्वासाठी व्रत ठेवणाऱ्या भक्तांसाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी व्यवस्था केली जात आहे, असं तिवारी यांनी म्हटलं आहे.
#WATCH | Delhi: On the Congress extending support to MNS chief Raj Thackeray’s social media post regarding Chhath Puja, BJP MP Manoj Tiwari says, “It is precisely this kind of behaviour that is leading them toward their own downfall. Who even pays any heed to these people in Maharashtra today? No Marathi Manus is willing to give them any standing, all because of these very actions. On the other hand, there is immense support for Chhath; in fact, the Chief Minister, Devendra Fadnavis, is a great devotee of the festival and is making all the necessary arrangements for those observing the Chhath fast.”
— ANI (@ANI) November 13, 2026
वाद वाढणार?
छठ पूजेच्या निमित्ताने राजकीय पक्षांमध्ये शाब्दिक तोफा झडत आहेत. व्होट बँकेसाठी राजकीय पक्षांकडून विरोध प्रतिविरोध सुरू आहे. एकीकडे मनसेने दिलेला इशारा आणि दुसरीकडे काँग्रेसकडून मनसेचं करण्यात आलेलं समर्थन यामुळे नवीन समीकरण निर्माण होणार का? अशी चर्चाही आता रंगली आहे. भाजपने काँग्रेसच्या या धोरणाला संधीसाधूपणा म्हटलं आहे. त्यामुळे आता हा वाद वाढणार की थांबणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
काय आहे वाद?
छठ पूजेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील उत्तर भारतीय लोक उत्तर प्रदेश आणि बिहारला जायला निघाले होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने त्यांच्यासाठी रेल्वे स्थानकात छठची गाणी वाजवली. त्याचे राजकीय पडसाद उमटले आहेत. मनसे आणि ठाकरे गटाने रेल्वेच्या या कृतीचा निषेध नोंदवला आहे. गाणी वाजवणं थांबवा, नाही तर मनसे स्टाईलने उत्तर देऊ असं मनसेने म्हटलं आहे. त्यानंतर राज ठाकरेंनी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात वाद निर्माण केला जात असून या जाळ्यात अडकू नका असं आवाहन मनसे कार्यकर्त्यांना केलं आहे. भाजप हा धर्म आणि जातीच्या नावावर राजकारण करत असतो. फोडा आणि राज्य करा ही त्यांची निती आहे. त्यामुळे भाजपने आता वेगळे मुद्दे घ्यावेत, अशी खोचक टीकाही राज ठाकरे यांनी केली होती.
