
लाहोर, कराची , बलुचिस्तान वगैरे वगैरे आणि आता पीओके घेणार असं आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं. जर त्यांनी पीओके घेतला असता तर आम्हीच पंतप्रधान मोदींचा सत्कार केला असता असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चिमटा काढला. माध्यमांशी बोलताना विविध विषयांवर प्रतिक्रिया देतानाच राऊत यांनी मोदींवरही टीका केली.
7 तारेखला दिल्लीमध्ये राहुल गांधींनी त्यांच्या निवासस्थानी यूपीएची, इंडिया ब्लॉकची बैठक बोलावली आहे. आणि त्या बैठकीला सगळे प्रमुख नेते उपस्थित असतील. आता आमच्या बैठकीमुळे बहुतेक त्यांच्या (नरेंद्र मोदी) मनामध्ये भय निर्माण झालं, त्यामुळे मोदीजींनी आज एनडीएची बैठक बोलावली. त्यांचा हा जुना कार्यक्रम आहे. त्यामुळे आमच्या बैठकीवर परिणाम होणार नाही असं राऊत म्हणाले.
त्या आजच्या बैठकीत मोदींचा सत्कार होणार आहे, असंही मला कळलं, तो कशाकरता, सप्टेंबरमध्ये 75 वर्ष पूर्ण झाल्यावर मोदी रिटायर होत आहेत ? की आणखी कशाकरिता एनडीएची लोकं त्यांचा सत्कार करणार आहेत ? असा सवालही राऊतांनी विचारला.
आम्हीच सत्कार केला असता..
खरं म्हणजे ऑपरेशन सिंदूर थांबवलं नसतं, आणि मोदींनी वचन दिल्याप्रमाणे पीओके ताब्यात आलं असतं तर आम्ही सगळ्यांनीसुद्धा मोदींचा सत्कार नक्की केला असता, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला. देशातील पंतप्रधानांनी जे सांगितलं ते करून दाखवलं, आता पीओक घेणार असं राजनाथ सिंग म्हणाले, अमित शहा, मोदी म्हणाले. पण आम्हाला त्यांचा सत्कार करण्याची संधि मिळाली नाही याबद्दल आम्हाल दु:ख आहे अशी खोचक टीकाही राऊतांनी केली. मोदी घोषणा करून देशाचं वाटोळं करतात असा हल्ला राऊतांनी पंतप्रधानांवर चढवला.
कलम 370 वरून भाजप अपयशी ठरलं आहे
जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 हटवून काहीच बदललं नाही, 6 वर्षांत काश्मीरमध्ये काहीही बदललं नाहीये. भारतीय घटना जरी तिथे लागू झाली असली तरी तिथे भारतीय घटनेनुसार कोणतही काम होत नाही. भारतीय नागरिक तिथे जाऊन आजही जमीन खरेदी करू शकलेला नाही. मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचं जे स्वप्न मोदींनी दाखवलं होतं, ते आजही तिथे पूर्ण झालेलं नाही, काश्मीरच्या जनतेला, तरूणाना रोजगार मिळालेला नाही, तिथला हिंसाचार, दहशतवाद थांबलेला नाही ,22 एप्रिलला पहलगाममध्ये काय झालं हे आपण सर्वांनीच पाहिलं आहे. सरकार जरी तिथे लोकशाही मार्गाने निवडून आलं तरी त्या सरकारला कोणतेही अधिकार नाही, ते राज्य केंद्रशासित झालेलं आहे, त्याला पूर्ण राज्याचा दर्जा देणं आवश्यक आहे. 370 नंतर फक्त मोदी, शहा आणि त्यांच्या भाजपाने स्वत:चे ढोल वाजवून घेतले अशी टीकाहीव राऊतांनी केली.