आम्ही नक्कीच एकत्र…; ठाकरे बंधूंच्या एकत्र निवडणूक लढण्यावर संजय राऊतांचे सकारात्मक विधान
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. संजय राऊत यांनी अलीकडेच पत्रकार परिषदेत ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढवतील असा सूचक इशारा दिला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या या संभाव्य युतीने आगामी मुंबई महापालिका निवडणुकांना वेगळे वळण मिळाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. यामुळे सध्या विरोधी पक्षाकडून सत्ताधारी पक्षात इनकमिंग आऊटगोईंग सुरु आहे. तर दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र आल्याने राजकारणाला एक वेगळं वळण मिळाले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल २० वर्षांनी एकत्र आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन घडामोडी सुरु आहेत. त्यातच आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आगामी निवडणुका एकत्र लढणार का, असा प्रश्नही सातत्याने केला जात आहे. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक सूचक विधान केले आहे.
संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र निवडणुका लढवण्याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी थेटपणे भाष्य केले. आम्ही नक्कीच एकत्र लढणार आहोत, असे सूचक विधान संजय राऊत यांनी केले.
संजय राऊत काय म्हणाले?
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पुणे, नाशिकसह संभाजीनगर अशा अनेक महानगरपालिकांमध्ये आम्ही नक्कीच बहुमत प्राप्त करु हा आत्मविश्वास आमच्या कार्यकर्त्यांना नक्की आला आहे. आम्ही नक्कीच एकत्र लढणार आहोत. एकत्र निवडणुका लढण्याबद्दल दोन्ही ठाकरे चर्चा करत आहेत. उद्या उद्धव ठाकरे दिल्लीत येत आहेत. त्यानंतर परवा ७ ऑगस्टला ते तुम्हाला ११ वाजता भेटतील. तेव्हा तुम्ही याबद्दल त्यांच्याशी अधिक चर्चा करा, असे संजय राऊत म्हणाले. यावेळी संजय राऊत यांना राज ठाकरे इंडिया आघाडीत येतील का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर संजय राऊत यांनी हा पुढचा प्रश्न आहे, असे म्हटले.
मी आणि उद्धव ठाकरे २० वर्षांनी एकत्र येऊ शकतो तर…
दरम्यान काल मनसेचा मुंबईतील रंगशारदा सभागृहात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख केला. मी आणि उद्धव ठाकरे वीस वर्षांनंतर एकत्र येऊ शकतो. तर मग तुम्ही एकमेकांमध्ये वाद का ठेवता? मतभेद विसरा, एकत्र या आणि निवडणुकीच्या तयारीला लागा. मराठी अस्मितेसाठी मराठीचा मुद्दा घरोघरी पोहोचवा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते.
इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या राज्य सरकारच्या निर्णयानिमित्त दोन्ही ठाकरे बंधू वरळी डोम येथे 18 वर्षांनी एकत्र आले. 5 जुलै रोजी दोन्ही नेते एकाच मंचावर आले. तर दुसरीकडे 5 जुलै रोजीच्या विजयी मेळाव्यानंतर आज उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे आज मातोश्रीवर दाखल झाले. या वेळी दोन्ही भावांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाली. यामुळे या सर्व चर्चांना अधिकच बळ मिळत आहे.
