..अन् खोक्यानं असा लावला भाजपला चुना, सतीश भोसलेचा आणखी एक कारनामा समोर
खोक्या उर्फ सतीश भोसले हा फरार असून, आता त्याच्याबद्दल एक-एक कारनामे समोर येत आहेत. एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

सतीश भोसले उर्फ खोक्या याने शिरूर तालुक्यातील बावी गावचे रहिवासी असलेल्या बाप-लेकाला बेदम मारहाण केली, या घटनेत ते दोघं गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर खोक्या चांगलाच चर्चेत आला. आता त्याचे एक-एक कारनामे समोर येत आहेत. आजच पोलीस आणि वनविभागाच्या पथकाकडून त्याच्या घराची झडती घेण्यात आली. त्याच्या घरातून जनावरांचं सुकलेलं मांस आणि शिकारीसाठी वापरत असलेलं साहित्य जप्त करण्यात आलं आहे. त्यानंतर आता खोक्याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे, जातीची खोटी माहिती सांगून खोक्यानं भजपकडून पद मिळवल्याचं माहिती समोर आली आहे. याबाबत भाजपचे भटके – विमुक्त आघाडीचे बीड जिल्हाध्यक्ष डॉक्टर लक्ष्मण जाधव यांनी माहिती दिली आहे.
‘सतीश उर्फ खोक्या भोसलेनी तत्कालीन भाजपचे भटके – विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार यांना जातीची खोटी माहिती सांगून भाजप भटक्या विमुक्त युवा आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष पद घेतलं होतं. सतीश भोसले हा आदिवासी समाजाचा कार्यकर्ता आहे, तो अनुसूचित जमातीमध्ये मोडतो, भटकायुक्त प्रवर्ग वेगळा आहे. तरीसुद्धा त्याने चुकीची माहिती सांगून भटक्या विमुक्त प्रवर्गातून पद घेतलं होतं.
मला ते कळल्यानंतर 2021 सालीच मी त्याची पदावरून हाकालपट्टी केली होती, त्यानंतरही तो पक्षविरोधी कारवाई, खंडणी, अपहरण चुकीच्या गोष्टी करत असल्यामुळे त्याचा भाजप सदस्यात्वाचा राजीनामा देखील घेण्यात आला. माजी आमदार, भारतीय जनता पार्टीचे तत्कालीन भटके विमुक्त आघाडी प्रदेशाध्यक्ष नरेंद्र पावर यांना चुकीची जातीची माहिती सांगून त्याने पद घेतलं होतं, अशी माहिती यासंदर्भात भाजपचे भटके विमुक्त आघाडीचे बीड जिल्हाध्यक्ष डॉक्टर लक्ष्मण जाधव यांनी दिली आहे.
उद्या शिरूर बंद
दरम्यान खोक्या विरोधात आता तेथील ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहेत. उद्या शिरूरबंदची हाक देण्यात आली आहे. पोलिसांना अजूनही खोक्या उर्फ सतीश भोसले कसा सापडत नाही? असा सवाल येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता वातावरण तापण्याची शक्यता आहे.
