Leopard Attack: 11 वर्षाच्या मुलावर बिबट्याचा हल्ला, शाळेच्या दप्तरामुळे असा वाचला जीव, काय घडला थरार?
School Bag Saved Life: हल्ला झालेला विद्यार्थी रोज घरापासून 4 किलोमीटर जंगलातील रस्त्याने शाळेत जातो. पण झाडीत दडून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. एका दप्तराने असा वाचला त्याचा जीव...

Leopard attack on Student at Vikramgad: पालघरमधील विक्रमगड तालुक्यातील उतावळी आदर्श विद्यालयात शिकणाऱ्या 11 वर्षाच्या विद्यार्थ्यांवर बिबट्याने झडप घातली. अचानक झालेल्या या हल्ल्याने हा मुलगा भांबावला. हा विद्यार्थी जंगलातील रस्त्याने त्याच्या शाळेत जातो. घरापासून त्याची शाळा 4 किलोमीटर आहे. जंगलातील पायवाटेने तो रोज शाळेत जातो. शाळा सुटल्यावर तो घरी परतत होता. त्याचवेळी अचानक बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढवला. पण शाळेचे दप्तर आणि विद्यार्थ्याच्या समयसूचकतेमुळे तो बचावला. नेमका काय घडला थरार?
काय घडला थरार?
मयंक विष्णू कुवरा हा शाळेसाठी रोज 8 किलोमीटरची पायपीट करतो. घरापासून त्याची शाळा 4 किलोमीटर आहे. शाळेला जाण्याचा रस्ता पण जंगलातून आहे. पण शाळेची ओढ असल्याने तो या सर्व अडचणीवर मात करतो. संध्याकाळी शाळा सुटल्यावर तो पडवीपाडा या त्याच्या वस्तीकडे परतत होता. तेव्हा झाडीत दडलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढवला.
बिबट्याने मागून त्याच्यावर हल्ला चढवला. मयंकच्या पाठीवर दप्तर होते. बिबट्याचे पुढचे पाय या दप्तरावर पडले. यामुळे त्याची पाठ वाचली. पण हातावर बिबट्याच्या पंजामुळे खोल जखमा झाल्या. त्याच्या हाताला अनेक ठिकाणी टाके द्यावे लागले. बिबट्याच्या अणुकुचीदार नखामुळे त्याचे हात सोलपटून निघाले.
मयंकचा धाडशीपणा, बिबट्याने ठोकली धूम
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मयंक घाबरला नाही. त्याने समयसूचकता दाखवली. त्याच्या धाडसीपणामुळे बिबट्याने धूम ठोकली. मयंक न डगमगता जोर जोराने ओरडला. तर इतर सहकारी मुलांनी बिबट्यावर दगडफेक सुरु केली. मुलांच्या आवाजामुळे आणि दगडांच्या माऱ्यामुळे बिबट्या घाबरला आणि त्याने जंगलाकडे धूम ठोकली. मुलांचा आरडाओरड ऐकून काही गुराखी आणि जवळपासच्या लोकांनी धाव घेतली. अनेक लोक दिसल्याने झाडीत लपलेला बिबट्या अजून दाट जंगलात गेला. मुलांच्या या धाडसाचे नागरिकांनी कौतुक केले. तर या बिबट्यासाठी लवकर वनविभागाने पिंजरा लावण्याची मागणी केली. मयंकला तातडीने विक्रमगड येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. तिथे त्याच्या हातावर टाके घालण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
वाडीवस्तीवर भीतीचे सावट
या भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असल्याने वाडीवस्तीवरील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर सर्वांना सतर्क करण्यात आले आहे. तर जंगलाच्या रस्त्याने शाळेत जाताना मुलांसोबत काही लोकांना पाठवण्याची तयारी करण्यात येत आहे. सध्या या भागात भीतीचे वातावरण आहे.
