देवाचाच चमत्कार… गॅलरीत खेळत होता… बहिणीची नजर चुकवली अन् एका क्षणात काळजाचा थरकाप उडाला; सव्वा वर्षाच्या चिमुकल्यासोबत काय झालं?
Kolhapur News : देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथं आला आहे. या ठिकाणी एक मुलगा पहिल्या मजल्यावरून खाली पडला, मात्र तो चमत्कारिकरित्या बचावला आहे.

देव तारी त्याला कोण मारी असं म्हटलं जातं. याचाच प्रत्यय कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथं आला आहे. केवळ नशीब बलवत्तर म्हणून सव्वा वर्षाचा श्रीवंश प्रवीण लव्हटे गॅलरीतून पडून देखील चमत्कारिकरीत्या बचावला आहे. नवसाच्या श्रीवंशला कुटुंबाने फुलासारखं जपलं आहे, पण रविवारी लव्हटे कुटुंबासाठी काळ बनून आलेली वेळ, नशीब बलवत्तर म्हणूनच माघारी परतल्याने लव्हटे कुटुंबाने देवाचे आभार मानले आहेत. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
श्रीवंश खेळताना गॅलरीतून खाली पडला
कोल्हापुरातील कोतोली येथील ही घटना आहे. प्रवीण पांडूरंग लव्हटे यांचा सव्वा वर्षाचा श्रीवंश हा एकुलता मुलगा घराच्या गॅलरीत खेळत होता. त्याने बहिणीची नजर चुकवून खाली पाहण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नात तो गँलरीतून खाली कोसळला. ही घटना प्रत्यक्षपणे पहाणार्यांचा या वेळी अक्षरश: थरकाप उडाला. दैव बलवत्तर म्हणून श्रीवंशच्या डोक्याला किरकोळ दुखापत वगळता तो सुखरूप बचावल्याने देवतारी त्याला कोण मारी म्हणीचा नागरीकांना प्रत्यय आला.
श्रीवंशच्या विविध तपासण्या करण्यात आल्या
अचानक घडलेल्या प्रसंगाने आई जयश्री अक्षरश: भांबावून गेली. या घटनेनंतर तेथील लोकांनी बाळाला घेऊन रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयात श्रीवंशचे एक्स-रे आणि स्कॅनिंगसह सर्व तपासण्या करण्यात आल्या. बाळाची तब्ब्येत चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगताच आई-वडिलांसह सर्व नातेवाईकांच्या डोळ्यात पाणी तराळले होते. मात्र आता तो सुखरूप असल्याचे समोर आले आहे.
घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यात श्रीवंश गॅलरीतून खाली पडताना दिसत आहे. तो खाली पडताच जवळचे लोक त्याच्याकडे धावले आणि त्याला उचलले. यानंतर लगेच त्याला रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्या चाचण्या केल्यानंतर तो सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे आता पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दैवी चमत्कारामुळे श्रीवंशचा जीव वाचला असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
