सिंदूर रक्षणासाठी ज्यांनी युद्धाची विमाने उडवली ते मोदी आता…, शिवसेनेचा हल्लाबोल
शिवसेना ठाकरे गटाने उरी, पठाणकोट, पुलवामा आणि पहलगाम हल्ल्यांनंतर भाजपने केलेल्या राजकारणाची कठोर टीका केली आहे. पहलगाम हल्ल्यातील बळींना न्याय मिळाला नसल्याचा आरोप करत, त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर' ला भावनिक राजकारण म्हटले आहे.

उरी, पठाणकोट, पुलवामा आणि पहलगामचे दहशतवादी हल्ले हे मोदी काळात झाले. या सर्व हल्ल्यांचे राजकारण करून भाजपने मते मागितली, पण जे हुतात्मा झाले त्यांना खरा न्याय कधीच मिळाला नाही, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे. ऑपरेशन सिंदूर हे केवळ एक भावनिक राजकारण असून, पहलगाम हल्ल्यातील बळींच्या कुटुंबियांना अद्याप न्याय मिळालेला नाही, असा घणाघात ठाकरे गटाने केला.
शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तापत्राच्या अग्रलेखातून शिवसेनेने पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात २४१ लोकांचा बळी गेला. यामुळे देश शोकसागरात बुडालेला असताना पंतप्रधान मोदी सायप्रस दौऱ्यावर गेले. तेथील लोकांशी हसतमुख फोटो काढले. यावरून ठाकरे गटाने मोदींवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान मोदींना सायप्रस देशाचा सर्वोच्च पुरस्कार मिळाला. तो गळ्यात घालून ते भारतात परत येतील तेव्हा 26 लाडक्या बहिणींच्या पुसल्या गेलेल्या सिंदूरची आठवण त्यांनी ठेवावी, असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे.
ऑपरेशन सिंदूर आणि बदललेली भूमिका
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू करणारे मोदी आता शांतीची भाषा बोलत आहेत यावर शिवसेनेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “युद्ध चांगले नाही, ही युद्धाची वेळ नाही” असे सायप्रसमध्ये मोदींनी म्हटले. त्यांच्या या भूमिकेतील बदलाचे श्रेय अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिले पाहिजे. कारण ट्रम्प यांनीच पाकिस्तानविरुद्धचे दहशतवादाविरोधातील युद्ध थांबवले, असा खोचक टीका ठाकरे गटाने केली.
मनी लॉण्डरिंग प्रकरणात भाजप विरोधकांवर कारवाया झाल्या, पण दहशतवादी मोकाट आहेत. ‘एफएटीएफ’साठी हासुद्धा तपासाचा धागा असायला हवा. भारतात दहशतवादी हल्ले, अपघात, मृत्यू यांचे राजकारण केले जाते. उरी, पठाणकोट, पुलवामा आणि पहलगामचे दहशतवादी हल्ले हे मोदी काळात झाले. या सर्व हल्ल्यांचे राजकारण करून भाजपने मते मागितली, पण जे हुतात्मा झाले त्यांना खरा न्याय कधीच मिळाला नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’ या नावामागेही एक भावनिक राजकारण आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात ज्यांच्या कपाळावरचे सिंदूर पुसले, त्या लाडक्या बहिणींचा बदला पूर्ण झाला काय हे सायप्रस मुक्कामी शांती राग आळवणाऱ्या पंतप्रधान मोदींनी स्पष्ट करायला हवे. 26 महिलांच्या कपाळावरचे ‘सिंदूर’ पुसणाऱ्या त्या चार अतिरेक्यांचा शोध मोदी-शहांचे सरकार अद्यापि लावू शकले नाही. या चार अतिरेक्यांना पकडून दिल्लीच्या इंडिया गेटसमोर गोळ्या घातल्याशिवाय पहलगामचा बदला पूर्ण होणार नाही, अशी मागणी शिवसेनेने केली.
या सगळ्याला जबाबदार इथले मोदींचे सरकार
‘एफएटीएफ’ने पहलगाम हल्ल्यामागे आर्थिक पाठबळाचा हात असल्याचे म्हटले आहे. शेंबडे पोरही सांगेल की, पैशांशिवाय असे हल्ले शक्य नाहीत. कश्मीरातील दहशतवाद हा पैशांवरच पोसला गेलेला आहे. एखाद्यावर हल्ला, खून करण्यासाठी ज्या ‘सुपाऱ्या’ दिल्या जातात, त्यामागे अर्थकारण असते. भाजप पैशांचा वापर करून, अर्थपुरवठा करून ज्या प्रकारे आमदार, खासदार फोडते, त्याच पद्धतीने पैशांचा वापर करून अतिरेकी पोरांना हल्ले करायला पुढे केले जाते, पण या सगळ्याला जबाबदार इथले मोदींचे सरकार आहे, असा घणाघात ठाकरे गटाने केला.
ते मोदी आता शांतीची कबुतरे सोडतात…
दहशतवाद्यांचा अर्थपुरवठा रोखण्यासाठी मोदींनी नोटाबंदी केली, पण त्यात सामान्य जनता भरडली गेली आणि अतिरेक्यांच्या कारवाया थांबल्या नाहीत. दहशतवाद्यांना अर्थपुरवठा होत असेल तर त्यासाठी गृह मंत्रालय जबाबदार आहे. सिंदूर रक्षणासाठी ज्यांनी युद्धाची विमाने उडवली ते मोदी आता शांतीची कबुतरे सोडीत आहेत, अशी टीका ठाकरे गटाने केली.