Sharad Pawar : पडळकरांची जीभ घसरली, शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना थेट फोन ! राष्ट्रवादी आक्रमक
गोपीचंद पडळकरांवरील कारवाईबाबात शरद पवार गट आक्रमक झाला आहे. ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात येणार असल्याची माहिती आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेवरून राज्यातील वातावरण पेटलं असून त्याचे सर्वत्र पडसाद उमटू लागले आहेत. याच संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. पडळकरांनी जयंत पाटील यांच्यावर टीका करताना वापरलेल्या शब्दांसंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.पडळकरांनी केलेल्या टीकेबद्दल पवारांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचे समजते. जयंत पाटील यांच्यावर झालेल्या टीकेनंतर राष्ट्रवादी पवार गटामध्ये मोठी नाराजी आहे, प्रचंड आक्रोश आहे, त्याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी थेट मुख्यमंत्री फडणवीसांना फोन लावला. “अशी टीका करणं योग्य नाही, बेताल वक्तव्य करणाऱ्यांना आवरा,” असं पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून सांगितल्याचे समजते.
गोपीचंद पडळकरांवरील कारवाईबाबात शरद पवार गट आक्रमक झाला आहे. ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात येणार असल्याची माहिती आहे.
ही महाराष्ट्राची संस्कृती नाही
गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्या वडिलांचाही अपमान केला. या आक्षेपार्ह वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटात प्रचंड नाराजी आहे, त्यचे पडसाद अनेक ठिकाणी उमटत आहेत. अरे जयंत पाटला तुझ्या सारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्यात कार्यक्रम करायची ती धमक आहे. तुझ्यासारखी ती अवलाद नाही. एवढ्या खालच्या लेव्हलला? आता माझा दांडीयाचा कार्यक्रम आहे. ये बघायला. तुझे डोळे दिपून जातील कार्यक्रम बघून, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली होती.
पडळकर आणि जयंत पाटील यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून संघर्ष सुरू आहे, ते एकमेकांवर टीकाही करत असतात, पण पडळकर यांनी टीका करताना अतिशय खालच्या थराची भाषा वापरली, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे नेते, कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत.
त्याच पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट फोन केला. त्यांच्या आमदारांनी केलेल्या कृतीचा शरद पवारांनी निषेध व्यक्त केला. ज्या खालच्या थराला जाऊन टीका होत आहे, ती काही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असं म्हणत पवारांनी नाराजी व्यक्त केली. अशा वाचाळवीरांना, खालच्या पद्धतीने टीका करणाऱ्यांना आवरा असंही शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे. यावर आता मुख्यमंत्री काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
