Raj Thackrey : आमच्यासोबत या… शिंदे गटाच्या बड्या नेत्याने दिली राज ठाकरेंना ऑफर; महाराष्ट्रातील राजकारणात घडामोडींना वेग

शिंदे गटाने राज ठाकरेंना युतीची ऑफर दिल्याने महाराष्ट्रातील राजकारणात नवीन वळण आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर ही ऑफर दिली गेली. यामुळे मनसे कोणत्या गटासोबत जाईल का? याबाबत तर्कवितर्क रंगले आहेत. उद्धव ठाकरे गटाला टोला लगावत शिरसाट यांनी राज ठाकरेंना शिंदे गटासोबत युती करण्याचे आवाहन केले आहे.

Raj Thackrey : आमच्यासोबत या... शिंदे गटाच्या बड्या नेत्याने दिली राज ठाकरेंना ऑफर; महाराष्ट्रातील राजकारणात घडामोडींना वेग
raj thackrey
| Updated on: Jun 12, 2025 | 1:11 PM

राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका अजून चार महिन्यावर आहेत. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील एका हॉटेलात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने या घडामोडींना अधिकच वेग आला आहे. त्यामुळे मनसे महायुतीत जाण्याची चर्चा रंगली आहे. मात्र, यावर भाजप आणि मनसेकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. या चर्चा सुरू असतानाच शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी थेट राज ठाकरेंना शिंदे गटासोबत युती करण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे राज ठाकरे हे भाजपसोबत जाणार, शिंदे गटासोबत जाणार की उद्धव ठाकरे गटासोबत जाणार? याची चर्चा रंगली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी थेट राज ठाकरे यांना युतीची ऑफर देऊन चर्चेचा धुरळा उडवला आहे. राज ठाकरे यांना यापूर्वीही आम्ही ऑफर दिली होती. आजही आमची राज ठाकरे यांना आमची सोबत येण्यासाठी ऑफर आहे. राज ठाकरे हे चांगल्या पद्धतीने महानगरपालिकेची निवडणूक लढू शकतात. त्यांनी आमच्या सोबत यायला पाहिजे, असं संजय शिरसाट यानी म्हटलं आहे.

ठाकरेंना टोला

कोण काय बोलतो. यापेक्षा युती कुणाशी होते, कुणासोबत होते हे पाहणं महत्त्वाचं आहे. उबाठा गटाची भूमिका काय आहे हे कळत नाही, शरद पवार त्यांच्यासोबत नाही, काँग्रेस त्यांना विचारत नाही, असा टोला शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

राज आणि फडणवीसच बोलतील

राज ठाकरे हे दरवेळी जेव्हा भेटतात तेव्हा त्यांची कामं असतात. काही सूचना असतात. पुढची राजकीय परिस्थिती काय असेल त्यावर आता भाष्य करणे योग्य होणार नाही. या भेटीवर राज ठाकरे किंवा मुख्यमंत्री हे खुलासा करतील, अशी सावध प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

काहीही होऊ शकतं

दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का? यावरही शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. राजकारणात यूटर्न अनेक वेळा पाहायला मिळतात. पण जोपर्यंत युती होत नाही, तोपर्यंत बोलता येत नाही. जे काही होईल ते काही दिवसात समजेलच. मात्र राजकारणात काही होऊ शकतं, असं सूचक विधान त्यांनी केलं.

राज ठाकरेंचं नाव खराब होऊ शकतं

दरम्यान, शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनीही राज-मुख्यमंत्री भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील असं वातावरण जेव्हा निर्माण झाला होतं, त्यावेळी सर्वसामान्य माणसाच्या मनात सुद्धा आत्मियतेची भावना निर्माण झाली होती. ठाकरे कुटुंबात मोठ्या प्रमाणात कटूता होती. भाजपच्या नेत्यांना राज ठाकरे भेटत असतील तर त्यांच्या बाजूने झालेलं वातावरण क्लुषित होईल. दोन ठाकरे बंधु एकत्र येण्याच्या वातावरणाच्या फायदा मनसेने भाजपसोबत वाटाघाटीसाठी केला का? असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडेल. राज ठाकरे यांचं नाव याने खराब होऊ शकतं, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.