Special Story | एका हाताने भरभरुन मिळालं, दुसऱ्या हाताने ओरबाडलं, भंडाऱ्याच्या दुर्दैवी मातांचे अश्रू कोण पुसणार?

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाल्यानंतर अवघ्या देशाला हुंदका अनावर झाला. गेल्या आठवड्याभरात काय काय झालं, या मातांच्या दुःखावर कोण फुंकर घालणार, वाचा स्पेशल रिपोर्ट (Special Report Bhandara Hospital Fire)

  • अनिश बेंद्रे, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 15:47 PM, 16 Jan 2021
Special Story | एका हाताने भरभरुन मिळालं, दुसऱ्या हाताने ओरबाडलं, भंडाऱ्याच्या दुर्दैवी मातांचे अश्रू कोण पुसणार?

मुंबई : बाळाच्या जन्मानंतर आई नव्याने जन्म घेते, असं म्हटलं जातं. मातृत्वाची चाहूल लागल्यानंतर गर्भवतीला सृजनाचा आनंद मिळतो. निसर्गाचं हे दान पदरात पाडून घेण्यासाठी अनेक महिला आतुर असतात, मात्र भंडाऱ्यातील दहा माता याबाबत अभागी ठरल्या. कारण नियतीने एका हाताने भरभरुन देत असल्यासारखं दाखवलं आणि समाधानाने या मातांचे डोळे मिटले असतानाच ओरबाडूनही घेतलं. (Special Report on Bhandara Hospital Fire 10 Babied Died)

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या शनिवारी झालेल्या अग्नितांडवात दहा कुटुंबियांनी आपलं सर्वस्व गमावलं. बाळाच्या जन्मानंतर दहा कुटुंबांनी पाहिलेल्या स्वप्नांची त्या आगीतच राखरांगोळी झाली. कुणाची कूस पहिल्यांदाच उजवली होती, तर कोणाच्या लेकराच्या हातावर राखी बांधण्यासाठी बहीण आली होती. कुणाला ‘वंशाचा दिवा’ आल्याचा आनंद होता, तर कुणाचं आयुष्य उजळवणारी ‘पणती’ तेवली होती.

हिरकन्येची डोळ्याच्या कडा पाणावणारी कहाणी

हिरालाल आणि हिरकन्या भानारकर यांचे 14 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तेव्हापासूनच दोघांनी आपल्या संसारवेलीवर फूल उमलण्याचे स्वप्न पाहिले. याआधी चार वेळा गरोदर राहिलेल्या हिरकन्या यांना कधीच आपल्या बाळाला हातात खेळवण्याचं सुख लाभलं नाही. एकदा त्यांचा गर्भपात झाला होता, तर तीन वेळा त्यांना मृत बाळ जन्माला आलं. पाचव्यांदा हिरकन्या भानारकर यांना मातृत्वाची चाहूल लागली, मात्र त्यांची ओंजळ याही वेळा रितीच राहिली

देव-दवा-दुवा.. सगळं केलं!

भंडारा सामान्य जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या बहुतांश गर्भवती कनिष्ठ वर्गातील होत्या. हातावर पोट असताना कोणी महागडे वैद्यकीय उपचार घेतले, तर कोणी देवाजवळ नवस-सायास करुन मातृत्वसुख मिळवलं होतं. मात्र देव-दवा असे सगळे उपाय व्यर्थ ठरले.

मुख्यमंत्र्यांना सांत्वनासाठी शब्द अपुरे

रुग्णालयाच्या आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाल्यानंतर अवघ्या देशाला हुंदका अनावर झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भंडाऱ्यात येऊन पीडित कुटुंबांची भेट घेत त्यांना धीर दिला. हात जोडून उभं राहण्याशिवाय मी काहीही करु शकलो नाही. त्यांचं सांत्वन करता येईल, असे शब्द माझ्याकडे नव्हते, असे उद्गार काढत मुख्यमंत्र्यांनी हतबलता व्यक्त केली.

अग्नितांडवाची चौकशी होणार

भंडारा अग्नितांडव अर्भक मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. मुंबई अग्निशमन दलाचे निवृत्त अधिकारी प्रभात रहांगदळे या चौकशी समितीत असतील. ही दुर्घटना नेमकी कशी घडली हे शोधल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हा अपघात अचानक घडला की आणखी कोणती कारणं आहेत, हे तपासलं जाईल. घटनेच्या मुळापर्यंत जाऊन तपास केला जाईल. असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

दोषींवर कारवाई करणार

भंडारा दुर्घटनेतील दोषींना सोडणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. गेलं वर्षभर आपण कोरोनाचा सामना करत होतो. त्यामुळे काही गोष्टींकडे डोळेझाक झाली का? याची चौकशी करण्यात येणार आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

गाईडलाईन तयार करणार

भंडारा दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून नवीन गाईडलाईन तयार करण्यात येणार आहे. राज्यात पुन्हा अशा घटनांमध्ये कुणाचाही जीव जाऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. इलेक्ट्रिक फॉल्टमुळे आग लागली की आणखी काही कारणं आहेत, याचीही चौकशी करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कोरोनामुळे आपले कर्मचारी तणावाखाली होती. त्यामुळे काही दुर्लक्ष झालं का? हे सुद्धा तपासण्यात येणार असल्याचं ठाकरेंनी स्पष्ट केलं.

सर्व रुग्णालयांचे ऑडिट करण्याचे आदेश

राज्यात पुन्हा अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर सेफ्टी ऑडिट करण्यात येणार आहे. तसे आदेशच देण्यात आले आहेत, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

आपल्या घरी लहान मूल नांदेल, हसेल, खेळेल असं स्वप्न या मातांनी पाहिलं होतं. मात्र शासकीय आरोग्य व्यवस्थेच्या ढिसाळ कारभाराने त्यांच्या स्वप्नांना सुरुंग लागला. या दुर्दैवी पालकांना सरकारकडून नुकसान भरपाई मिळाली, मात्र त्यांच्या पदरातून हरवलेलं अमूल्य दान कधी परतेल का, हा प्रश्न उपस्थित होतो.

संबंधित बातम्या :

हात जोडून उभं राहण्याशिवाय काहीच करू शकलो नाही; भंडारा दुर्घटनेने मुख्यमंत्री भावुक

भंडाऱ्यात 10 बाळांचा जीव गेल्यानंतर सरकार जागं! सर्व रुग्णालयांचं ऑडिट करण्याचे निर्देश

(Special Report on Bhandara Hospital Fire 10 Babied Died)