मी मुलांना विहिरीत ढकललंय… फोन येताच काळजात धस्स झालं; सोलापुराच्या शेतात नेमकं काय घडलं?
सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यात जुळ्या मुलांची विहिरीत ढकलून हत्या करण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी पित्यानेही आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

रागाच्या भरात माणूस काय करेल याचा नेम नाही, याचाच प्रत्यय देणारी आणि मन सुन्न करणारी एक घटना सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केत्तूर येथे घडली आहे. करमाळ्यात घरातील किरकोळ वादातून एका पित्याने आपल्या ७ वर्षांच्या जुळ्या मुलांचा विहिरीत ढकलून देऊन खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवांश सुहास जाधव आणि श्रेया सुहास जाधव अशी मृत चिमुकल्यांची नावे आहेत. या कृत्यानंतर आरोपी पित्यानेही विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकं काय घडलं?
आरोपी सुहास ज्ञानदेव जाधव (३२) हा वीज वितरण कंपनीत कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरात काहीतरी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादातून सुहास प्रचंड रागात होता. याच रागाच्या भरात त्याने आपली मुले शिवांश आणि श्रेया यांना फिरायला नेण्याच्या बहाण्याने हिंगणी येथील स्वतःच्या शेतात नेले. तिथे विहिरीवर नेऊन काही कळण्याच्या आत त्याने या दोन्ही मुलांना विहिरीत ढकलून दिले.
मुलांना पाण्यात ढकलल्यानंतर सुहास तिथून निघून गेला नाही, तर काही वेळ तिथेच थांबला. काही वेळाने त्याला त्याच्या कृत्याचा पश्चात्ताप झाला. यानंतर त्याने स्वतःच घरी फोन लावला. मी मुलांना विहिरीत ढकलून दिले आहे, असे त्याने घरच्यांना सांगितले. हे ऐकून कुटुंबातील सदस्यांनी आरडाओरडा करत विहिरीकडे धाव घेतली. विहिरीत उतरून मुलांना वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले. पण तोपर्यंत दोन्ही चिमुकल्यांचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाला होता. सात वर्षांच्या या भावंडांचा असा करुण अंत पाहून उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले.
मुलांच्या मृत्यूनंतर आरोपी सुहास जाधव यानेही स्वतःचे आयुष्य संपवण्यासाठी शेतातच विषारी औषध प्राशन केले. या घटनेची माहिती मिळताच करमाळा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सुहासला ताब्यात घेतले असून त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला तातडीने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
पोलिसांचा सखोल तपास सुरु
पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुलांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. सुहास जाधव याने इतके टोकाचे पाऊल का उचलले? केवळ घरातील वादच कारण होते की अजून काही? याचा पोलीस सखोल तपास करत आहेत. एका सुशिक्षित पित्याने आपल्याच पोटच्या गोळ्यांचा असा अंत केल्याने समाजातून संताप व्यक्त होत आहे.
