आधी अंतर, मग विरोधाची भूमिका अन् आता थेट साथ; मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिंदेसेनेच्या नेत्याचा पुन्हा यू-टर्न
Shahajibapu Patil On Mangesh Chivate: महायुतीतील उमेदवारीच्या घडामोडींना नवा ट्विस्ट आला आहे. शहाजीबापू पुन्हा चिवटेंच्या समर्थनात उतरले आहेत.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीत नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजप उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास महायुतीच्या मित्र पक्षांनी दांडी मारल्याचे दिसून आले आहे. भाजप उमेदवारांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे यांच्या शिवसेनेचा एकही नेता उपस्थित नव्हता. तर शिंदेसेनेकडून मंगेश चिवटे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अशातच आता शहाजीबापू पाटील यांचे एक वक्तव्य चर्चेत आले आहे. मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवरून ते वारंवार भूमिका बदलत आहे.
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यास फक्त भाजपचे नेते उपस्थित होते. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उद्या मंगेश चिवटे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे समोर आले आहे. आज पुणे पदवीधरसाठी स्मिता जाधव आणि पुणे शिक्षकसाठी कौतुभ गावडेंनी उमेदवारी अर्ज भरला आहे. तर मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीवर शहाजीबापूंचा यू-टर्न घेतला आहे.
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी यापूर्वी आक्रमक भूमिका घेणारे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी आता पुन्हा भूमिका बदलली आहे. शिक्षक मतदारसंघ शिवसेनेला मिळावा आणि मंगेश चिवटे यांना उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शहाजीबापू पाटील यांनी यापूर्वी जाहीर केले होते. मात्र काल त्यांनी आमचा पाठिंबा शिवसेनेला आहे. मंगेश चिवटे यांना नाही, अशी भूमिका घेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोबत जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते.
मात्र आता मंगेश चिवटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मी स्वतः जाणार, असे सांगत शहाजीबापूंनी पुन्हा भूमिका बदलली आहे. शिवसेनेच्या वतीने मंगेश चिवटे यांची उमेदवारी जाहीर झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र त्यांच्या बदलत्या भूमिकेमुळे ते चर्चेत आले आहे. याआधी मंत्री उदय सामंत यांनी यावर प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी यावर शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली होती.
ते म्हणाले होते की, पुणे शिक्षक मतदार संघावर आजही आमचा दावा आहे. आमचे उमेदवार मंगेश चिवटे हेच असतील. मंगेश चिवटे हे शिवसेना म्हणून अर्ज भरतील. भाजप देखील अर्ज भरेल. पण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे निर्णय घेतील. भाजपने कोणाला तिकीट दिले, हे त्यांचा अंतर्गत विषय आहे, असं उदय सामतांनी सांगितलं आहे.
