शाळेत भूत दिसल्याने विद्यार्थीनी बेशुद्ध पडली, आदिवासी शाळेतील घटनेने खळबळ
जळगावच्या धानोरा येथील आदिवासी शाळेत भूत दिसल्याने एक मुलगी बेशुद्ध पडल्याची घटना घडली आहे. यानंतर शाळेतील काही मुलांना पालकांनी आपल्या गावी परत नेले आहे.

शाळेमध्ये इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीला भूत दिसल्याने ती बेशुद्ध पडल्याचा विचित्र प्रकार जळगावच्या धानोरा येथील आदिवासी विभागाच्या शाळेत घडला आहे. या प्रकारानंतर शाळेच्या वस्तीगृहात राहणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांनी पुन्हा आपल्या घरी नेले आहे. या संदर्भात चुकीचे मॅसेज मोबाईलवरुन फॉरवर्ड केल्याचेही उघडकीस आले आहे. या शाळेत तपासणीची टीम दाखल झाली असून विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला आहे.
जळगावच्या धानोरा येथील आदिवासी विभागाच्या शाळेत विचित्र प्रकार घडला आहे. या शाळेत तिसरीत शिकणाऱ्या एका विद्यार्थींनीला सायंकाळी ताट धुवायला जाताना काही दिसल्याने ती घाबरली आणि ती पळत खाली आली, त्यानंतर इतरही मुली तिच्या सोबत पळत खाली आल्या. ही मुलगी कशाला तरी घाबरुन बेशुद्ध पडल्याचा दावा केला जात आहे.त्यानंतर या मुलीची दातखीळ बसल्याने इतरही मुलांमध्ये भीती निर्माण होवून मुली घाबरल्याचे म्हटले जात आहे.
अचानक बेशुद्ध पडल्याने मोठा गोंधळ
तिसऱ्या इयत्तेतील विद्यार्थीनी अचानक बेशुद्ध पडल्याने गोंधळ उडाला आहे. या घटनेनंतर आश्रम शाळेमध्ये दखल शिकणाऱ्या आदिवासी मुलांच्या पालकांनी मुलींना परत घेऊन जाण्यासाठी शाळेत गोंधळ घातला. या घटनेनंतर आश्रमशाळेतील जवळपास 100 पेक्षा मुले आणि मुलांना त्यांच्या पालकांनी घरी नेले आहे. मुलगी कशाला तरी घाबरली होती, ती बेशुद्ध पडली नव्हती. या मुलीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात येऊन उपचारांनंतर पालकांच्या स्वाधीन करण्यात आले अशी माहिती आश्रम शाळेच्या अधीक्षिका नम्रता सूर्यवंशी यांनी दिली आहे. मुलींच्या खोलीमध्ये शिक्षक नसल्याने त्या घाबरतात त्यामुळे त्यांच्या खोल्यांमध्ये शिक्षक नियुक्त करावा अशी मागणी पालकांनी केली आहे.
सर्व मुलींचे समुपदेशन केले जाणार
आदिवासी प्रकल्प विभागाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली आहे. शाळेत मानसोपचार तज्ज्ञांना पाचारण करुन घाबरलेल्या सर्व मुलींचे समुपदेशन केले जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. आदिवासी विभागाचे पथक या घटनेची चौकशी करेल चौकशी जे काही तथ्य समोर येईल त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती सहाय्यक प्रकल्प अधिकारी पवन पाटील यांनी दिली आहे.
