Maharashtra News LIVE : लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने कुटुंबाला 10 लाखांच्या खंडणीचे ई-मेल

Maharashtra News LIVE : शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात आजही सुनावणी होणार आहे. कपिल सिब्बल यांच्याकडून ठाकरे गटाच्या बाजूने युक्तीवाद केला जाणार आहे. याविषयीचे सर्व अपडेट्स जाणून घ्या..

Maharashtra News LIVE : लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने कुटुंबाला 10 लाखांच्या खंडणीचे ई-मेल
लाइव्ह अपडेट्स
Image Credit source: Tv9
| Updated on: Aug 19, 2026 | 9:47 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 19 Aug 2026 09:55 AM (IST)

    ठाण्यात शिवसेना-भाजप वाद वाढणार?

    ठाण्यात शिवसेना भाजप वाद वाढण्याची शक्यता आहे.  भाजप नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांचा आज गडकरी रंगायतन इथे जनता दरबार भरणार आहे.  दोन दिवसांपूर्वी झालेल्या परिवहन विभागाशी संबंधित कार्यक्रमासाठी भाजपचा एकही प्रमुख नेता उपस्थित नव्हता.ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मात्र भाजपकडून ठाण्यात नाईक यांच्या माध्यमातून वाढवण्यात येणाऱ्या सक्रियतेमुळे शिवसेनेचे नेते नाराज असल्याचा पक्षांतर्गत सूर पाहायला मिळत आहे.  जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासोबतच पक्ष संघटन मजबूत करण्याचा भाजपचा प्रयत्न अशी चर्चा आहे.

  • 19 Aug 2026 09:45 AM (IST)

    कर्जत-जामखेडचा राजकीय आखाडा तापला; रोहित पवारांच्या वक्तव्याला राम शिंदेंचा पलटवार

    कर्जत-जामखेडचा राजकीय आखाडा तापला आहे.  रोहित पवारांच्या ‘तिसऱ्यांदा पाणी पाजणार’ वक्तव्याला राम शिंदेंनी पलटवार केला आहे. ‘कोण पडतंय, कोण जिंकतंय आणि कोण कोणाला पाणी पाजतंय, हे मैदानात बघू’, असा टोला शिंदेंनी लगावला. कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनावेळी राम शिंदेंचा रोहित पवारांना नाव न घेता टोला लगावला. त्यामुळे रोहित पवार विरुद्ध राम शिंदे संघर्ष पुन्हा चर्चेत आलाय. विधानसभा निवडणुकीला अवकाश असतानाच कर्जत-जामखेडचा राजकीय आखाडा तापला आहे.


  • 19 Aug 2026 09:30 AM (IST)

    दहावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरूवात

    दहावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास आजपासून सुरूवात झाली आहे. फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू आहे. दहावीच्या परीक्षेसाठी नियमित शुल्कासह ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे.

  • 19 Aug 2026 09:20 AM (IST)

    धुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठा बदल, आता डॉ. अजित पाठक नवे अधिष्ठाता

    भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय धुळे यांच्या अधिष्ठाता पदावर प्रशासकीय बदल झाला आहे.  डॉ. सयाजी व्ही. भामरे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी डॉ. अजित पाठक यांची शासनाकडून नवीन अधिष्ठाता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे .

  • 19 Aug 2026 09:05 AM (IST)

    पांडवकडा धबधब्यात 16 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

    खारघरमधील पांडवकडा धबधबा येथे 16 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे.  पांडवकडा धबधब्यावर जाण्यास बंदी आहे. त्यानंतरही कुर्ला येथील पाचजण पांडवकडा धबधब्यावर पोलिसांची नजर चुकवून आले होते. या पाच जनांपैकी सोळा वर्षीय प्रणव मिश्राचा बुडून मृत्यू झाला आहे. प्रवणच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.


  • 19 Aug 2026 09:01 AM (IST)

    खारघरमधील पांडवकडा धबधबा इथं 16 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

    खारघरमधील पांडवकडा धबधबा इथं 16 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. पांडवकडा धबधब्यावर जाण्यास नागरिकांना बंदी करण्यात आली. कुर्ला इथले पाचजण पांडवकडा धबधब्यावर पोलिसांची नजर चुकवून आले होते. पाच जणांपैकी सोळा वर्षीय प्रणव मिश्राचा बुडून मृत्यू झाला आहे.

  • 19 Aug 2026 08:50 AM (IST)

    अंमली पदार्थांच्या व्यसनाला आळा घालण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देशव्यापी रणनीतीची तयारी

    देशातील तरुणाईमध्ये वाढत असलेल्या अंमली पदार्थांच्या व्यसनाला आळा घालण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघप्रेरित 32 संघटना एकत्रितपणे देशव्यापी रणनीती आखण्याच्या तयारीत आहेत. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम जवळील गुडीलोवा येथे 19 ते 21 ऑगस्ट दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत भाजप, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसह 32 संघटना मंथन करणार आहेत. या बैठकीत अमली पदार्थांचा वाढता विळखा, त्यांचे तरुणांवर होणारे परिणाम आणि भविष्यातील उपाययोजनावर विशेष मंथन होणार आहे.

  • 19 Aug 2026 08:40 AM (IST)

    सरोगसीच्या माध्यमातून मुलं देतो म्हणत तब्बल ४७ लाख ८८ हजारांची फसवणूक!

    सरोगसीच्या माध्यमातून मुलं देतो म्हणत तब्बल ४७ लाख ८८ हजारांची फसवणूक करण्यात आली. धाराशिवमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून मुलं देण्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील फिर्यादीला मुली आहेत, मुलगा नसल्याने सरोगसीच्या माध्यमातून मुलं देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली. प्रकरण उघडकीस आल्यानंतर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची आरोपींनी धमकी दिली. आधी रोख आणि ऑनलाइन पद्धतीने ४७ लाख ८८ हजार रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. धनंजय मदने यांच्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 19 Aug 2026 08:30 AM (IST)

    डोंबिवली स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा धिंगाणा!

    डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाच्या स्कायवॉकवरील फेरीवाल्यांच्या अतिक्रमावर पालिका-पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईदरम्यान फेरीवाल्यांचा माल खाली फेकत असल्याचा आरोप करण्यात आला. यावरून फेरीवाले आणि पालिका-पोलिसांमध्ये वाद झाला. महिला फेरीवाल्यांसह काही फेरीवाल्यांची पोलिसांसोबत झटापट झाली. यावेळी तब्बल अर्धा तास स्कायवॉकवर गोंधळ निर्माण झाला होता. संपूर्ण प्रकाराचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • 19 Aug 2026 08:20 AM (IST)

    लॉरेंस बिश्नोई टोळीच्या नावाने कुटुंबाला १० लाखांच्या खंडणीचे ई-मेल

    प्रताप नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुर्वेनगर इथल्या एका ६० वर्षीय रहिवाशाला आणि कॅनडामध्ये काम करणाऱ्या त्यांच्या मुलीला मंगळवारी लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने ई-मेल आले आहेत. यामध्ये १० लाखांची मागणी करण्यात आली असून, पैसे न दिल्यास त्यांना जीवाने मारण्याची आणि त्या महिलेचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याची उघड धमकी देण्यात आली आहे. कॅनडातील एका खासगी कंपनीत कार्यरत असलेल्या मुलीने मंगळवारी संध्याकाळी तिचे ई-मेल खाते उघडल्यावर तिला बिश्नोई टोळीकडून एक संदेश आढळला.

    या मेलमध्ये १० लाखांची मागणी करण्यात आली होती आणि पैसे न दिल्यास तिच्या जीवाला धोका निर्माण होईल आणि तिचे फोटो ऑनलाईन लीक केले जातील, असा इशारा देण्यात आला होता. तिने तातडीने स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली आणि नागपूरमधील तिच्या वडिलांशीही संपर्क केला. तिच्या वडिलांनाही असाच एक ई-मेल आला, ज्यामध्ये १० लाखांची तीच मागणी आणि जीवाला धोका असल्याचा इशारा होता. कुटुंबाने राणा प्रताप नगर पोलीस ठाण्यात संपर्क साधला आहे, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून ही तक्रार सायबर क्राइम सेलकडे वर्ग केली आहे.

     

  • 19 Aug 2026 08:14 AM (IST)

    आमदारांच्या गावात चिमुकलीवर अत्याचारानंतर खून; १० वर्षीय मुलीच्या हत्येनं जुन्नर हादरलं!

    जुन्नरच्या आमदारांच्या गावातच चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे. अवघ्या १० वर्षीय मुलीला घराशेजारी राहणाऱ्या तरुणाने ओळखीचा गैरफायदा घेत शेतात नेलं आणि अत्याचार करून तिची हत्या केल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे. संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, घटनेने नातेवाईक आणि ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. आरोपीवर कठोरात कठोर कारवाईची मागणी होत आहे.

  • 19 Aug 2026 08:13 AM (IST)

    नाशिक महापालिकेत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे घेणार आढावा बैठक

    नाशिक महापालिकेत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आढावा बैठक घेणार आहेत. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनाचा आढावा घेणार आहेत. गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचीही पंकजा मुंडे माहिती घेणार आहेत. शहरातील विविध भागात नवीन एसटीपी प्लांट उभारण्याचं काम सुरू आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नदी प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा होणार आहे. महापालिका आयुक्तांसह सर्व प्रमुख अधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

  • 19 Aug 2026 08:12 AM (IST)

    सिंहस्थ कुंभमेळ्याच्या साधूग्रामच्या जागेसाठी अतिरिक्त एक हजार एकर भूसंपादनाला स्थगिती

    नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या साधूग्रामच्या जागेसाठी अतिरिक्त एक हजार एकर भूसंपादनाला स्थगिती देण्यात आली आहे. नाशिक महापालिकेच्या तात्पुरती भूसंपादन प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेण्याचं निर्देश न्यायालयाने प्रशासनाला दिले आहेत. एकतर्फी जमीन अधिग्रहणास न्यायालयाने स्थगिती दिली आहे. शेतकरी कृती समितीच्या याचिकेनंतर न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. महापालिकेकडून अतिरिक्त एक हजार एकर क्षेत्र अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. शेतकऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्यानंतर कृती समितीने न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी ३ सप्टेंबरला पुन्हा सुनावणी होणार आहे.

सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर महत्त्वाची सुनावणी होणार आहे. आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा तसंच पक्षावरील अधिकाराचा प्रश्न त्यांच्या युक्तिवादाच्या केंद्रस्थानी आहे. मागील सुनावणीदरम्यान ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही आक्षेप घेत गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. आयोगाने आपल्या अधिकारक्षेत्राच्या मर्यादा ओलांडल्याचा दावा त्यांनी केला होता. सिब्बल यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर शिंदे गटाकडून बाजू मांडली जाणार असून, या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. यासह देश- विदेशातील, राज्यातील, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील इतर अनेक घडामोडी जाणून घेण्यासाठी हा ब्लॅाग फॅालो करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us