कोकणात 5 हजार कोटींचं नुकसान, सरकारने पंचनाम्याआधी तातडीने 500 कोटींची मदत करावी : सुनील तटकरे

चक्रीवादळामुळे कोकणात प्रचंड नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज नुकसानग्रस्त रायगड जिल्ह्याची पाहणी केली (Sunil Tatkare on Cyclone Damage).

कोकणात 5 हजार कोटींचं नुकसान, सरकारने पंचनाम्याआधी तातडीने 500 कोटींची मदत करावी : सुनील तटकरे


रायगड : “निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात साधारणत: 5 हजार कोटींचं नुकसान झालं आहे (Sunil Tatkare on Cyclone Damage). त्यामुळे राज्य सरकारने नियमित आणि प्रचलित नियम बाजूला ठेवून आपत्तीग्रस्तांना 5 हजार कोटींची मदत करावी. याशिवाय पंचनाम्याआधी सरकारने तातडीने 500 कोटींची मदत करावी”, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे (Sunil Tatkare on Cyclone Damage).

चक्रीवादळामुळे कोकणात प्रचंड नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज नुकसानग्रस्त रायगड जिल्ह्याची पाहणी केली. त्यांनी रायगड जिल्ह्यासाठी 100 कोटींची मदत जाहीर केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी राज्य सरकारकडे नुकसानग्रस्त भागासाठी 5 हजार कोटींची मदत करावी, अशी मागणी केली आहे.

“निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात प्रचंड नुकसान झालं आहे. माझ्या प्राथमिक अंदाजानुसार कोकणात साधारणत: 5 हजार कोटींचं नुकसान झालं आहे. यामध्ये सार्वजनिक आणि शासकीय मालमत्तेचा समावेश आहे. माझी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हीच मागणी राहणार आहे की, नियमित आणि प्रचलित नियम बाजूला ठेवून आपत्तीग्रस्तांना मदतीचं धोरण ठेवलं पाहिजे”, असं सुनील तटकरे म्हणाले आहेत.

“पंचनामे इतक्या मोठ्या प्रमाणावर करता येऊ शकणार नाही म्हणूनच मोबाईलवरचे फोटो पंचनाम्यासाठी गृहित धरावे. छोट्या व्यवसायिकांचं, गणेश मूर्तिकारांचं नुकसान झालं आहे. या सर्वांना पॅकेज जाहीर करुन सरकारने मदत केली पाहिजे”, अशी मागणी सुनील तटकरे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

“पंचनाम्याआधी सरकारने तातडीने 10 ते 15 हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. मात्र, सरकारकारने पंचनाम्याआधी तातडीने 500 कोटींची मदत केली पाहिजे”, असं सुनील तटकरे म्हणाले.

“चक्रीवादळामुळे झाडांचे मोठे नुकसान झालं आहे. त्यामुळे पुढचे पाच वर्षे काहीच उत्पन्न मिळणार नाही, हा विचार करुन सरकारने मदत करावी”, असंदेखील तटकरी म्हणाले.

“सध्या सिमेंट पत्राचा तुटवडा आहे. सरकारने ते उपलब्ध करुन दिले पाहिजे. वीज पूर्ववत सुरु व्हायला हवी. वीज पुरवठा होत नसल्यामुळे पाणीपुरवठादेखील ठप्प झाला आहे”, असं सुनील तटकरे यांनी सांगितलं.

संबंधित बातमी :

रायगडकरांना दिलासा देण्यासाठी आलो आहे, तातडीने 100 कोटी जाहीर : उद्धव ठाकरे

PHOTO | चक्रीवादळाचा रायगडला फटका, मुख्यमंत्र्यांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी