प्रसिद्ध रील स्टारने उचललं टोकाचं पाऊल, स्वत:च्याच हॉटेलमध्ये दिला जीव; मंगळवेढा हादरलं!

ज्या हॉटेलच्या स्वयंपाकघरात रील स्टार रोहिणीने अनेक रील्स बनवले, त्याच ठिकाणी तिने टोकाचं पाऊल उचललं आहे. या घटनेमुळे तिच्या चाहत्यांमध्ये आणि मंगळवेढ्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

प्रसिद्ध रील स्टारने उचललं टोकाचं पाऊल, स्वत:च्याच हॉटेलमध्ये दिला जीव; मंगळवेढा हादरलं!
रील स्टार रोहिणी पाराध्ये
Image Credit source: Instagram
| Updated on: May 28, 2026 | 10:14 AM

सोलापुरातील मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी इथली प्रसिद्ध रील स्टार रोहिणी निलेश पाराध्ये हिने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. रोहिणी आणि तिचा पती निलेश हे दोघंही रील स्टार म्हणून गेल्या काही वर्षांत प्रसिद्ध झाले होते. मंगळवेढा तालुक्यातील ब्रम्हपुरी इथं हॉटेल ग्रामपंचायत या नावाने त्यांचा व्यवसाय होता. याच हॉटेलच्या स्वयंपाक खोलीत गळफास घेऊन रोहिणीने तिचं आयुष्य संपवलं. याबद्दलची माहिती मिळताच तिचा पती निलेशने तिला तातडीने रुग्णालयात दाखल केलं, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रोहिणीच्या आत्महत्येनं मंगळवेढ्यात खळबळ उडाली असून पोलीस अधीक्षक याचा अधिक तपास करत आहेत. मंगळवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ज्या हॉटेलच्या किचनमध्ये रोहिणीने अनेक रील्स बनवले, तिथेच तिने तिचं आयुष्य संपवलं. या घटनेनंतर मंगळवेढ्यात हळहळ व्यक्त होत आहे.

हॉटेलचा व्यवसाय

‘हॉटेल ग्रामपंचायत’बद्दल रोहिणी आणि निलेश यांनी अनेक स्वप्न पाहिली होती. या दोघांनी मिळून या हॉटेलमध्ये अनेक रील्ससुद्धा शूट केले होते. त्या रील्सवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव व्हायचा. महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती, सामाजिक विषय आणि ग्रामीण जीवनशैली यांसारख्या विषयांवर ते रील्स बनवत होते. हे रील्स नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत होते. मात्र आता त्याच हॉटेलच्या स्वयंपाकघरात रोहिणीने आत्महत्या केली आहे. तिने हे टोकाचं पाऊल का उचललं, यामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही.

अल्पावधीतच प्रसिद्धी

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाजवळ ब्रह्मपुरी इथं त्यांनी ‘हॉटेल ग्रामपंचायत’ हा व्यवसाय सुरू केला होता. अल्पावधीतच या हॉटेलला चांगला प्रतिसाद मिळू लागला होता. रोहिणी आणि निलेश हे गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर रील्सच्या माध्यमातून लोकप्रिय झाले होते. हॉटेलचा व्यवसाय वाढत असतानाच त्यांनी आणखी एक नवीन शाखा सुरू करण्याचं प्लॅनिंग केलं होतं. मात्र त्यापूर्वी रोहिणीने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. रोहिणीच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण समोर आलं नसलं तरी मानसिक तणावातून आणि नैराश्यातून तिने हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Follow Us