मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाकडून आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या या नेत्याला थेट पक्षप्रवेशाची ऑफर
राज्यात सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, लवकरच महापालिका निवडणुका देखील जाहीर होण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पक्षांतरला देखील वेग आला आहे, दरम्यान आता शिवसेना ठाकरे गटाकडून अजित पवार गटाच्या नेत्याला पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली आहे.

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक आयोगानं आधी जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार अनेक ठिकाणी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान झालं आहे. मात्र काही ठिकाणी काही कारणांमुळे या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे, आता निवडणूक आयोगाच्या सुधारीत निवडणूक कार्यक्रमानुसार येत्या 20 डिसेंबर रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 21 डिसेंबर रोजी राज्यातील सर्वच नगर परिषदा आणि नगर पंचायत निवडणुकांची मतमोजणी होणार आहे. दरम्यान त्यानंतर राज्यात लगेचच महापालिका निवडणूक देखील होण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता पक्षातंराला देखील वेग आल्याचं पहायला मिळत आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वात जास्त इनकमिंग भाजपमध्ये होत आहे. याचा फटका जरी सर्व पक्षांना बसत असला तरी देखील त्याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना शिंदे गटाला बसला आहे. यावरून शिवसेना शिंदे गट नाराज असल्याची देखील माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाची साथ अनेक नेत्यांनी सोडली आहे. त्यांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे आता शिवसेना ठाकरे गटाकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांना पक्षात प्रवेश करण्याची ऑफर देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत घडामोडींमुळे रुपाली ठोंबरे पाटील या राष्ट्रवादी अजित पवार गटावर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. त्यातच आता त्यांना शिवसेना ठाकरे गटाचे पुणे शहराध्यक्ष गजानन थरकुडे यांनी ठाकरे गटात प्रवेश करण्याची ऑफर दिली आहे. रुपाली ठोंबरे यांनी आमच्या पक्षात प्रवेश केला तर त्यांचं स्वागत करू असं त्यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले थरकुडे?
काही दिवसापूर्वी रुपाली ठोंबरे पाटील यांनी फेसबुक पोस्ट केली होती, यामध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांच्या सोबतचा फोटो पोस्ट केला होता. रुपाली ठोंबरे पाटील यांनी जर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात येण्याचा निर्णय घेतला तर आम्ही त्यांचे स्वागतच करू. मात्र सर्वस्वी निर्णय हा रुपाली ठोंबरे पाटील यांचा असेल, असं त्यांनी म्हटलं आहे.
