Honey village : शुद्ध मधासह रोजगारही मिळणार! महाबळेश्वरमधलं ‘मांघर’ होणार देशातलं पहिलं मधाचं गाव
महाबळेश्वरपासून आठ किमी अंतरावर असलेल्या डोंगरकड्यावरील मांघर गावातील 100 पैकी 80 कुटुंबे मधमाशा पालन करतात. या गावाच्या भोवती घनदाट जंगल असून वर्षभर फुलोरा असतो. गावात सामूहिक मधमाशांचे पालन केले जाते.

मुंबई : पर्टकांना चांगल्या प्रतीचा आणि शुद्ध मध मिळावा, तसेच रोजगारालाही चालना मिळावी याकरिता मधाचे गाव (Honey village) ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी गावाची निवडही करण्यात आली आहे. महाबळेश्वरमधील मांघर (Mahabaleshwar) या गावी ही अनोखी संकल्पना राबविण्यात येणार आहे. सामूहिक मधुमक्षिका पालनाच्या माध्यमातून मधाचे गाव अशी संकल्पना राबविणारे मांघर देशातील पहिलेच गाव असणार आहे. या योजनेचे उद्घाटन येत्या 16 मे रोजी उद्योगमंत्री सुभाष देसाई (Industry Minister Subhash Desai) यांच्या हस्ते होणार आहे. राज्याच्या अनेक भागात शेतीला पूरक म्हणून मधूमक्षिका पालनाचा व्यवसाय केला जातो. सध्याच्या घडीला राज्यातील 490 गावांमध्ये मधूमक्षिका पालन होते. त्यामध्ये 40 हजार मधपालक मधसंकलनाचे काम करतात. मधाचे गाव ही संकल्पना देशात प्रथमच राबविण्यात येत आहे.
व्यावसायिक पद्धतीने विकसित करणार मधुबन ब्रॅण्ड
मधुबन हा ब्रॅण्ड व्यावसायिक पद्धतीने विकसित करण्यात येईल. या योजनेचे देशातील इतर राज्येही अनुकरण करतील, अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली आहे. महाबळेश्वरपासून आठ किमी अंतरावर असलेल्या डोंगरकड्यावरील मांघर गावातील 100 पैकी 80 कुटुंबे मधमाशा पालन करतात. या गावाच्या भोवती घनदाट जंगल असून वर्षभर फुलोरा असतो. गावात सामूहिक मधमाशांचे पालन केले जाते. या भागात मधमाशांमुळे परागीकरण होऊन पिकांची उत्पादकता वाढल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे मधाचे गाव ही संकल्पना याच गावातून सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही ही संकल्पना राबविली जाणार आहे.
शुद्ध मधासह रोजगार मिळणार
उद्योग विभागाच्या अखत्यारीतील राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने मधाचे गाव ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी गावात मधपेट्या वितरित करण्यात येतील. शेतामध्ये मधपेट्या ठेवून त्या माध्यमातून मध गोळा केला जाणार आहे. त्यातून अत्यंत शुद्ध असा मध मिळून रोजगारालाही चालना मिळणार आहे. या योजनेचे उद्घाटन 16 मे रोजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते सकाळी अकरावाजता होईल. या कार्यक्रमास सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आदी उपस्थित राहतील.
