
चोरी करताना चोर अनेक गोष्टींची काळजी घेत असतो. चोरी करण्यापूर्वी त्या ठिकाणची योग्य माहिती काढणे, तेथील सर्व गोष्टींची पाहणी अशा अनेक गोष्टी करत असतो. पण सध्या एक असे प्रकरण समोर आले आहे ज्यामध्ये मध्यरात्री महिला रस्त्यावर डोक्यावर हंडे घेऊन फिरताना दिसत होत्या. सीसीटीव्ही फुजेच पाहिल्यानंतर पोलिसांना देखील धक्का बसला आहे. आता नेमकं काय घडलं चला जाणून घेऊया…
जुन्नर तालुक्यातील एका भांडी विक्रेत्याच्या गोडाऊनमधून २ लाख रुपयांच्या ९० तांब्याच्या हंड्यांची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. या चोरीमागे महिलांची टोळी असल्याचे उघडकीस आले असून, स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा छडा लावला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन महिलांना शिताफीने अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीचा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्रकरण काय आहे?
जुन्नरमधील महाजन आळी येथे राहणारे आनंद सासवडे यांचा भांड्यांचा मोठा व्यवसाय आहे. शुक्रवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गोडाऊनचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि केवळ तांब्याचे ९० हंडे चोरून नेले. इतर महागड्या वस्तूंकडे दुर्लक्ष करून फक्त तांब्याच्या हंड्यांवर लक्ष केंद्रित केल्याने ही चोरी विशेष चर्चेत आली होती.
तिघींवर गुन्हा दाखल
चोरी झाल्याचे समजताच सासवडे यांनी तत्काळ जुन्नर पोलिसांत तक्रार दाखल केली. स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासताना काही महिलांना हंडे घेऊन जाताना पाहण्यात आले. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना कळाले की, जुन्नरमधील पंचलिंग वस्ती येथील सारिका मकवाने, अंजली वाघमारे आणि सुरेखा वालेकर या तिघींनी ही चोरी केली होती.
पोलिसांनी कुरण फाटा परिसरात सापळा रचून या तीनही महिलांना अटक केली. पोलिसी चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. चोरीला गेलेल्या ९० हंड्यांपैकी ५५ हंडे पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केले आहेत. या घटनेमुळे जुन्नर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घरफोडी आणि चोरीच्या घटनांमध्ये महिलांचा वाढता सहभाग पाहून स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत.