संध्याकाळ होताच या गावात रडण्यास मनाई, महाराष्ट्रातलं हे अनोखं गाव कोणतं ?
महाराष्ट्रातील प्रत्येक गावाची काही ना काही खासियत आहे, त्यांचं असं काही वेगळेपण आहे, त्यामुळे ती प्रसिद्धही होतात. पण आपल्याच राज्यात एक असं गाव आहे जिथे संध्याकाळ झाल्यावर टिपं गाळायला म्हणजेच रडायला हो... परवानगी नाही. असं का बरं ? चला जाणून घेऊया.

संध्याकाळ झाली, सूर्य अस्ताला गेला, दिवेलागणीची वेळ झाली की घराघरात उदबत्तीचे सुवास दरवळतात, देवासमोर दिवा लावून शुभं करोती म्हटलं जातं. प्रत्येकाच्या घरची परंपरा वेगळी असेलही पण भाव मात एकच, विधात्यासमोर नतमस्तक होण्याचा. संध्याकाळच्या वेळेस अनेक गोष्टी करू नये असं म्हणतात, त्यापैकी एक म्हणजे संध्याकाळी, रात्रीच्या वेळेस रडू नये. बहुतांश लोकांना हे माहीत असेल आणि पाळलंही जातं. महाराष्ट्रात अनेक गाव, त्यांची वेगळी खासियत, वैशिष्ट्य, म्हणून ती प्रसिद्ध देखील आहेत.
पण याच महाराष्ट्रात असं एक गाव आहे जिथे संध्याकाळी रडण्यास मनाई आहे. जर रडायला आलं तरीही लोकं सकाळ होण्याची वाट बघतात आणि मगच अश्रूंना वाट मोकळी करून देतात. ऐकून आश्चर्य वाटलं ना ! पण हे खरं आहे, कोकणातील सिंधुदुर्गात एक असं गाव आहे, श्रावणगाव , तिथे संध्याकाळी रडण्याची परवानगी नाही.
काय आहे खास कारण ?
पण तसं पहायला गेलं तर संध्याकाळी रडण्यास मनाई ही काही अलिकडची गोष्ट नाही. ही परंपरा शतकानुशतके जुनी आहे. त्यामागे एक खास कथाही आहे. जर कोणी संध्याकाळी किंवा संध्याकाळनंतर रडलं तर ग्रामदेवता क्रोधित होते आणि गावकऱ्यांना शाप दिला जातो असं म्हटलं जातं. कोकणात वसलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्रावणगाव नावाच्या या गावाला एक अनोखी परंपरा आहे.
या गावच्या ग्रामदेवता हिंसाचाराचा तिरस्कार करते. म्हणूनच, इथले 100% लोक शाकाहारी आहेत. आणि याच कारणामुळे संध्याकाळी रडणे, भांडणे किंवा गोंधळ घालणे निषिद्ध आहे. जर चुकून एखाद्याच्या घराबाहेर रडण्याचा किंवा भांडण्याचा आवाज आला तर त्या घरातील सदस्यांना ज्येष्ठ लोकांच्या ग्रामपंचायतीसमोर हजर राहून स्पष्टीकरण द्यावं लागतं आणि पश्चात्ताप करावा लागतो. नाहीतर ग्रामदेवता कोपण्याची आणि शापाची भीती असते.
हे गाव कशासाठी प्रसिद्ध ?
साधारणपणे, कोकणातील गावं ही हापूस आंबे, काजू, नारळ आणि जांभळाची झाडे, कोकम सरबत आणि विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखली जातात, परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्रवणगावने वेगळ्याच कारणासाठी आपली ओळख निर्माण केली आहे. या गावचे गावकरी अजूनही या प्राचीन परंपरेचे आणि श्रद्धेचे पूर्ण भक्तीने पालन करतात. यामुळेच त्यांच्या गावात आपत्ती आणि संकटे टळतात असं त्यांचं म्हणणं आहे. कोणत्याही समस्या उद्भवल्यास त्या लवकर सोडवल्या जातात असाही विश्वास त्यांना आहे.
श्रावणबाळ आणि राजा दशरथाशी निगडीत तलावही इथेच
या गावाबद्दल अशी एक मान्यता आहे की, राजा दशरथाच्या धनुष्यातून निघालेल्या बाणाने श्रवणकुमारचा मृत्यू झाला होता. ज्या तलावातून श्रवणकुमार आपल्या तहानलेल्या आईवडिलांसाठी पाणी आणण्यासाठी गेला होता, तो तलाव याच गावात आहे असे मानले जाते. आजही या तलावाच्या पाण्याने भात शिजवला की तो रक्तासारखा लाल होतो, असंही म्हटलं जातं. या तलावाचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्यात कितीही पाऊस पडला तरी हा तलाव भरून वाहत नाही आणि उन्हाळा आला की तलावातील पाणी बाहेर पडून रस्त्यांमध्ये आणि शेतात पसरतं.
