26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याची प्रत्यक्षदर्शी देविका रोटावन हिने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव, शाहरुख खानसह रणवीर सिंह भावूक..
Shahrukh Khan And Devika Rotawan Eyewitness Of 26/11 Attack : 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात खळबळ उडाली. या हल्ल्याला काही वर्ष झाली आहेत. मात्र, आजही लोकांच्या मनावर या गोष्टी कोरल्या आहेत. नुकताच देविका रोटावन हिने 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर आयुष्य कसे बदलले हे सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये गेटवे ऑफ इंडिया येथे दिव्यज फाउंडेशनच्या वतीने ग्लोबल पीस ऑनर्स 2026 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शहीदांना वंदन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 26/11 मुंबई दहशतवादी हल्ला आपल्या डोळ्याने पाहणारी देविका रोटावन ही देखील यावेळी उपस्थित होती.देविका ही 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याची साक्षीदार आहे. देविका रोटावन हिच्यासोबत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याने संवाद साधला. 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात देविका रोटावन हिच्या पायाला गोळी लागली होती. तिनेच अजमल कसाबची ओळख पटवली होती. देविका हिने बोलताना म्हटले की, 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर तिचे बालपण हिरावून घेतले.
देविका आठवणी सांगत असताना शाहरुख खान आणि रणवीर सिंह भावूक झाले. देविका ही आपल्या वडिलांसोबत आणि भावासोबत मुंबईहून पुण्याला जाण्याकरिता सीएसएमटी स्थानकावर आली होती, त्यावेळीच दहशतवादी हल्ला झाला. त्यावेळी देविका ही अवघ्या 9 वर्षाची होती. या हल्ल्यानंतर तिच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शाहरुख खान याने प्रश्न विचारला की, रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर कोर्टात साक्ष देण्यासाठी बोलावण्यात आले.
वयाच्या 9 ते 10 वर्षात इतके मोठे धैर्य कसे दाखवले? यावर उत्तर देताना देविका हिने म्हटले की, माझ्या वडिलांनी सत्याचा मार्गावर चालण्याची शिकवण दिली. वडिलांच्या धैर्यामुळे मी कोर्टात साक्ष देण्याचा निर्णय घेतला. दहशतवादी हल्ल्यानंतर देशासाठी करायची काहीतरी इच्छा होती. मुंबई पोलिस, सैन्यदल आणि शूर अधिकाऱ्यांकडून प्रेरणा मिळाली. अनेक अडचणी आयुष्यात आल्या, बालपण हिरावून घेतले. तुकाराम ओंबाळे यांच्या शाैर्याचा उल्लेख देखील देविका हिने केला.
दहशतवादी हल्ला डोळ्याने बघितल्यानंतर मला मानसिक आणि शारीरिक समस्यांचा सामना करावा लागला. धमक्याही आल्या. काहींनी अपमानास्पद वागणूकही दिली. कुटुंबाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. वडिलांचा व्यवसाय बंद पडला. दहशतवाद संपवण्यासाठी आणि देशासाठी लढण्याचा मी निर्णय घेतला. देविकाचे बोलणे ऐकताना उपस्थित लोक भावूक झाले. शाहरुख खान देखील यावेळी भावूक होताना दिसला. तिने जुन्या आठवणीला उजाळा दिला.
