Nagpur Hit and Run Case : संकेत बावनकुळेने दारुसोबत बीफ खाऊन गाडी ठोकल्याचा आरोप, राजकारण तापलं!

संकेत बावनकुळेंसह अर्जुन हावरे आणि रोनित चित्तमवार या तिघांवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी गंभीर आरोप केलाय. गाड्या ठोकण्याआधी तिघांनी दारुसह बीफ खाल्ल्याचा आरोप संजय राऊत आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी केलाय.

Nagpur Hit and Run Case : संकेत बावनकुळेने दारुसोबत बीफ खाऊन गाडी ठोकल्याचा आरोप, राजकारण तापलं!
| Updated on: Sep 11, 2024 | 11:00 PM

नागपूरच्या हिट अँड रन प्रकरणात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि उपनेत्या सुषमा अंधारेंनी संकेत बावनकुळेंवरुन गंभीर आरोप केलाय. लाहोरी बारमधून निघण्याआधी दारुसह संकेत बावनकुळे, अर्जुन हावरे आणि रोनित चित्तमवार या तिघांनी बीफ कटलेट खाल्ल्याचा दावा, राऊत आणि अंधारेंनी केलाय आणि त्यानंतर भरधाव ऑडी कारनं 3 वाहनांना उडवलं, असा राऊतांचा दावा आहे. “संकेत बावनकुळेंच्या जेवणात बीफ कटलेट आणि हे हिंदुत्व शिकवणार?”, असा सवाल करत संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला. राऊत आणि अंधारे यांनी बीफवरुन भाजपला घेरल्यानंतर MIMच्या इम्तियाज जलील यांनीही उडी घेतलीय.

सुषमा अंधारे नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्येही आल्या आणि अपघातावरुन नागपूर पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती केली. लाहोरी बारमधून निघाल्यावर, रविवारी रात्री साडे 12 वाजता चंद्रशेखर बावनकुळेंचे पुत्र संकेत बावनकुळेंच्या गाडीनं एक कार आणि 2 वाहनांना उडवलं. मात्र, त्यावेळी संकेत बावनकुळे कार चालवत नव्हता, तर तो बाजूच्या सीटवर बसलेला होता, असं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र ज्या जितेंद्र सोनकांबळेंनी पोलिसांत तक्रार दिली, त्यांच्यावर आता तक्रार मागे घेण्यासाठी दबाव असून जीवाला धोका असल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी केलाय.

महाविकास आघाडीतल्या 2 नेत्यांमध्येच जुंपली

इकडे संकेत बावनकुळेंवरुन महाविकास आघाडीतल्या 2 नेत्यांमध्येच जुंपलीय. नेत्याचा मुलगा आहे म्हणून राजकारण नको, असं काँग्रेसचे नागपूरचे आमदार विकास ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन अंधारेंनी संकेत बावनकुळेला वाचवण्यासाठी विकास ठाकरेंनी प्रयत्न करावेत हे अनाकलनीय आहे, असं अंधारे म्हणाल्या आहेत.

राऊतांविरोधात बार मालकाची पोलिसांत तक्रार

संकेत बावनकुळेची एकदा पोलिसांनी चौकशी केलीय. सध्या, गुन्हा संकेतचा मित्र अर्जुन हावरेवरच आहे. मात्र गाडी संकेत चालवत होता, असं आरोप विरोधकांचा विशेषत: ठाकरेंच्या शिवसेनेचा आहे. आता तर हे प्रकरण बिफ पर्यंत आलंय. लाहोरी बार अँड हॉटेलमध्ये बीफ खाल्ल्याच्या आरोप केल्यानंतर, आता राऊतांविरोधात मालकानं बदनामीची पोलिसांत तक्रार दिलीय. तसंच 1 हजार कोटींचा दावाही लाहोरी बारचे मालक ठोकण्याच्या तयारीत आहेत. लाहोरी बारच्या मालकांनीही हेही स्पष्ट केलंय की, संकेत बावनकुळेंसह अर्जुन हावरे आणि रोनित चित्तमवार बारमध्ये आले होते आणि त्यांनी दारुची ऑर्डर दिली होती.15-20 मिनिटांत एक एक पेग घेवून ते निघून गेले होते.