पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला, पण 3 प्रश्नांचं गूढ कायम, एक उत्तर मिळताच…पोलिसांपुढे मोठं आव्हान!
सातारा डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणात शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. असे असले तरी डॉक्टर महिलेच्या मृत्यूबाबतचे काही प्रश्न अद्याप कायम आहे. या प्रश्नांचे गूढ नेमके कधी उलगडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Satara Phaltan Doctor Death Case : साताऱ्यातील फलटण येथे कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरचे आत्महत्या प्रकरण सध्या राज्यभरात चर्चेत आहे. या प्रकरणी निलंबित पीएसआय गोपाळ बदने आणि पोलिस अधिकारी प्रशांत बनकर यांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी केली जात आहे. याच डॉक्टर महिला मृत्यू प्रकरणी शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार डॉक्टर महिलेचा मृत्यू गळफास घेतल्याने झाला आहे. असे असले तरी एक गूढ मात्र अजूनही कायम आहे. त्याबाबत पोलीस तपास करत आहेत.
शवविच्छेदन अहवालात नेमकं काय आहे?
डॉक्टर महिला मृत्यू प्रकरणी शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. या अहवालात डॉक्टर महिलेचा मृत्यू हा गळफास घेतल्यानेच झाला आहे, असे नमूद करण्यात आले आहे. सोबतच डॉक्टर महिलेच्या शरीरावर इतरत्र कुठेही आघात झालेला नाही, असेही या अहवालात सांगण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर महिलेने आत्महत्या केली नसून तिचा खून करण्यात आला आहे, असा दावा केला जात होता. तशी शंका खुद्द डॉक्टर महिलेच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली होती. आता शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर तिचा मृत्यू गळफास घेतल्याने झाल्याचे समोर आले आहे.
कोणते गूढ अजूनही कायम?
डॉक्टर महिलेच्या मृत्यूचे कारण समोर आले असले तरी अजूनही बरेच प्रश्न कायम आहेत. या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचे आव्हा पोलिसांपुढे कायम आहे. डॉक्टर महिलेने आत्महत्या केली हे जरी मान्य केले तरी तिच्या आत्महत्येचे कारण काय होते? याचे ठोस पुरावे अजनूही समोर आलेले नाहीत. दुसरी बाब म्हणजे डॉक्टर महिला पीएसआय बदने आणि प्रशांत बनकर यांच्या संपर्कात होती. मग डॉक्टर महिलेचे या दोघांसोबत कोणत्या विषयावर संभाषण झाले होते. त्यांच्यात काही वाद झाले होते का? या प्रश्नांची उत्तरं अजूनही मिळालेली नाहीत.
तळहातावरील हस्ताक्षरांचं काय?
तिसरी बाब म्हणजे महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या तळहातावर सात ओळींचा एक संदेश लिहिण्यात आला होता. यात बदने आणि बनकर या दोघांची नावे होते. मात्र हे हस्ताक्षर डॉक्टर महिलेचे नसल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनीच केला आहे. याच हस्ताक्षराची तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आलेले आहे. याचाही फॉरेस्निक अहवाल अद्याप पोलिसांना प्राप्त झालेला नाही. त्यामुळे हस्ताक्षराचे गूढ अद्याप कायम आहे. भविष्यात या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.
