सोलापूरकरांसाठी मोठी गुडन्यूज, ‘या’ महिन्यापासून सुरु होणार विमानसेवा, विमानतळावरील काम शेवटच्या टप्प्यात
सोलापूर शहरातील होटगी रोड विमानतळाची धावपट्टी, धावपट्टीच्या बाजूच्या तांत्रिक गोष्टींची चाचणी घेण्यासाठी एक विमान शनिवारी विमानतळावर उतरले होते. या चाचणीत काही किरकोळ त्रुटी निघाल्या आहेत.

Solapur Airport : सोलापूर जिल्ह्यातील विमानसेवा सुरु करण्यात यावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरु आहे. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी सोलापूर विमानतळावरुन प्रवासी उड्डाण सुरु होणार आहेत, असे बोललं जात आहे. सोलापूर विमानतळावरुन उड्डाणाची तयारी सुरु करण्यात आली आहे. नुकतंच सोलापूरच्या होटगी रोड विमानतळाची धावपट्टी, धावपट्टीच्या बाजूच्या तांत्रिक गोष्टींची चाचणी घेण्यासाठी एक विमान विमानतळावर उतरवण्यात आले होते. या चाचणीचा अहवाल डीजीसीए आणि एअरपोर्ट अॅथॉरिटीला सादर केला जाणार आहे. यानंतर प्रवासी विमानसेवा सुरु केली जाणार आहे.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर शहरातील होटगी रोड विमानतळाची धावपट्टी, धावपट्टीच्या बाजूच्या तांत्रिक गोष्टींची चाचणी घेण्यासाठी एक विमान शनिवारी विमानतळावर उतरले होते. या चाचणीत काही किरकोळ त्रुटी निघाल्या आहेत. या त्रुटी तात्काळ दूर करण्यात येतील. त्यानंतर या चाचणीचा अहवाल डीजीसीए आणि एअरपोर्ट अॅथॉरिटीला सादर केला जाईल. यानंतर सोलापूर विमानतळावरुन प्रवासी विमानसेवा सुरु केली जाईल.
आठ महिन्यांनंतर विमानतळावर उतरले विमान
सध्या विमानतळावरील बहुतांश कामे झाली आहेत. मात्र अजूनही थोडी कामं बाकी आहेत. धावपट्टीच्या बाजूला लाइट्स असतात. या लाइट्स आणि इतर तांत्रिक कामे व्यवस्थित झाली आहेत की नाही, याचाही अंदाज घेतला जाईल. विमानतळ व्यवस्थापकांकडून या कामांचा आढावा घेऊन सविस्तर माहिती लवकरच सांगू. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक विमान आठ महिन्यांनंतर विमानतळावर उतरले. वैमानिकाने धावपट्टी चांगली आहे की नाही हे जाणून घेतले, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
येत्या ऑक्टोबर महिन्यात सोलापूर विमानतळावरुन प्रवासी सेवा सुरु होऊ शकते. त्यादृष्टीने सर्व कामे सुरु आहेत. त्याच्या वेगवेगळ्या तपासणी होतील आणि ते दुरुस्तीही सुचवतील. त्यानंतर आता ऑक्टोबर महिन्यात या सेवा पुन्हा सुरु होतील, असा विश्वास आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
ऑक्टोबर महिन्यात सुरु होणार विमानसेवा
दरम्यान, सोलापुरातील प्रवासी विमानसेवा सुरु करण्यासाठी जून 2023 मध्ये चिमणी पाडण्यात आली. जानेवारी महिन्यात विमानतळ बंद झाले आणि कामांना सुरुवात झाली. त्यानंतर पहिल्यांदाच या विमानतळावर विमान उतरले आहे. त्यामुळे येत्या ऑक्टोबर महिन्यात विमानसेवा सुरु होऊ शकतात, असे बोललं जात आहे.
