Video : अजित दादांची आठवण येताच सुनेत्रा पवारांना अश्रु अनावर, बीडमध्ये ध्वजारोहण केल्यानंतर म्हणाल्या…
Sunetra Pawar : महाराष्ट्र दिनानिमित्त बीड येथे ध्वजारोहण केल्यानंतर अजित पवार यांच्या आठवणीत पालकमंत्री सुनेत्रा पवार भावूक झाल्या होत्या. यावेळी त्यांनी बीड जिल्ह्याचा विकास करण्याचे अजित पवारांचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे म्हटले.

आज संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. राज्याच्या विविध भागात काही खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी ध्वजारोहण केले. बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनीही आज बीडमध्ये ध्वजारोहण केले. यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी अजित दादांची आठवण येतात त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. यानंतर बोलताना सुनेत्रा पवार यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
सुनेत्रा पवार यांना अश्रु अनावर
आज सुनेत्रा पवार यांनी बीडमधील कवायत मैदान, पोलीस मुख्यालय येथे ध्वजारोहण केले. यानंतर बोलताना सुनेत्रा पवार यांनी अजित दादांच्या आठवणीत अश्रु अनावर झाले. यावेळी बोलताना सुनेत्रा पवार यांनी म्हटले की, ‘सर्वांना महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि बौध्द पौर्णिमेच्या शुभेच्छा. सर्व शहिदांना श्रद्धांजली आणि कृतज्ञता. मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांना माझे अभिवादन. बीड जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्याचा दादांनी संकल्प केला होता. आदरणीय अजित दादांनी अनेक निर्णय घेतले. जिल्हाला ते एक वेगळी दिशा देतील असं वाटलं होतं. आता बीड जिल्ह्याचं स्वप्न पूर्ण करण्याची आणि विकासात्मक कामे करण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे.’
बीड जिल्ह्यासाठी 623 कोटींचा निधी
पुढे बोलताना सुनेत्रा पवार यांनी, ‘आपल्या सर्वांना आवाहन करते, आपण सर्वजण एकत्र येऊन विकासात्मक काम करू. स्वाराती रूग्णालयाचा विकास होणार आहे. बीड जिल्ह्यासाठी 623 कोटींचा निधी मंजूर केलेला आहे. जनगणनेसाठी येणाऱ्यांना आपण सर्वांनी सहकार्य करायचे आहे. जनगणनेच्या या प्रक्रियेमध्ये सर्व नागरिकांनी सहभाग नोंदवून आपलं योगदान द्यावं. सर्व क्षेत्रात अग्रगण्य जिल्हा बनवूया’ असं आवाहन बीडकरांना केलं आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे अजित पवार यांच्याकडे होते. मात्र अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर बीडचे पालकमंत्रीपद रिक्त झाले होते. अजित दादांच्या निधनानंतर काही दिवसांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आज पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी बीडमध्ये ध्वजारोहण केले. आता आगामी काळात बीडच्या विकासाची जबाबदारी ही सुनेत्रा पवार यांच्यावर असणार आहे.