Amol Kolhe : ‘राऊत साहेबांना इतकं दु:ख झालं असेल, तर…’, अमोल कोल्हेंच ठाकरे गटाला प्रत्युत्तर
Amol Kolhe : शरद पवारांनी दिल्लीत शिवसेनेचे पक्ष प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मराठा पातशाहीचे धुरंधर नेतृत्व महादजी शिंदे यांच्या नावाने राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सत्कार केला. त्यावरुन महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. खासदार संजय राऊत यांनी आज घणाघाती टीका केली. त्याला आता शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिलं.

महाराष्ट्रातील दिग्गज नेते शरद पवार यांच्या हस्ते दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मराठा पातशाहीचे धुरंधर नेतृत्व महादजी शिंदे यांच्या नावाने राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. त्यावरुन महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार नाही तर त्यांनी जणू अमित शाह यांचा सत्कार केला आहे, असे आम्ही मानतो. हा महाराष्ट्र तोडणाऱ्या शाहांचा सत्कार आहे, अशी घणाघाती टीका राऊतांनी केली. त्यावर शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया आली आहे. “अशी टीका करणं हे दुर्देवी आहे. उलट आदरणीय पवारसाहेबांनी महाराष्ट्राच्या संस्कृत राजकारणाची परंपरा स्टेटसमनशीप जपली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होतय. पवारसाहेब या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत” असं खासदार अमोल कोल्हे म्हणाले.
“मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर हा कार्यक्रम होत असताना केवळ एकनाथ शिंदे साहेबच नाही आणि 14 ते 15 जणांचा सत्कार या कार्यक्रमात होता. कुठेतरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन सांस्कृतिक गोष्टी पहायला पाहिजेत असं मला वाटतं” असं अमोल कोल्हे म्हणाले. “राऊतसाहेबांना इतकं दु:ख झालं असेल, तर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा उल्लेख केला, उद्धव ठाकरे सुद्धा अजित पवारांना भेटले, आपण याला स्टेटसमनशिप म्हणून बघूया. प्रत्येकवेळी राजकारण आणलं तर अवघड होईल” असं अमोल कोल्हे म्हणाले.
‘हे उगाचच तुऱ्याला आरसा दाखवण्यासारखं’
“तुमचं दिल्लीतील राजकारण वेगळं असेल, आम्हालाही राजकारण कळतं पवारसाहेब असं संजय राऊत म्हणालेत” त्यावर अमोल कोल्हे म्हणाले की, “हे उगाचच तुऱ्याला आरसा दाखवण्यासारखं आहे. पवारसाहेबांच्या राजकारणाविषयी बोलण्याची फार कमी जणांची उंची आहे. शरद पवारांना किती राजकारण कळतं हे कुणी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. त्याही पलीकडे जाऊन मला असं वाटतं की, राजकारणात सुसंस्कृतपणा जपला पाहिजे”