Delimitation Bill: डिलिमिटेशनवर शरद पवार गटातच संभ्रम? पक्षाची भूमिका समजेना; चार खासदार शरद पवारांची भेट घेणार
Delimitation Bill Confusion Within Sharad Pawar NCP: डिलिमिटेशनवर शरद पवार गटातील खासदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ते शरद पवारांची भेट घेणार आहेत.

डिलिमिटेशन विधेयकावरून शरद पवार गटात संभ्रम निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. या विधेयकाला विरोध करायचा की पाठिंबा द्यायचा, याबाबत पक्षाची नेमकी भूमिका स्पष्ट होत नसल्याने शरद पवार गटातील तीन ते चार खासदार संभ्रमात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या खासदारांकडून पक्षाच्या भूमिकेबाबत फेरविचार करण्याची मागणी केली जाण्याची शक्यता आहे.
डिलिमिटेशन विधेयकावरून सध्या देशाच्या राजकारणात चर्चा सुरू आहे. या विधेयकाबाबत विविध राजकीय पक्षांकडून आपापल्या भूमिका मांडल्या जात आहेत. मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही खासदारांना अद्याप पक्षाची भूमिका नेमकी काय आहे, याबाबत स्पष्टता नसल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. विधेयकाला पाठिंबा द्यायचा की त्याला विरोध करायचा, यावरून खासदारांमध्ये संभ्रम असल्याची माहिती आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार गटातील तीन ते चार खासदार या मुद्द्यावर पक्षाच्या भूमिकेबाबत स्पष्टता मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. पक्षाने या विधेयकाबाबत घेतलेली भूमिका आणि खासदारांच्या मनातील प्रश्न यामध्ये तफावत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या खासदारांना थेट शरद पवार यांच्याशी चर्चा करून आपली भूमिका मांडायची आहे. त्यासाठी हे चारही नेते आज रात्री शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या भेटीत डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याच्या भूमिकेचा फेरविचार करण्याची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. विधेयकाला पाठिंबा द्यायचा की विरोध करायचा, याबाबत पक्षाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी अपेक्षा या खासदारांकडून व्यक्त केली जात असल्याचं समजतं. या खासदारांच्या भेटीनंतर शरद पवार काय भूमिका मांडतात आणि पक्षाच्या भूमिकेत काही बदल होतो का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
महाराष्ट्रात परिसीमन विधेयकावरून राजकीय गदारोळ तीव्र झाला आहे. तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना पत्र लिहून रोहित पवार यांनी प्रस्तावित परिसीमन विधेयकाला विरोध करण्याचे आणि संसदेत त्याच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन केले आहे. शरद पवार यांचा वैचारिक वारसा, पक्ष कार्यकर्त्यांची नाराजी आणि महाराष्ट्राचे राजकीय हितसंबंध यांचा हवाला देत, त्यांनी पक्ष नेतृत्वाला आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले आहे.
