Video : अशी वटसावित्री पौर्णिमा पाहिलीच नसणार? परंपरेला छेद देत केली पौर्णिमा
Vat Savitri : राज्यात शनिवारी सर्व महिला वटसावित्री पौर्णिमा साजरी करत आहेत. दिवसभर उपवास करुन सात जन्म हाच पती मिळू दे म्हणून प्रार्थना करत आहेत...परंतु सिंधुदुर्गमध्ये जरा वेगळीच वटपौर्णिमा केली जात आहे. त्याचे कौतूकही होत आहे.

महेश सावंत, सिंधुदुर्ग : सनातन धर्मात विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाला वटसावित्री व्रत (Vat Savitri 2023) करतात. या दिवशी, महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी, दिवसभर निर्जल उपवास करतात. यामुळे पती-पत्नीच्या नात्यात गोडवा येतो. सात जन्म हाच पती मिळू दे म्हणून प्रार्थनाही करतात. परंतु सिंधुदुर्गमध्ये वटसावित्री वेगळ्याच पद्धतीने साजरी केली जाते.
काय होते सिंधुदुर्गमध्ये
संपूर्ण राज्यात वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. यावेळी महिला वडाची पूजा करत दिवसभर उपवास करत आहेत. सिंधुदुर्गात मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्गात गेल्या चौदा वर्षांपासून पुरुषांकडून वटपौर्णिमा साजरी केली जाते आणि जन्मोजन्मी हीच पत्नी लाभू दे… अशी प्रार्थना केली जाते. कुडाळ येथे गेल्या 14 वर्षांपासून वटपौर्णिमेला पुरुषमंडळी महिलांप्रमाणे यथासांग विधिवत वडाची पूजा करतात. वडाला फेऱ्या मारून वटपौर्णिमा साजरी करतात. नेहमी पत्नीनेच व्रत करायचं या रुढीला छेद देत पुरुषांच्या या अनोख्या धाडसी पावलाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
पुरुषांनी केली वटसावित्री पोर्णिमा pic.twitter.com/JsEtGbnTzL
— jitendra (@jitendrazavar) June 3, 2023
का करतात पुरुष पूजा
कुडाळमध्ये महिलांप्रमाणे पुरुषांनीही वटपौर्णिमा साजरी केली. कुडाळ शहरातील पुरुष मंडळी महिलांप्रमाणेच वटपौर्णिमा साजरी करतात. आपल्या पत्नीला दीर्घायुष्य मिळावं तसेच जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी, स्त्रीचा सन्मान व्हावा आणि आपल्या पत्नीवरील प्रेम अधिकाधिक वृद्धिंगत व्हावं यासाठी हे पुरुष वटपौर्णिमा साजरी करतात. हे व्रत पाळल्याने वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी येते अशी धार्मिक मान्यता आहे. देशाच्या काही भागात ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी वट सावित्री व्रत पाळले जाते.
वट सावित्री व्रताचे महत्त्व
पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी वट सावित्रीचे व्रत ठेवते. धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत केल्याने पतीच्या सर्व अडचणी दूर होतात. वट सावित्रीच्या आख्यायिकेनुसार या व्रताच्या प्रभावामुळे सावित्री देवीचा पती सत्यवानाला मृत्यूची देवता यमराजाने जीवनदान दिले. याशिवाय हे व्रत ठेवल्याने वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्यांपासूनही सुटका मिळते. वट सावित्री व्रताच्या दिवशी वट म्हणजेच वटवृक्षाची पूजा केली जाते.
