मी गेल्या वर्षी सांगितलं होतं यापुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल, आज उद्धव ठाकरे दिखामात भाषण करणार : संजय राऊत

महाराष्ट्राचा यापुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल, हा माझा आत्मविश्वास होता. हा आत्मविश्वास मला बाळासाहेबांनी दिला, असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले.

मी गेल्या वर्षी सांगितलं होतं यापुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल, आज उद्धव ठाकरे दिखामात भाषण करणार : संजय राऊत

मुंबई : “गेल्या वर्षी दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरुन मी स्वत: बोललो होतो की यापुढचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचा असेल. यंदाच्या वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दसरा मेळाव्याला दिमाखात संबोधित करतील. महाराष्ट्राचा यापुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल, हा माझा आत्मविश्वास होता. हा आत्मविश्वास मला बाळासाहेबांनी दिला”, असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याआधी त्यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. (Sanjay Raut On Cm Uddhav Thackeray)

“गेल्यावेळी मी जेव्हा यापुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल, असं म्हटलं त्यावेळी अनेक लोकांनी माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. आमच्या लोकांना देखील प्रश्न होता की हे कसं काय होईल? पण गेल्या वर्षभरापासून मी सांगतोय की सेनेचाच मुख्यमंत्री होणार. हा माझा आत्मविश्वास होता. हा आत्मविश्वास मला बाळासाहेबांनी दिला. बाळासाहेब नेहमी सांगायचे की चांगलं पेरत जा… चांगले विचार पेरत जा…. तेव्हा चांगली फळं येतात. भाजपने समजुतदारपणाने पावले टाकली असती तर त्यांच्यावर आजचा दिवस आला नसता”, असा चिमटा त्यांनी भाजपला काढला.

“सेनेला मुख्यमंत्रीपद मिळालं असतं तर भाजपचा सन्मान राहिला असता. आम्ही जी भूमिका त्यांना घ्यायला सांगत होतो ती त्यांनी आता बिहारच्या बाबतीत घेतली. नितीश कुमारांच्या जागा कमी असल्या तरी ते मुख्यमंत्री होतील, अशी भूमिका आता भाजपने घेतलीये. मात्र तीच भूमिका त्यांनी महाराष्ट्रात घेतली नाही. आम्ही निष्ठावंत जुने असून आमच्याबाबत सकारात्मक भूमिका नाही पण नितीशकुमार पेईंगगेस्ट जाऊन येऊन करतात. त्यांच्या बाबतीत भाजपने सकारात्मक भूमिका घेतली. मग त्याचा परिणाम महाराष्ट्रात होतो”, असं राऊत म्हणाले.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तोफ आज सावरकर सभागृहातून धडाडणार आहे. शेवटी मुख्यमंत्र्यांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र वर्षभरात शिवसेना आणि सेना नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. त्याला जशास तसे उत्तर मिळावं ही महाराष्ट्राची मागणी” असल्याचं राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे आज महाराष्ट्राच्या मनातलं बोलतील, असंही राऊत म्हणाले.

राजकारण म्हणून अंगावर याल तर खबरदार… आम्ही शमीच्या झाडावर शस्त्रं ठेवलेली नाहीत. आमच्या कंबरेलाच ही शस्त्रं आहेत, असं सांगतानाच आज आम्ही गुद्द्यांनीच प्रहार करू, असा इशारा संजय राऊत यांनी भाजपला दिला.

50 जणांच्या उपस्थितीत दसरा मेळावा

शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सायंकाळी 6.30 वाजता सहपरिवार शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला मानवंदना देतील आणि यानंतर ठीक 7 वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहातून त्यांच्या भाषणाला सुरुवात होईल. उद्धव ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून या मेळाव्याला संबोधित करतील. तसेच, शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक आणि प्रमुख नेते असे एकूण 50 जण उपस्थित राहणार आहेत.

(Sanjay Raut On Cm Uddhav Thackeray)

संबंधित बातमी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधकांना सडेतोड उत्तर देतील: अरविंद सावंत

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *