मंत्री दीपक केसरकर यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, पडद्यामागे ठाकरे-मोदी एकत्र येण्याच्या हालचाली?
मंत्री दीपक केसरकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे नेमक्या काय घडामोडी सुरु आहेत? याबाबत सध्याच्या घडीला अंदाज बांधणं कठीण होऊन बसलं आहे. एकीकडे महाविकास आघाडीला एक्झिट पोलमध्ये सर्वाधिक जागांवर यश मिळवल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्याबाबत मोठा दावा केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा एकत्र येतील का? याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री तथा शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. “उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी पुन्हा एकत्र येणार की नाही यावर मी बोलणार नाही. पण निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींची वेळ मागितली होती”, असा मोठा गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केला. त्यामुळे पडद्यामागे नेमकं काय-काय घडत आहे? असा प्रश्न दीपक केसरकर यांना विचारण्यात आला. “वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी हा प्रश्न उपस्थित केला. ठाकरे मोदींवर व्यक्तीगत बोलले. त्यांना माफी मिळणार की नाही ते माहिती नाही. ज्याप्रकारे भाषणं झाले ते योग्य नव्हते. मोदींचं यश वैयक्तिक आहे. मोदींची सुप्त लाट महाराष्ट्रात असल्याने आम्ही लोकसभेत 41 जागा सुद्ध मिळवू. पडद्यामागे काय घडेल ते सांगता येत नाहीत. पण इथे शिवसेनेचं नेतृत्व हे एकनाथ शिंदेच करतील”, असं दीपक केसरकर म्हणाले.
“आमदार एकनाख खडसे यांच्यावर बोलणार नाही. कारण ते वरिष्ठ नेते आहेत. अनेक फॅक्टर कारणीभूत आहेत”, असं दीपक केसरकर म्हणाले. “खोटा प्रचार झाला की राज्यघटना बदलली जाणार, याला लोक बळी पडली. पण आम्हीच आघाडीवर राहू. मी जुना शिवसैनिक नाही. नवीन आलेला शिवसैनिक आहे”, असं दीपक केसरकर यावेळी म्हणाले.
दीपक केसरकर एक्झिट पोलवर काय म्हणाले?
“एक्झिट पोलने वर्तवलेले आकडे मला मान्य नाहीत. काही वृत्तपत्राचं नेटवर्क राज्यात आहे, ज्यांनी आम्हाला 35 जागा दाखवल्या आहेत. तर 12 जागा या महाविकास आघाडीला दाखवल्या आहेत. आम्हाला 35 जागा मिळतील. मोदी लाट होती. याचा फरक दिसेल. काही ठिकाणी फतवे निघाले. याचा फायदा काही प्रमाणात उद्धव ठाकरेंना मिळेल. तिकीट वाटप करताना 5 जागांवर आम्ही तिकीट उशिरा दिल्या. नाशिकच्या जागेवरही उशिर झाला. या चुका भविष्यात होणार नाहीत”, अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली.
“मराठा आंदोलनाचाही फटका बसलाय. दोन्ही बाजू नाराज झाल्या. समाजात नाराजी होती. ह्या जखमा भरल्या की यश निश्चित आहे. बाळासाहेबांनी ज्यांना जागा दाखवली त्यांनीच फतवे काढले. आपल्याला लोकांचा सपोर्ट मिळाला नाही म्हणून ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे पळ काढत आहेत. खासदार संजय राऊत देशातील सर्वात विद्वान आहेत”, असा टोला दीपक केसरकर यांनी लगावला.
