
उद्यापासून संपूर्ण राज्यात सर्व पक्षीयांकडून जोरदार प्रचाराला सुरुवात होईल. मुंबईसह 29 महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र, काही ठिकाणी मतदानाआधीच उमेदवारांनी बाजी मारली आहे. यात महायुतीचे उमेदवार जास्त आहेत. मुंबई शेजारच्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत मतदानाआधीच नऊ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. केडीएमसी महापालिकेची एकूण सदस्य संख्या 122 आहे. मतदानाआधीच नऊ उमेदवार विजयी झाले आहेत. यात भाजपचे 5 आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे चार उमेदवार आहेत. बिनविरोध विजयींमध्ये आमदार राजेश मोरे यांचे सुपुत्र हर्षल राजेश मोरे यांचा समावेश आहे.
मुलगा निवडून येताच आमदार राजेश मोरे व भारती मोरे यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. “विरोधकांना जनता कंटाळलेली आहे. महायुतीवर जनतेचा प्रचंड विश्वास आहे. KDMC मध्ये 122 पैकी 118 ते 120 जागा निवडून येणार. महायुतीचा महापौर होणार” असा विश्वास आमदार राजेश मोरे यांनी व्यक्त केला. ‘पती आमदार, मुलगा बिनविरोध नगरसेवक झाला. आता सर्वांचा विकास होणार’ असं आमदार पत्नी भारती मोरे म्हणाल्या.
कामामुळे विरोधक उमेदवारांनी माघार घेतली
“उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामामुळे विरोधक उमेदवारांनी माघार घेतली. येणाऱ्या काही दिवसातच महायुतीचा महापौर केडीएमसी वर बसेल” अशी हर्षल मोरेने प्रतिक्रिया दिली. आज अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. विरोधकांनी नांगी टाकली की हातमिळवणी? राजकीय वर्तुळात अशा चर्चांना जोरदार उधाण आलं आहे.
नगरसेवक नसताना देखील नगरसेवकासारखे काम
“कल्याण डोंबिवली प्रभाग क्रमांक 24 मधून महायुतीचा पॅनल हा बिनविरोध निवडून आलेला आहे. सर्वांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. महायुतीचा सगळ्या नेत्यांमुळे मला महानगरपालिकेत पुन्हा जाण्याची संधी मिळाली मी सगळ्यांचे आभार मानते. जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांची मेहनत नक्कीच फाळाला लागली आहे. शिंदे साहेबांसोबत आम्ही गेल्या पाच वर्षांपासून काम करत आहोत. कोरोना काळानंतरही निधीची कमतरता त्यांनी कधीही जाणून दिली नाही. आम्ही त्यावेळेस नगरसेवक नसताना देखील नगरसेवकासारखे आम्ही काम करत होतो.आमच्या प्रभागात विकासाचा धडाका लावला होता. त्यामुळे शिंदे साहेबांचे मी मनापासून धन्यवाद मानते. विरोधकाला बोलायला शब्दही राहिला नाही “अशी प्रतिक्रिया बिनविरोध निवडून आल्यानंतर वृषाली जोशी यांनी दिली.
केडीएमसीत भाजपचे बिनविरोध निवडून आलेले पाच उमेदवार
प्रभाग क्रमांक 24 – ज्योती पवन पाटील
प्रभाग क्रमांक 27 – मंदा सुभाष पाटील
प्रभाग क्रमांक 18 – रेखा राम यादव -चौधरी
प्रभाग क्रमांक 26 – आसावरी केदार नवरे
प्रभाग क्रमांक 26 (ब) – रंजना मितेश पेणकर
केडीएमसीत शिवसेनेचे बिनविरोध निवडून आलेले चार उमेदवार
प्रभाग क्रमांक 24 – रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी
प्रभाग क्रमांक 28 – हर्षल राजेश मोरे