Sanjay Raut : डील कशी झाली? कुणाला किती कोटी मिळाले? संजय राऊतांनी मांडला हिशोब, मंत्रिपद आणि… काय काय ठरलं?

संजय राऊत यांनी ठाकरे गटातून फुटलेल्या सहा खासदारांवर जोरदार हल्ला चढवला आहे. कोट्यवधी रुपयांना विकले गेल्याचा आरोप करत राऊत यांनी त्यांना मिळालेल्या रकमेचा हिशोब मांडला. मंत्रिपदासाठी झालेल्या मारामारीचाही उल्लेख केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवरही त्यांनी निशाणा साधला, हे सर्व बेईमान असून जनतेने धडा शिकवावा, असे आवाहन केले.

Sanjay Raut : डील कशी झाली? कुणाला किती कोटी मिळाले? संजय राऊतांनी मांडला हिशोब, मंत्रिपद आणि... काय काय ठरलं?
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत
| Updated on: Jun 20, 2026 | 11:32 AM

ठाकरे गटातून सहा खासदार फुटल्याने खासदार संजय राऊत यांनी या सहाही खासदारांवर आगपाखड केली आहे. या खासदारांना कोट्यवधी रुपये मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे. पैशासाठीच हे खासदार फुटल्याचा दावाही त्यांनी केला आहे. राऊत यांनी या खासदारांना किती रक्कम मिळाली याचा हिशोबच मांडला आहे. तसेच हे खासदार आता बाटग्या सारखे एकनाथ शिंदेंच्या दारात बसणार असल्याचा हल्लाबोल केला आहे. मात्र, जनता या खासदारांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा पुनरुच्चारही त्यांनी केला आहे. संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते.

या गद्दारांना कितीमध्ये विकत घ्यायचं याची रक्कम समोर आली आहे. रोहित पवार यांनी 85 कोटीचा आकडा दिला. त्यापैकी 15-15 कोटी या खासदारांना दिल्लीत देण्यात आले. जयपूरला जाण्या आधी 10-10 कोटी दिले. या खासदारांमध्ये मंत्रिपदाची मारामारी सुरू झाली होती. एकच मंत्रिपद का? आम्हाला का नाही? असा सवाल काही खासदारांनी उपस्थित केला. त्यामुळे त्यांची ही मारामारी थांबवण्यासाठी परत प्रत्येकी 25 कोटी देण्यात आले. त्या 85 कोटीचा हिशोब वेगळा आहे. असं असेल तर कशी स्पर्धा करेल? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

प्रबोधनकार काय शिंदेंचे आजोबा होते का?

केवळ नावात बाळासाहेब असून चालत नाही, विचार महत्त्वाचा आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल भाषणात म्हणाले होते. त्यावरही राऊत यांनी जोरदार टीका केली. शिंदे गटाकडे कसला विचार आहे? प्रबोधनकार ठाकरे काय शिंदेंचे आजोबा आहेत का? प्रबोधनकारांनी काय शिंदेना मांडीवर खेळवलंय? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना खेळवलंय. कसले विचार सांगता? पैशामुळे लोक येतात आणि भाषणं ऐकतात. आम्हाला शिव्या घालायच्या त्या घाला. बोलत राहा, असा हल्लाच संजय राऊत यांनी चढवला.

शिंदे काय महान माणूस आहे का?

हा तर केवळ ट्रेलर आहे. पिक्चर अजून बाकी आहे, या शिंदे यांच्या विधानाचाही राऊत यांनी समाचार घेतला. ट्रेलर काय असतो? शिंदेंना एवढं गांभीर्याने का घेता? तो काही महान माणूस नाही. शिवसेनेतून बाहेर पडलेला बेईमान नेता आहे. शुभेंदू अधिकारींना काय सीरिअसली घेता? हे सर्व बेईमान आहे. ज्या थाळीत खाल्लं त्या थाळीत छेद केला. सत्ता आहे, तोपर्यंत ते बोलतील. सर्व निघून जाईल तेव्हा त्यांच्या अंगावर कपडे राहणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

भाजप उकिरड्यावर फेकेल

भाजपने एक गट फोडून गोळीबार सुरू केला आहे. चिखलफेक सुरू आहे. देशभरात भाजप हेच करत आहे. समोरच्यांना कळायला पाहिजे त्यांचा वापर होतो. गरज संपल्यावर तुम्हाला उकिरड्यावर फेकतील. आज ते तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचत आहेत. कारण ठाकरेंच्या शिवसेनेला त्रास द्यायचा आहे. आम्ही त्रास करून घेणार नाही. आमच्या चेहऱ्यावर दिसणार नाही, असंही ते म्हणाले.

 

Follow Us