माझ्या अकाऊंटवर 10 लाख आले, थेट स्टेटमेंट दाखवत रणजीत कासलेंचा धनंजय मुंडेंवर खळबळजनक आरोप
निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासले यांनी पुण्यात दाखल झाल्यानंतर ईव्हीएमवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या खात्यात निवडणुकीच्या दिवशी दहा लाख रुपये जमा झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी अजित पवारांच्या अनेक आमदारांच्या निवडणुकीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

वादग्रस्त आणि निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासले हे पुण्यात दाखल झाले आहेत. ते लवकरच पोलिसांना शरण जाणार आहेत. पुण्यात दाखल होताच रणजित कासले यांनी ईव्हीएमवर गंभीर आरोप केले आहेत. माझ्या अकाऊंटला निवडणुकीच्या दिवशी 10 लाख जमा झाले होते. धनंजय मुंडे चुकीच्या पद्धतीने निवडून आले, असा खळबळजनक दावा रणजित कासलेंनी केला आहे.
मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर होती, असा खळबळजनक दावा देखील रणजीत कासले यांनी केला होता. वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरसाठी पाच कोटी, दहा कोटी आणि 50 कोटींची ऑफर दिल्याचं रणजीत कासलेंनी म्हटले होते. यानंतर रणजीत कासलेंनी पळून उपयोग होणार नाही. आपण संकटाचा सामना केलेला आहे. व्यवस्थेविरोधात लढता येत नाही. त्यामुळे आपण पोलिसांना शरण जाणार असल्याचे निलंबित आणि वादग्रस्त पोलिस अधिकारी रणजित कासलेंनी व्हिडीओद्वारे म्हटले होते. त्यानंतर आता रणजित कासले हे पुण्यात दाखल झाले आहेत. पुण्यात दाखल होताच त्यांनी खळबळजनक आरोप केले आहेत.
रणजित कासले काय म्हणाले?
“एन्काऊंटरच्या चर्चा बंद दाराआड झाल्या आहेत. अशाप्रकारे कोणी आदेश देईल का. मी तुम्हाला जे पुरावे देतो, त्यावर तुम्ही मला प्रश्न विचारा. माझ्या अकाऊंटला निवडणुकीच्या दिवशी १० लाख जमा झाले. वाल्मिक कराडची संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन कंपनी, आंबाजोगाईला कंपनी आहे. ज्यात महादेव कराड आणि काळे हे पार्टनर आहे. त्यांच्या कंपनीतून माझ्या अकाऊंटवर दहा लाख आले. त्यातील साडे सात लाख मी परत केलेत. अडीच लाखात माझा खर्च चालू आहे. माझ्या पगारातील काही सेविंग आणि त्यातील पैसे यातून मी सध्या जे काही करतो”, असे रणजित कासले म्हणाले.
“साडे सात लाख मी रोख रक्कम आणि दुसऱ्याचे अकाऊंट अशा स्वरुपात दिलेले आहेत. माझ्या अकाऊंटला तेव्हा ४१६ रुपये होते. हे पैसे ईव्हीएम मशीनपासून दूर जाण्यासाठी होते. ईव्हीएमला जी काही छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं. मतदानाच्या दिवशी माझी ईव्हीएमच्या इथे ड्युटी असताना मला का काढलं. तेव्हा परळीत अपुरं मनुष्यबळ होतं. माझी परळीला ड्युटी होती. ईव्हीएम मशीन जवळ रात्री माझी ड्युटी होती. याबद्दल माझे ऑर्डरही भेटले”, असे रणजित कासलेंनी म्हटले.
“सरकार फ्रॉड आहे. धनंजय मुंडे चुकीच्या पद्धतीने निवडून आले. एकनाथ शिंदेंचे सरकार सोडलं तरी अजित पवारांचे एवढ्या जागा निवडून येऊच शकत नाही”, असा गंभीर आरोप रणजित कासलेंनी केला.