Marathi Lit Festival Udgir : साहित्यकांचा रिमोट कंट्रोल ते महिला संमेलनाध्यक्ष, उदगीरच्या साहित्य संमेलनातलं शरद पवारांचं संपूर्ण भाषण

Marathi Lit Festival Udgir : समाजकारणी आणि राजकारणी यांच्या साहित्यातून विचारधारा जन्माला आली आणि विचारधारेतून अनेक वाद जन्माला आले.

Marathi Lit Festival Udgir : साहित्यकांचा रिमोट कंट्रोल ते महिला संमेलनाध्यक्ष, उदगीरच्या साहित्य संमेलनातलं शरद पवारांचं संपूर्ण भाषण
उदगीरच्या साहित्य संमेलनातलं शरद पवारांचं संपूर्ण भाषणImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 8:46 PM

उदगीर: समाजकारणी आणि राजकारणी यांच्या साहित्यातून विचारधारा जन्माला आली आणि विचारधारेतून अनेक वाद जन्माला आले, जसे की, गांधीवाद, मार्क्सवाद, आंबेडकरवाद, समाजवाद, राष्ट्रवाद वगैरे. परंतु आजकाल ठराविक विचारधारेला पोषक साहित्यनिर्मितीवर काही घटक भर देत आहेत. ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. प्रोपगंडा साहित्य निर्मिती ही निरंकुशतेला निमंत्रण देते आणि अराजकता ओढवते. हिटलरने (hitler) ‘माईन काम्फ’ पुस्तक आणि इतर माध्यमांद्वारे केलेला प्रोपगंडा ( मतप्रचार ) हे त्याचे भयानक उदाहरण आहे. आपल्या देशात देखील असा विशिष्ट विचारधारेचा प्रोपगंडा फैलावताना दिसतो आहे. साहित्यिकांनी आणि साहित्य रसिकांनी डोळ्यात तेल घालून दक्ष राहावे. साहित्य हे मुक्त असावे असे मी म्हटलो. याचा अर्थ ते कोणत्याही विचारधारेला ते बांधील नसावे. कारण अशा बांधिलकीतून मतप्रणाली तयार होते. ती बुद्धीभेद करणारी, ध्रुवीकरण करणारी, विषारी स्वरूपाची आणि राष्ट्रहिताला बाधा आणणारी असू शकते, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) म्हणाले. उदगीर येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात (marathi sahitya sammelan) ते बोलत होते. यावेळी त्यांनी साहित्यिकांचा रिमोट कंट्रोल ते महिला संमेलनाध्यक्ष यावर भाष्य केलं.

पवारांचं भाषण जसंच्या तसं

  1. आपल्या स्वर्गीय आवाजाने संपुर्ण जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीत विश्वात अजरामर झालेल्या स्वरसम्राज्ञी लतादिदींचे नाव संमेलन नगरीस दिले याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो. लतादिदींनी आपल्या अमृतमय कंठाद्वारे साहित्यातील गीत आणि काव्य प्रकाराला साज चढवला आणि कोट्यवधी रसिकांना मोहिनी घातली. साहित्यविश्वाने ह्याच ऋणानुबंधातून लतादिदींना दिलेली ही एक सार्थ आदरांजली आहे असे मी मानतो. मंगेशकर कुटूंबियाने हजारो गीते लिहिण्यासाठी कवी, गीतकारांना प्रेरीत केलं, ही गीते देखील साहित्याचा गुणगुणता येणारा अनमोल ठेवा आहे. ह्या उद्घाटनप्रसंगी मी लता दिदींना श्रद्धांजली अर्पित करतो. त्याचबरोबर मागील वर्षी प्रसिद्ध लेखक द.मा. मिरासदार व कवी सतीश कळसेकर मराठवाड्यातील साहित्यिक तु.शं. कुळकर्णी यांचेही निधन झाले. त्यांना सुद्धा ह्या साहित्यपीठावरून मी श्रद्धांजली अर्पण करतो.
  2. हे संमेलन मराठवाडयातील उदगीर ह्या ऐतिहासिक नगरीत होत आहे याचा मला विशेष आनंद आहे. निझाम आणि रझाकारांच्या जुलमी राजवटीत मराठी अस्मिता टिकवून ठेवणारे ह्या शहराचा तुम्हा आम्हाला अभिमान आहे. 40 वे मराठवाडा साहित्य संमेलन देखील ह्याच नगरीत झाले होते. मराठवाडा हा मराठी भाषा, संस्कृती आणि साहित्याचा आधारवड आहे असे कौतिकराव ठाले पाटील अभिमानाने सांगतात. मराठवाडा साहित्य परिषदेची स्थापना 1943 साली झाली तरी त्यापुर्वी पासून मराठवाड्यात साहित्य चळवळ मराठवाडयात सुरू होती.
  3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठी वाड्मय विभाग सुरू झाल्यावर अनेक साहित्यिक घडले. ज्येष्ठ समिक्षक प्रा. वा.ल.कुलकर्णी, डॉ.यू.म.पठाण, अनंत भालेराव, डॉ. सुधीर रसाळ, डॉ.गो. मा. पवार, डॉ. गंगाधर ना. धों. महानोर पानतावणे, नरहर कुरूंदकर, फ.मु.शिंदे, डॉ श्रीपाल सबनीस, डॉ. जनार्दन वाघमारे, लक्ष्मीकांत तांबोळी, दासू वैद्य, कादंबरीकार नरेंद्र नाईक अशा अनेक नामवंत साहित्यिकांनी मराठवाड्यात वाड्मयीन चळवळ पुढे नेली.साहित्य संमेलने दरवर्षी भरवली जातात आणि गेल्या काही वर्षांपासून अपवादाने एखादे संमेलन सोडल्यास माझी ह्या संमेलनाला हजेरी ही ठरलेली असतेच. हा प्रघात असाच चालू राहिला तर उद्घाटक म्हणून सर्वाधिक वेळा मान मिळाल्याचा एखादा वेगळा विक्रम माझ्या नावे प्रस्थापित व्हायचा. विनोदाचा भाग सोडला तर एक नक्की की मला साहित्य, कला, क्रीडा प्रकारांची आवड आहे.
  4. सार्वजनिक जीवनात सतत व्यग्र असलो तरी पुस्तक वाचनाचा छंद मी जोपासला आहे. पुस्तकांचा संग्रह करणे मला आवडते. इतकी पुस्तके संग्रही आहेत की, मला पुस्तक भेट देणाऱ्याने बऱ्याचदा माझ्या पुस्तकांच्या कपाटात येऊन दाखल झालेले पुस्तकच पुन्हा दिलेले असते. मला व्यग्रतेमुळे पुस्तक पुर्णत्वाने कधी-कधी वाचता येत नाही परंतू मी ते चाळून त्यातील आशय आत्मसात करतो. पुस्तकाचे सार लक्षात आले तरी ते मला संदर्भासाठी उपयोगी पडते. माझ्या संग्रही असणाऱ्या पुस्तकांकडे पाहिले असता मला जाणवते की, साहित्यातून काव्य कमी होत चाललंय. गेल्या वर्षी मी नाशिक येथील साहित्य संमेलनातील ग्रंथ प्रदर्शनाला भेट दिली. भेट धावती असली तरी माझी नजर दुकानांच्या कप्प्यांमधल्या पुस्तकांचा वेध घेत होती. पुस्तकामध्ये मला नव्याने प्रकाशित झालेले काव्यसंग्रह फारसे दिसलेच नाहीत. ग.दि.मा., कुसुमाग्रजांचा मी चाहता असल्याने ती उणीव मला प्रकर्षाने जाणवली. काव्यसंग्रह असतीलही परंतू प्रमुख प्रकाशन संस्था छापण्यासाठी पुढे येत नसाव्यात. काव्यसंग्रह प्रकाशनाच्या अर्थकारणाचं गणित जुळत नसावं असा माझा तर्क आहे.
  5. परंतु एकूणच ग्रंथ प्रकाशनाची व्यावसायिक बाजू फारशी उत्साहवर्धक नसावी. नवतंत्रज्ञान म्हणा, बदललेल्या सवयी म्हणा, परभाषेचे आक्रमण म्हणा, मनोरंजनाच्या साधनांची रेलचेल म्हणा, मराठी शिक्षणाकडे कमी होत चाललेला ओढा म्हणा ग्रंथ प्रकाशन संस्थांची आर्थिक परिस्थिती खालावत चालली आहे. हे चित्र निराशाजनक आहे. ते बदलणे गरजेचे आहे. साहित्यविश्वासमोर हे आव्हान काही नवे नाही. 11 मे 1878 रोजी न्या. महादेव गोविंद रानडे आणि लोकहितवादी अर्थात गोपाळ हरी देशमुख यांनी पहिले ग्रंथकार संमेलन या नावाने साहित्य संमेलन भरवले. त्यावेळी देखील ग्रंथकारांसाठी पुस्तक प्रकाशन जिकीरीचे होते.
  6. त्यामुळे हे संमेलन प्रामुख्याने ग्रंथकारांना ग्रंथ प्रसिद्ध करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्या माध्यमातून विद्येचा लाभ बहूतांशी समाजास व्हावा ह्या हेतूने भरवले गेले. त्यात दरसाल किमान पाच रूपयांचे ग्रंथ विकत घेणारे सहा हजार वाचक तयार व्हावेत असे आवाहन देखील करण्यात आले होते. थोडक्यात सांगावयाचे झाल्यास त्याकाळी राजाश्रय नव्हता आणि लोकाश्रयाशिवाय नवनवीन साहित्य प्रकाशित होणे जिकीरीचे होते.
  7. माझी साहित्यरसिकांना विनंती आहे की आपल्या सहकार्याशिवाय साहित्यरथ धावणार नाही. साहित्यरथाची लोकाश्रय आणि राजाश्रय हे दोन चाके आहेत असे मी मानतो. प्राचिन इतिहासात डोकावले की लक्षात येते की, विक्रमादित्य, हर्षवर्धन, यशोवर्मन आदी राजांच्या पदरी अनुक्रमे कालिदास ,बाणभट्ट अशी श्रेष्ठ रत्ने होती. छत्रपती शिवरायांच्या दरबारी कवी भूषण, संभाजीराजांच्या पदरी मित्र कवी कलश अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. अगदी मुस्लीम राज्यकत्यांनी देखील भारतीय कलाकारांना दरबारी आश्रय दिला. अल्लाऊद्दीन खिल्जी, अकमर त्यातील काही उदाहरणे आहेत. पण राजाश्रय असलेल्या कवी-लेखकांना व्यवस्थेला आव्हान करणारे लिखाण करण्यावर येत. साहित्यिक अंगाने त्यांचे साहित्य उच्चकोटीतील आहे ह्यात शंका नाही. परंतु समाजव्यवस्था बदलण्या इतकी धार त्यांच्या लेखणीत नसे. त्यांची लेखणी सार्वभौम व स्वायत्त नव्हती.
  8. लेखक-विचारवंत विद्याधर गोखले यांनी म्हटले की लोकाश्रयापेक्षा राजाश्रयाच्या हत्तीवरील अंबारीत जर आम्ही साहित्य शारदेला बसवू लागलो तर ‘अमृतातेहि पैजा जिंके’ असे बोल तिच्या वीणेतून कसे उमटतील? थोडक्यात साहित्यिकांच्या हाती राजकर्त्यांवर अंकूश हवा पण राज्यकर्त्यांच्या हाती साहित्यिकांचा रिमोट कंट्रोल असू नये. साहित्याची ताकद खऱ्या अर्थाने राज्यक्रांतीवेळी दिसून आली. फ्रेंच राज्यक्रांतीमुळे जगाला समजले की, लेखणी ही क्रांतीची मशाल होऊ शकते. रूसो, व्हॉल्टेअर यांच्या तत्वज्ञानाने क्रांतीचा परिपोष केला. सामान्यांनी वर्गव्यवस्था लाथाडली आणि सोळाव्या लुईची जुलमी राजवट उलथवली. यावरून एक बोध घेता येतो की, हस्तिदती मनोऱ्यातील साहित्यात सामर्थ्य नसते तर ते समाजाभिमूख असले तरच त्यात शक्ती येते.
  9. मराठी साहित्याबाबतीत बोलायचे झाले तर दुसऱ्या बाजीरावाच्या काळात साहित्याला अवकळा आली. त्यानंतर ब्रिटिश राज्यकर्त्यांनी नोकर निर्माण करण्यासाठी शिक्षणाला मोकळीक दिली परंतू साहित्यावर अनेक बंधने लादली. विष्णूशास्त्री चिपळूणकरांची निबंधमाला स्वातंत्र्यवीर सावरकरकृत मॅझिनीचे चरित्र, खाडीलकरांची भाऊबंदकी आणि किचकवध नाटके यांवर ब्रिटिशांनी बंदी आणली. त्यामुळे 1878 साली न्या. रानडे आणि लोकहितवादी यांनी संमेलन भरवण्याच्या दृष्टीने उचललेले पाऊल तसे क्रांतीकारक होते. कारण त्या संमेलनाच्या दोन महिन्यापूर्वी ब्रिटीश राज्यकर्त्यांनी देशी वृत्तपत्र स्वांतत्र्याची गळचेपी करणारा व्हर्न्याक्यूलर प्रेस कायदा पास केला होता. त्याला ह्या दोहोंनी एकप्रकारे आव्हानच दिले होते. साहित्य आणि राजकारण यांचा तसा अतूट संबंध आहे. महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडीत जवाहरलाल नेहरू, स्वातंत्र्यवीर सावरकर, यशवंतराव चव्हाण हे उत्तम साहित्यिक होते. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर लोकशाही राज्यव्यवस्था स्थापीत झाल्यावर अभिव्यक्ती, प्रसारमाध्यम अथवा साहित्य हा लोकशाहीचा चौथा स्तंभ गणला गेला. राज्यकर्त्यांकडून त्याला राजाश्रय मिळाला. हा आश्रय ग्रंथ प्रकाशनास प्रोत्साहन, साहित्यिकांना निवासे, मानधन पुरस्कार या रूपाने दिला जाऊ लागला आणि आजही दिला जात आहे.
  10. अगदी विधीमंडळाचे सदस्य करणे, पद्म पुरस्कारासाठी निवड करणे येथपर्यंत साहित्यिकांना प्रोत्साहन दिले जाते. मला वाटते की, आश्रयदात्यांनी ह्या प्रोत्साहन आणि मदतीचा उपयोग आपल्या कौतुकासाठी अथवा स्वार्थासाठी वापर करू नये. मला वाटतं लोकशाहीचा हा चौथा स्तंभ आहे. तो जिवंत राहावयास हवा. लेखन सार्वभौम आणि स्वतंत्र हवं. दुर्गा भागवत म्हणतात की लेखन मेलं तर विचार मेला आणि विचार मेला की संस्कृतीचा क्षय होऊन विकृती जन्माला येते. जगाच्या इतिहासाकडे पाहिले तर एक लक्षात येते की, राजे, राज्यकर्त्ये जातात पण ग्रंथ चीरकाल राहतात. लेखणीतून क्रांती घडली आहे. त्यामुळे साहित्यिकांनी राज्यकर्त्यांच्या ओंजळीने पाणी पिऊ नये. राज्यकर्ते कोणतेही उपकार करत नाहीत, ते त्यांचे कर्तव्य आहे.
  11. साहित्यिकांमध्ये आणि राज्यकर्त्यांमध्ये परस्पर समन्वयाचे आणि स्नेहभावाचे नाते असावे असे मला वाटते. प्रस्तुत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री. भारत सासणे हे लोकशाहीच्या कार्यकारी मंडळ ह्या लोकशाहीच्या स्तंभात एक सनदी अधिकारी होते. त्यामुळे शासन आणि साहित्यिक यांमधील समन्वय आणि स्नेहभाव वृद्धींगत होत राहील याचे आशादायी मला दिसते. मी देखील अनेक वर्षे लोकशाहीच्या पहिल्या स्तंभाचे प्रतिनिधित्व करतो आहे. माझा देखील साहित्यिकांशी स्नेहभाव कायम राहिला. ‘साहित्य म्हणजे प्रेम, जे माणसांना जोडते!’ इतकी सोपी व्याख्या मधु मंगेश कर्णिकांनी केली आहे. मला ती खूप भावते. साहित्यिकांकडून मला खूप मोलाच्या सूचना मिळतात. मी त्यांकडे गांभिर्याने पाहतो.

शरद पवार यांच्या भाषणातील महत्वाचा मुद्दा :

  1. समाजकारणी आणि राजकारणी यांच्या साहित्यातून विचारधारा जन्माला आली आणि विचारधारेतून अनेक वाद जन्मला आले, जसे की, गांधीवाद, मार्क्सवाद, आंबेडकरवाद, समाजवाद, राष्ट्रवाद वगैरे!
  2. परंतु आजकाल ठराविक विचारधारेला पोषक साहित्यनिर्मितीवर काही घटक भर देत आहेत. ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. प्रोप गंडा साहित्य निर्मिती ही निरंकुशतेला निमंत्रण देते आणि अराजकता ओढवते.
  3. हिटलरने ‘माईन काम्फ’ पुस्तक आणि इतर माध्यमांद्वारे केलेला प्रोपगंडा ( मतप्रचार ) हे त्याचे भयानक उदाहरण आहे. आपल्या देशात देखील असा विशिष्ट विचारधारेचा प्रोपगंडा फैलावताना दिसतो आहे.
  4. साहित्यिकांनी आणि साहित्य रसिकांनी डोळ्यात तेल घालून दक्ष राहावे. साहित्य हे मुक्त असावे असे मी म्हटलो. याचा अर्थ ते कोणत्याही विचारधारेला ते बांधील नसावे. कारण अशा बांधिलकीतून मतप्रणाली तयार होते. ती बुद्धीभेद करणारी, ध्रुवीकरण करणारी, विषारी स्वरूपाची आणि राष्ट्रहिताला बाधा आणणारी असू शकते.
  5. साहित्यिकांनी समान अंतरावर राहून त्याकडे त्रयस्थाप्रमाणे पाहावयास हवे. राज्यकर्ते असा प्रोपगंडा (मतप्रचार ) थेट करीत नाहीत. त्यांनी साहित्य अथवा माध्यमाची कमकुवत अंगे न्याहाळली आहेत.
  6. प्रसारमाध्यमांच्या बाबतीत त्यांनी अत्यंत हुशारीने कॉर्पोरेट जगाची मदत घेऊन हा प्रोपागंडा राबवणे सुरू केले आहे. चित्रपट ह्या कलाक्षेत्रात त्याचा उघड-उघड झालेला शिरकाव आपणास दिसतो आहेच.
  7. कॉर्पोरेटचे छत्र हे प्रोपागंडाचे अस्त्र होऊ पाहते आहे. हे कॉर्पोरेटीकरण साहित्यात झाले, तोट्यात असलेल्या प्रकाशन संस्था त्यांनी ताब्यात घेतल्या की, चौथा स्तंभ समूळ कोसळण्यास वेळ लागणार नाही. ह्या धोक्याच्या घंटेकडे मी आग्रहाने आपले लक्ष वेधू इच्छितो.
  8. साहित्य आणि राजकारण यांचे अतूट नाते असल्याने साहित्यविश्वात देखील राजकारणाचा शिरकाव झाला आहे. विशेषतः संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड निवडणूक पद्धतीने सुरू झाल्यानंतर साहित्यिकांच्या अंतरंगात आमच्यातील राजकारणी घुसू लागला आहे. त्याचा अत्याधिक तोटा महिला साहित्यिकांना संभवतो.

महिला अध्यक्षपदावर भाष्य :

  1. आजपर्यंतच्या साहित्य संमेलनांचा आढावा घेतला असता दिसून येते की, पहिले साहित्य संमेलन इ.स. १८७८ मध्ये भरले तरी महिलेला अध्यक्षपदाचा मान मिळण्यासाठी १९६१ साल उजाडावे लागले. कुसुमावती देशपांडे या विदुषीला तो पहिल्यांदा मान मिळाला. त्यानंतर श्रीमती दुर्गा भागवत, कवयित्री शांता शेळके, डॉ. विजया राजाध्यक्ष अशा थोडक्या महिलांना साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान भुषवता आले.
  2. चक्रधरस्वामींच्या महानुभाव पंथातील आद्य कवयित्री महदंबा ते जनाबाई, मुक्ताबाई तसेच सावित्रीबाई फुले, बहिणाबाई चौधरी, रमाबाई रानडे, लक्ष्मीबाई टिळक ते अरुणा ढेरे-संजिवनी तडेगावकरांपर्यंत असंख्य महिलांनी मराठी साहित्यात आपला अवीट ठसा उमटवला आहे. अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रथा असल्याने महिलांसाठी ते अशक्यप्राय होऊ नये असे मला वाटते. महामंडळाने निवडणूक पद्धतीत एखादे महिला समावेशक धोरण आणले तर त्याचे मी प्रथम स्वागत करील.
  3. मला वाटते महामंडळाच्या घटनेत सुधारणा करून संमेलनाच्या अध्यक्षपदी दर पाच वर्षातून किमान एकदा तरी महिलाध्यक्ष नियुक्त व्हावी अशी तरतूद व्हावी. आज महिला धोरणाचा पुरस्कारकर्ता म्हणून मी येथे उभा राहिलो याची चर्चा साहित्य संमेलनात झाली तर त्याचा मला आनंदच आहे. शेवटी मला एका वेगळ्या विषयाकडे लक्ष वेधावयाचे आहे. मला साहित्यात संशोधनात्मक लिखाणाची वाणवा जाणवते. संशोधनात्मक लिहिले जात असेल परंतू ते वाचकांपर्यंत पोहोचत नसावे. विशेषतः ऐतिहासिक लिखाणात सखोल संशोधन व अभ्यास आवश्यक असतो.
  4. इतिहासकाराने सबळ पुराव्याधारे न लिहिता ऐकीव व तार्कीक माहितीधारे लिहिणे हा मोठा प्रमाद आहे. तो अनेक दीर्घकालीन वाद-विवादांना जन्म देतो. असे लेखन वेळीच रोखले पाहिजे. नाहीतर जनमाणसांत त्या चूका मूळ धरू लागतात आणि ठाण मांडून बसतात. अशा वृत्तींना ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर !” असा रोखठोक सवाल विचारावयास हवा. कयास आणि कल्पनाविलास करण्यासाठी इतर फिक्शनल साहित्य प्रकार आहेत. अशा प्रवृत्तींच्या लेखकांनी त्यासाठी लेखणी पाजळावी. मराठीत पि.एच.डी. करताना विषय देखील संशोधना योग्य असावा. संदर्भग्रंथांचे संकलन करून प्रबंध केलेले पाहावयास मिळतात. सखोल संशोधनाचा त्यात अभाव आढळतो.
  5. विद्यापीठांना विनंती आहे की, पी.एच.डी. साठी विषय देताना तो संशोधनक्षम असावा केवळ संकलनक्षम नसावा • याची दक्षता घ्यावी. सखोल संशोधनानंतर निर्माण झालेले साहित्य माहितीचे नवे भांडार ठरू शकते. आजच्या उद्घाटनप्रसंगी मी स्पष्ट बोललो. परंतू ज्ञानगंगेचा प्रवाह कोणत्या दिशेला जाऊ शकतो हे माझ्या मनाला जाणवले आणि बुद्धीला पटले म्हणून लोकशाहीच्या एका स्तंभाचा पाईक या नात्याने आपल्यापुढे माझी भुमीका मांडली. साहित्य संमेलनाचा एक हेतू विचारांचे अभिसरण आणि जन जागरण हा देखील असतो. मी ते कर्तव्यभावनेने केले आहे. साहित्य संमेलनात अनेक वाद-परिसंवाद रंगतील, काव्याच्या मैफली बसतील, लोकरंजनाचे कार्यक्रम होतील. मला खात्री आहे की, सारस्वतांचा हा मेळावा देखील साहित्यरसिकांच्या मनावर आपला ठसा उमटवील. संमेलनाचे आयोजक, साहित्यिक, प्रकाशक, समन्वयक, महामंडळाचे पदाधिकारी आणि साहित्य रसिकांना संमेलनाच्या यशस्वीतेसाठी माझ्या मनपुर्वक शुभेच्छा ! धन्यवाद.

संबंधित बातम्या:

Marathi Lit Festival Udgir: विदूषकांपासून सावध रहा, मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणेंची पंतप्रधान मोदींवर नाव न घेता टीका

बया काय तो थाट ‘मुंबई पब्लिक स्कूल’चा ! लई डिमांड ! 5 दिवसांत तब्बल 11 हजार 500 पेक्षा अधिक नवीन प्रवेश

Udhav Thackeray Vs Rana : इकडे कुणी हिंमत करणार नाही, मुख्यमंत्री मातोश्रीवरून थेट शिवसैनिकांत, राणांविरोधात ‘रात्र’ जागवण्याचा महिला सैनिकांचा शब्द

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....