Eknath Shinde : भरपावसात मुख्यमंत्र्यांची गुरुपौर्णिमा, आधी बाळासाहेबांना नंतर आनंद दिघेंच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गुरुपौर्णिमे निमित्त दादर शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. भरपावसात शिंदे स्मृती स्थळावर आले होते. यावेळी त्यांच्यासोबत आमदार संजय शिरसाट, प्रकाश सुर्वे, यामिनी जाधव, बालाजी किणीकर होते.

ठाणे : आज गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सकाळीच ट्विट करून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) आणि आनंद दिघे (anand dighe) यांना अभिवादन केलं. हे अभिवादन करताना बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही, असं ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला टोलाही लगावला. त्यानंतर त्यांनी शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर येऊन बाळासाहेबांना अभिवादन केलं. त्यानंतर ठाण्यात जाऊन आनंद दिघे यांच्या स्मृती स्थळालाही अभिवादन केलं. मुंबई-ठाण्यात जोरदार पाऊस सुरू आहे. भरपावसातही मुख्यमंत्र्यांनी आपल्या गुरुंना अभिवादन केलं. यावेळी त्यांचे काही समर्थक आमदारही उपस्थित होते. ठाकरे स्मृती स्थळाजवळ तर शिंदे समर्थकांनी पोस्टर लावून शिवसेनेला टोले लगावले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गुरुपौर्णिमे निमित्त दादर शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. भरपावसात शिंदे स्मृती स्थळावर आले होते. यावेळी त्यांच्यासोबत आमदार संजय शिरसाट, प्रकाश सुर्वे, यामिनी जाधव, बालाजी किणीकर आणि माजी नगरसेवक समाधान सरवणकर होते. या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच या परिसरात शिंदे समर्थकांनी बॅनरबाजीही केली होती.
शिंदे ठाण्यात
एकनाथ शिंदे यांनी नंतर ठाण्यात येऊन आनंद दिघे यांच्या स्मृती स्थळाला अभिवादन केलं. यावेळी शेकडो शिंदे समर्थक उपस्थित होते. ठाण्याचे माजी महापौर आणि माजी नगरसेवक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
पूरपरिस्थिती रोखण्यासाठी यंत्रणा सतर्क
यावेळी शिंदे यांनी मीडियाशी संवादही साधला. राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. सकाळपासूनच सर्व जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बोलतो आहे. त्याचबरोबर रात्री उशिरा देखील मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशीही चर्चा झाली आहे. धरणांतून सोडण्यात येणारे पाणी आणि त्याबाबतच्या वेळांबाबत नागरिकांना माहिती देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. एकंदरीत राज्यातील सर्व यंत्रणा सतर्क आणि सज्ज आहे. कुठलीही दुर्घटना घडू नये असे प्रयत्न आहेत. पण दुर्देवाने तशी वेळ आल्यास त्या ठिकाणी तत्काळ आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणा पोहचतील असे प्रयत्न आहेत. आतापर्यंत ज्यांना स्थलांतरित केले आहे, त्यांना जेवण तसेच आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
