चिकनमुळे कोरोनाच्या प्रसाराची अफवा, ठाकरे सरकारचा अफवाखोरांना कारवाईचा इशारा

कोरोना व्हायरसविषयी चुकीचा संदेश सोशल मीडियावर फिरवण्यात आला. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं मंत्री सुनिल केदार यांनी सांगितलं.

चिकनमुळे कोरोनाच्या प्रसाराची अफवा, ठाकरे सरकारचा अफवाखोरांना कारवाईचा इशारा

मुंबई : चिकन खाल्ल्यामुळे ‘कोरोना व्हायरस’ची लागण होत असल्याच्या अफवेची ठाकरे सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. कोंबड्यांविषयी चुकीचा समज पसरवणाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी याविषयी माहिती (Rumors of Corona infection by Chicken) दिली.

कोरोना व्हायरसची लागण चिकन खाल्ल्यामुळे होत नाही, असं सुनिल केदार यांनी स्पष्ट केलं. चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावानंतर विषाणूंपेक्षा अधिक वेगाने पसरलेल्या अफवांचा फटका चिकन बाजाराला बसला. कोरोनाच्या भीतीने अनेक मांसाहारींनी चिकनकडे पाठ फिरवल्याचं गेल्या काही आठवड्यांत समोर आलं होतं.

चिकनमुळे कोरोना व्हायरसची लागण होऊ शकते, अशी चुकीची माहिती सोशल मीडियातून पसरली आणि व्हायरसच्या भीतीने मांसाहारींनी अचानक चिकन खायचे बंद केले. राज्यभरातील चिकन खाणाऱ्यांची संख्या 50 टक्क्यांवर आल्याची माहिती आहे.

राज्यातील पोल्ट्री उद्योग करणाऱ्या तरुणांना सांगायचं आहे, की कोरोना व्हायरसविषयी चुकीचा संदेश सोशल मीडियावर फिरवण्यात आला. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारकडून सायबर क्राईम ब्रांचकडे एफआयआर दाखल करण्यात आला असल्याचं केदार यांनी सांगितलं.

चिकन आणि कोरोना व्हायरसविषयीच्या अफवांची सर्व चौकशी होईल. ज्या व्यक्तींनी हे उद्योग केले आहेत, त्यांना कठोर शिक्षा होईल, अशा शब्दात काँग्रेस नेते सुनिल केदार यांनी पोल्ट्री उद्योजकांना आश्वस्त केलं.

पोल्ट्री व्यवसायावर काय परिणाम?

चिकनची मागणी घटल्याने चिकन विक्रेते तर अडचणीत आले आहेतच, मात्र पोल्ट्री फार्म चालवणाऱ्या शेतकरी आणि व्यावसायिकांवरही संकट ओढावलं आहे. पोल्ट्री फार्ममधून जे चिकन 40 ते 70 रुपये किलोने खरेदी केलं जायचं, त्याचा दर घसरुन आता 28 रुपये प्रति किलोवर आला आहे.

कोंबडीची छोटी पिल्लं अगोदर 20 ते 25 रुपये दराने विकली जायची, आता ती दहा ते बारा रुपयांवर आली आहेत. त्यामुळे पोल्ट्रीफार्म मालक अडचणीत आले आहेत.

आहारतज्ज्ञ काय सांगतात?

आपल्याकडे चिकन ज्या पद्धतीने शिजवले जाते, त्यानुसार त्यात कोणतेही विषाणू जिवंत राहण्याची शक्यता नाही. याशिवाय कोंबडी किंवा कोणत्याही प्राण्याच्या शरीरात कोरोना व्हायरस असल्याची भारतात चिन्हं नाहीत. त्यामुळे चिकन खाणाऱ्यांनी मनामध्ये अजिबात शंका बाळगू नये, असं आवाहन लातूरमधील पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नानासाहेब कदम यांनी केलं आहे. मांसाहारींनी अशा अफवांना बळी न पडता चिकन खात राहावं, असं आवाहन केलं जात आहे. (Rumors of Corona infection by Chicken)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *