Sanjay Raut : वर्धापन दिनानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, ओमराजे, आष्टीकर आणि संजय पाटलांना उद्देशून म्हणाले, शेणातील किडे अखेर…
शिवसेना ठाकरे गटातून ६ खासदार फुटल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पक्षाच्या ६० व्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरेंनी बंडखोरांवर जोरदार टीका केली. आज सकाळी संजय राऊतांनी ओमराजे निंबाळकर व एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला चढवला, 'शेणातील किडा शेणात गेला' असे म्हणत राऊतांनी बंडखोरांना सुनावले. या फुटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे.

शिवसेना ठाकरे गटातून 6 खासदार फुटल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली. तीन वर्षांत पक्षात दुसऱ्यांदा फूट पडल्यानंतर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. गेल्या तीन चार दिवसांपासून सुरू असलेल्या या ऑपरेशन टायगर नाट्याच्या दरम्यानच काल शिवसेनाचा 60 वा वर्धापन दिन साजरा झाला. ठाकरे गटाचा वर्धापन दिनाचा सोहळा षण्मुखानंद सभागृहात तर शिंदे गटाचा मेळावा नेस्को सेंटरमध्ये पार पडला. कालच्या मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर कडाडून टीका केली. पक्षाशी बेईमानी, गद्दारी करणाऱ्यांना त्यांनी खडेबोस सुनावले.
दरम्यान कालच्या मेळाव्यात संजय राऊत यांचे मात्र भाषण झालं नाही. पण आज सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत 6 खासदारांची बंडखोरी आणि एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला चढवला. ओमराजे हा भंपक माणूस आहे असे म्हणत, ओमराजे गेले. आष्टीकर गेले, जाऊ दे ना.. शेणातील किडा शेणात गेला अशी घणाघाती टीका राऊतांनी केली.
तो भंपक माणूस
काल षण्मुखानंद हॉल येथे झालेल्या या सोहळ्यात उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं होतं. आपण बंगल्यात बसून असतो. बाहेर जाऊन फिरत नाही. उद्धव ठाकरे कोणाला भेटत नाहीत अशा होणाऱ्या टीकेवर उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं. उद्धव ठाकरे भेटत नाही. आदित्य फिरत नाही, म्हणता, मी भेटत नव्हतो तर गधड्या तू निवडून कसा आला, असा सवाल त्यांनी ओमराजे यांना विचारला होता.
उद्धव ठाकरेंच्या कालच्या टीकास्त्रानंतर आज संजय राऊत यांनीही ओमराजे निंबाळकरांवर आणि इतर बंडखोरांवर जोरदारा हल्लाबोल केला. ‘ओमराजे हा भंपक माणूस आहे. राजे शब्द काढवा का हा हे चंदनशिवे म्हणाले. त्यांची भाषणे ऐका. मी ग्रामसेवक नव्हतो, सरपंच नव्हतो. उद्धव ठाकरेंनी मला उभं केलं, राजकारणात मोठं केलं, मी त्यांना कधी सोडलं नाही. सोडलं तर धाराशिवच्या लोकांनी मला जोड्याने मारावं. मी धाराशिवच्या प्रचारसभेत तीन दिवस होतो. उद्धव ठाकरेंनी ९४ सभा घेतल्या. कुणी घेतल्या एवढ्या सभा कुणासाठी. एक जागा चोरली. ती बाई दलाल होती. त्यांनी त्यांचं ऐकलं. ओमराजे गेले. आष्टीकर गेले. जाऊ द्या ना. शेणातील किडा शेणात गेला.’ अशा शब्दांता राऊतांनी त्यांच्यावर प्रहार केला.
एकनाथ शिंदेंनाही सुनावलं
शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंनी ठाकरे गट आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. मी डॉक्टर नसलो तरी मोठमोठी ऑपरेशन्स करतो, असं म्हणत त्यांनी ठाकरे गटाला डिवचलं होतं, त्यावर राऊतांनी आज चोख प्रत्युत्तर दिलं. ‘ तुम्हाला एकनाथ शिंदे म्हणजे यशवंतराव चव्हाण वाटले का ?. त्यांच्या विचाराच्या डायऱ्या घेऊन येता आणि इथे प्रश्न विचारता’. ‘ ते आज उपमुख्यमंत्री आहेत, उद्या नसतील. एकेकाळी अजितदादांकडे ही ताकद होती. नंतर राहिली नाही. शिंदेही आज आहेत उद्या नसतील, राजकारणात म्हणतो’, असंही राऊतांनी सुनावलं.