भाजपच्या एका निर्णयाने महाराष्ट्रातील राजकारणात मोठा भडका, संजय राऊतांनी थेट मुख्यमंत्र्यांना विचारला जाब
अंबरनाथमध्ये लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी तुषार आपटेच्या नियुक्तीवरून संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपच्या नैतिकतेचा अंत झाला असून जनतेच्या रोषामुळे सरकारला माघार घ्यावी लागली, असे राऊत म्हणाले.

अंबरनाथ नगरपालिकेत बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी तुषार आपटे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाली आहे. या नियुक्तीवरून संपूर्ण राज्यात संताप व्यक्त झाल्यानंतर भाजपने माघार घेतली. आता याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी खरमरीत टीका केली आहे. आपटेची झालेली निवड म्हणजे भाजपच्या नैतिकतेचा अंत आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले. यावेळी संजय राऊतांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेक गंभीर सवाल विचारले आहेत.
या लोकांकडे एवढं धाडस येतं कुठून?
संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. भाजपला असं वाटतं की जनता मूर्ख आहे आणि त्यांच्या सर्व पाप कर्मांना जनता मान्यता देईल. भाजपला असं वाटतंय की महाराष्ट्रात ‘हम करे सो कायदा’ मान्य केला जाईल. मात्र, जनतेचा रोष पाहून या आठवड्यात तिसऱ्यांदा सरकारला माघार घ्यावी लागली आहे. सुरुवातीला एमआयएमबरोबर युती केली आणि जेव्हा मोठा गोंधळ झाला, तेव्हा मुख्यमंत्र्यांना स्वतः समोर येऊन ही युती आमची नाही, असं सांगावं लागलं. त्यानंतर अंबरनाथमध्येच काँग्रेससोबत युती केल्यावरही तीच परिस्थिती ओढवली. आता लैंगिक अत्याचारातील एका संशयित आरोपीला राजकीय पद देताना यांचा हात थरथरला नाही. एवढी टीका होऊनही आणि जनतेत तीव्र संताप असतानाही निर्लज्जपणे आपटेला स्वीकृत नगरसेवक करण्यात आले. ज्याच्या विरोधात बदलापूर आणि अंबरनाथमध्ये जनआक्रोश निर्माण झाला होता, ज्याला अटक झाली होती, त्याला तुम्ही सन्मान देता? या लोकांकडे एवढं धाडस येतं कुठून? मी या मानसिकतेवर नक्कीच संशोधन करणार आहे, असे संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय
आपटे हा उघडपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करतो, असा दावा करत राऊत यांनी विचारले की, “निर्दोषत्व सिद्ध न होता अशा व्यक्तीला स्वीकृत नगरसेवक करण्याचे धाडस येते कुठून? हे लोक संघाचे कार्यकर्ते असतील किंवा त्यांनी भाजपला मदत केली असेल, म्हणून तुम्ही त्यांना ही बक्षिसी देता का? उत्तर प्रदेशात जो निर्लज्जपणा दिसला, तोच आता महाराष्ट्रात दिसत आहे. महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय, याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यायला हवे, अशी मागणीही संजय राऊतांनी केली.
अत्याचारातील आरोपींना सन्मान देण्यासारखे प्रकार
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर बोट ठेवताना राऊत म्हणाले की, भाजपचे लोक सध्या मोकाट सुटले आहेत. आम्ही काहीही केलं तरी आमचा बॉस वर्षा बंगल्यावर बसला आहे, तो आम्हाला पाठीशी घालेल, असा आत्मविश्वास या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे. त्यातूनच महिलांवरील अत्याचारातील आरोपींना सन्मान देण्यासारखे प्रकार घडत आहेत, अशी तोफ त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर डागली.
