मारवाडी, जैन किंवा ब्राम्हण असाल तरच फ्लॅट मिळेल… मराठी माणसाला नाकारले मुंबईत घर, गंभीर आरोप, थेट..
मारवाडी, जैन किंवा ब्राम्हण असाल तरच फ्लॅट मिळेल अशी भूमिका भाईंदरमधील एका बिल्डरने घेतली. मराठी माणसाला फ्लॅट नाकारण्या आल्याचा आरोप करण्यात आलाय. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईमध्ये मराठी विरूद्ध परप्रांतीय असा वाद बघायला मिळतो. काही दिवसांपूर्वीच परप्रांतीय व्यापाऱ्याला मारहाण झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. हेच नाही तर मोठा मोर्चा काढत या मारहाणीचा निषेध करण्यात आला. या घटनेनंतर मनसे चांगलीच आक्रमक झाली. त्यामध्येच आता एक धक्कादायक घटना पुढे आलीये. भाईंदरमध्ये मराठी असल्याने फ्लॅट नाकारण्यात आला. जैन, मारवाडी किंवा ब्राम्हण असला तरच फ्लॅट मिळेल असे सांगण्यात आले. त्यामुळे आता पुन्हा एकदा वादाला तोंड फुटल्याचे बघायला मिळतंय. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा उपस्थित झाला. मारवाडी, जैन किंवा ब्राम्हण असाल तरच फ्लॅट मिळेल असे सांगण्यात आल्याचे रविंद्र खरात यांनी म्हटले.
मराठी असल्यानेच आपल्याला फ्लॅट नाकारण्यात आल्याचा आरोप रविंद्र खरात या तरूणाने केला. रविंद्र खरात याने म्हटले की, फ्लॅटच्या खरेदीसाठी माहिती घेण्यासाठी आम्ही गेलो होतो. भाईंदरमध्ये फ्लॅट बघण्यासाठी तिथे गेल्यावर आम्हाला समजले की, तिथे जैन, मारवाडी आणि फक्त ब्राम्हण लोकांनाच फ्लॅट दिली जातात. या स्कायलाईन प्रोजेक्टमध्ये आम्हाला स्पष्टपणे सांगितले की, तुम्ही जर मराठी असाल तर नॉनव्हेज खात असला तर..
त्यामध्येही तुमची जात ब्राम्हण, जैन किंवा मारवाडी नसेल तर तुम्हाला फ्लॅट दिला जाऊ शकणार नाही. अशा बिल्डरवर तात्काळ फाैजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, असे रविंंद्र खरात यांनी म्हटले आहे. मुंबईच्या अनेक सोसायट्यांमध्ये मराठी लोकांना फ्लॅट नाकारण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. मात्र, आता पोलिस या प्रकरणात नेमकी काय कारवाई करतात, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
अनेक वर्षांपासून मुंबईत मराठी माणसावर अन्याय केला जात असल्याचा दावा केला जातो. हेच नाही तर परप्रांतीयांचे मुंबईत येणारे लोंढे कमी व्हावेत अशीही मागणी केली जाते. मराठी माणसाला मुंबईत घर मिळत नसल्याचे सांगताना अनेक राजकीय लोक देखील दिसतात. त्यामध्येच आता मराठी माणसाला फ्लॅट देण्यासाठी बिल्डरने नकार दिल्याने मोठ्या वादाला तोंड फुटले आहे.
