Rohit Pawar: रोहित पवार आधी तुझ्या कारखान्यातलं दारुचं उत्पादन बंद करं आणि मग.. भाजप आमदाराचा इशारा
Rajendra Raut on Rohit Pawar: उजनी धरणावरील आंदोलनाने वादाची ठिणगी पडली आहे. आता हा वाद पार बारामती ॲग्रोपर्यंत जाऊन पोहचला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर भाजपचे आमदार राजेंद्र राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

Rajendra Raut on Rohit Pawar: उजनी धरण परिसरातील एआय सेंटर आणि इतर मुद्यावरून केलेल्या आंदोलनानंतर आमदार रोहित पवार यांच्यावर भाजप तुटून पडली आहे. या आंदोलनाचे पडसाद आता उमटत आहेत. भाजपचे बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी रोहित पवार यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. गेल्या सात दिवसात राऊतांकडून दुसऱ्यांदा पवारांवर दुसऱ्यांदा हल्लाबोल करण्यात आला आहे. उजनी धरणातील पाण्याचा वाद आता थेट बारामती ॲग्रोपर्यंत जाऊन पोहचला आहे.
तर बारामतीत धरणे आंदोलन
भाजप आमदार राजेंद्र राऊतांचा आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. बारामती ॲग्रोने दारूचे उत्पादन बंद करुन ते पाणी शेतकऱ्यांना द्या अन्यथा बारामतीत धरणे आंदोलन करणार असा इशारा त्यांनी दिला आहे. स्वत:चे ठेवायचे झाकून आणि लोकाचे बघायचे वाकून, असे रोहित पवारांचे धोरण असल्याची टीका त्यांनी केला. बार्शीचे आमदार राऊत यांनी अजून एक मोठा दावा केला आहे. उजनी आणि नीरा धरणातील पाण्याचा वापर बारामती ॲग्रोसाठी होत असल्याचा आरोप त्यांनी केला. दुष्काळ संपेपर्यंत पवारांनी स्वतःचे कारखाने बंद ठेवावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.
बारामती ॲग्रो किती लिटर पाणी?
बारामती ॲग्रो कारखान्याला उजनी धरण आणि नीरा नदीतून 25 हजार कोटी लीटर पाणी दिले जाते. दुष्काळी स्थितीत दारू बनवायला पाणी वापरू नये ते पाणी शेती आणि पिण्याला द्यावे. जर हे पाणी बंद नाही केले तर बारामती ॲग्रो समोर तीव्र धरणे आंदोलन छेडले जाईल. हा बार्शीतील शेतकरी पुत्राचा इशारा समजा असे राजेंद्र राऊत म्हणाले.
काय आहे वादाचे कारण?
आमदार रोहित पवार यांनी उजनी धरणातील पाणी आणि AI डेटा सेंटरच्या मुद्यावरून, MPSC च्या आंदोलनावरून राज्य सरकारवर आणि संबंधित नेत्यांवर टीकेची झोड उठवली होती. तर आम्ही आमची लेव्हल बघून बोलतो असी जिव्हारी लागणारा वार केला होता. तेव्हापासून राऊत आणि पवार असा वाद पेटला आहे.