इंदापुरात दगाफटक्याची भीती, सुप्रिया सुळेंची हर्षवर्धन पाटलांसोबत बैठक

बारामती : इंदापूर विधानसभेची उमेदवारी जाहीर होईपर्यंत आघाडीच्या उमेदवारांचं काम न करण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतलेली भूमिका, काँग्रेस नेत्यांकडून आघाडी धर्माचं पालन करण्याची झालेली एकमुखी मागणी या पार्श्वभूमीवर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्ह्यातल्या विशेषत: बारामती लोकसभा मतदारसंघातल्या काँग्रेस नेत्यांची भेट घेत चर्चा केली. इंदापूर मतदारसंघावरुन राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात संघर्ष सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर …

इंदापुरात दगाफटक्याची भीती, सुप्रिया सुळेंची हर्षवर्धन पाटलांसोबत बैठक

बारामती : इंदापूर विधानसभेची उमेदवारी जाहीर होईपर्यंत आघाडीच्या उमेदवारांचं काम न करण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतलेली भूमिका, काँग्रेस नेत्यांकडून आघाडी धर्माचं पालन करण्याची झालेली एकमुखी मागणी या पार्श्वभूमीवर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्ह्यातल्या विशेषत: बारामती लोकसभा मतदारसंघातल्या काँग्रेस नेत्यांची भेट घेत चर्चा केली. इंदापूर मतदारसंघावरुन राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात संघर्ष सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी सुप्रिया सुळेंनी बैठका सुरु केल्या आहेत.

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, भोरचे आमदार संग्राम थोपटे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्याशी सुप्रिया सुळे यांनी पुण्यात चर्चा केली. या बैठकीत विविध मुद्यांवर सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे इंदापूरसह अन्य ठिकाणी आघाडीतील बिघाडीबाबतच्या चर्चांना ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काही दिवसांपूर्वी इंदापूर नगरपरिषदेने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, रमेश बागवे, आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात काँग्रेस कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीकडून आघाडी धर्माचे पालन होत नाही, लोकसभा निवडणुकीत आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे काम करुनही विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून घात केला जातो, अशी नाराजी वरिष्ठ नेत्यांसमोरच व्यक्त केली होती. तसेच इंदापूर विधानसभेची जागा काँग्रेसला जाहीर होणार की राष्ट्रवादीला हे स्पष्ट झाल्याशिवाय आम्ही लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवाराचं काम करणार नाही, अशी भूमिका जाहीर केली होती. त्याच अनुषंगाने आमदार संग्राम थोपटे, रमेश बागवे, संजय जगताप यांनीही राष्ट्रवादीकडून ठोस आश्वासन घेण्याबद्दल पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे आग्रही मागणी केली होती.

दरम्यानच्या काळात इंदापूरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या विविध कार्यक्रमात आलेल्या नेत्यांनी इंदापूरच्या विधानसभेचा कळीचा मुद्दा पुढे करत राष्ट्रवादी काँग्रेसकडून होणार्‍या राजकारणावर तोंडसुख घेतलं होतं. त्यामुळे वरीष्ठ पातळीवर काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडी झालेली असली तरी इंदापुरात वेगळंच चित्र पाहायला मिळत असल्याने या विषयावर उलटसुलट चर्चा झडत होत्या. या पार्श्वभूमीवर माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पुण्यातील निवासस्थानी खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्यात चर्चा झाली. या चर्चेत विविद्य मुद्यांबाबत उहापोह करण्यात आल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आलं. एकूणच ही बैठक सकारात्मक झाल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे इंदापूरसह अन्य ठिकाणी असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वादाला विराम लागण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी गेल्या काही दिवसात विविध नेत्यांच्या गाठीभेटी सुरु केल्या आहेत. यामध्ये त्यांनी माजी मंत्री दादा जाधवराव, माजी खासदार अशोकराव मोहोळ यांच्यासह अन्य नेत्यांच्या भेटी घेत चर्चा केली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *