धनंजय मुंडेंचं एकच ध्येय, खोटं बोल पण रेटून बोल : पंकजा मुंडे

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:36 PM, 21 May 2019
धनंजय मुंडेंचं एकच ध्येय, खोटं बोल पण रेटून बोल : पंकजा मुंडे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या आरोपांना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी उत्तर दिलंय. खोटं बोल पण रेटून बोल आणि माझ्यावर आरोप कर हे धनंजय मुंडेंचं एकमेव ध्येय आहे, असा पलटवार पंकजांनी केला. पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये भाजपला मतदान न झालेल्या बूथची यादी मागवली असा आरोप करत ईव्हीएम हॅकिंगची शंका असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले होते.

बीडमध्ये अजून तरी कोणत्याही बूथची यादी मागवलेली नाही. निकालानंतर आपल्याला कोणत्या भागात किती मतदान झालं याची माहिती प्रत्येक नेत्यालाच मिळते. शिवाय निवडणुकीत कोणत्या भागातून आपल्याला किती मतदान झालं याचा आढावा प्रत्येक जण घेतो, धनंजय मुंडेंनीही तो आढावा घेतलाच असेल. मग यात गैर काय असा सवालही पंकजा मुंडेंनी केला. ते माझे बंधू आहेत, त्यांना लहानपणापासून ओळखते, खोटं बोल पण रेटून बोल एवढंच ते करतात, असं पंकजा म्हणाल्या.

“मराठवाड्यातल्या आठही जागा जिंकू”

एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीच्या जागा कमी होताना दिसत आहेत. पण महाराष्ट्रात युतीला 38-44 जागा मिळतील, असा अंदाज पंकजांनी व्यक्त केला. मराठवाड्यातील जबाबदारी पंकजा मुंडेंकडे होती. मराठवाड्यातील आठही जागांवर भाजपचा विजय होईल, असा दावा पंकजांनी केला. उस्मानाबाद, परभणी आणि बीडमध्ये आमचाच विजय होईल, असा दावा राष्ट्रवादीने केलाय. पण पंकजांनी हा दावा फेटाळून लावला.

VIDEO : पंकजा मुंडेंची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत