संजय शिंदे आपलाच माणूस, घरच्या माणसाचा कधी पक्षप्रवेश असतो का? शरद पवार

बारामती : आपल्या राजकीय कारकीर्दीत खांद्याला खांदा लावून काम करणारांमध्ये अनेकजण होते. यात विठ्ठलराव शिंदे हेही होते, असं असताना जिल्ह्यात काही प्रमाणात वैचारिक मतभेद असू शकतात. त्यामुळे संजय शिंदे यांचा प्रवेश नसून ते आपल्या घरचे आहेत. त्यांच्याकडे आपण माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार म्हणून पाहतो, असं सांगत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष …

संजय शिंदे आपलाच माणूस, घरच्या माणसाचा कधी पक्षप्रवेश असतो का? शरद पवार

बारामती : आपल्या राजकीय कारकीर्दीत खांद्याला खांदा लावून काम करणारांमध्ये अनेकजण होते. यात विठ्ठलराव शिंदे हेही होते, असं असताना जिल्ह्यात काही प्रमाणात वैचारिक मतभेद असू शकतात. त्यामुळे संजय शिंदे यांचा प्रवेश नसून ते आपल्या घरचे आहेत. त्यांच्याकडे आपण माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार म्हणून पाहतो, असं सांगत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मामा शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली. याचवेळी त्यांनी उस्मानाबादमधून राणा जगजितसिंह पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याचं जाहीर केलं.

बारामतीतल्या आप्पासाहेब पवार सभागृहात संजय मामा शिंदे यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. याचवेळी त्यांच्या माढा लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारीची घोषणा शरद पवार यांनी केली. व्यासपीठावर विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार बबनदादा शिंदे, रश्मी बागल, संजीवराजे नाईक निंबाळकर, निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, दिपक साळुंखे, विश्वास देवकाते यांच्यासह माढा मतदारसंघातले सर्वच नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात भाषणाची सुरुवात करतानाच शरद पवार यांनी हा कार्यक्रम प्रवेशाचा कसा असू शकतो, अशी शंका उपस्थित केली. आपल्या राजकीय कारकीर्दीत सोलापूर जिल्ह्यातील अनेकांनी साथ दिली. त्यामध्ये विठ्ठलराव शिंदे यांचीही मोलाची साथ लाभली. त्यामुळे संजय शिंदे हे घरचे व्यक्ती आहेत. मध्यंतरी त्यांनी वैचारिक मतभेदांमुळे वेगळी भूमिका घेतली, मात्र त्यांनी आपला विचार बदलला नाही. त्यामुळे आज त्यांचा प्रवेश नसून त्यांना आपण माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून पाहत असल्याचं सांगत शरद पवार यांनी शिंदे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलं.

यावेळी बोलताना संजय शिंदे यांनीही आपण राष्ट्रवादीशी कधीच फारकत घेतली नसल्याने आजच्या कार्यक्रमाला प्रवेशाचा कार्यक्रम म्हणता येणार नाही, असं स्पष्ट केलं. मध्यंतरी मी राष्ट्रवादीपासून फारकत घेतली नव्हती. इतर कोणत्या पक्षाच्या जवळही गेलो नव्हतो. त्यामुळे आपण राष्ट्रवादीपासून दुरावलोच नसल्याचं त्यांनी नमूद केलं.

पवार आणि शिंदे कुटुंबात आजपर्यंत घरगुती संबंध राहिलेत. आमच्या कुटुंबातील प्रत्येक सुखदु:खात पवार कुटुंबीयांनी मोठी साथ दिली. त्यामुळे आमच्यात कधीच दुरावा नव्हता असंही त्यांनी सांगितलं. 2014 च्या निवडणुकीत आपण बाजूला झालो. मात्र त्यापूर्वी स्थानिक नेतृत्वाकडून होत असलेल्या चुकीच्या कामांवर आपण पत्राद्वारे आक्षेप नोंदवला होता, असं सांगत त्यांनी मोहिते पाटलांवर निशाणा साधला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *