
ठाणे : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना वाहतूक पोलिसांनी अडवलं, की किमान 100 रुपयांची पावती फाटणारच, हे ठरलेलं असतं. मात्र बदलापुरात आज काहीसं उलटं चित्र पाहायला मिळालं. कारण नियम मोडणाऱ्यांना पावती नव्हे, तर चक्क गुलाबाचं फुल देत वाहतूक पोलिसांनी समज दिली. पोलिसांनी गुलाबाचे फुल देत वाहतुकीचे नियम पाळा, असे आवाहान प्रवाशांना केले.
बदलापुरात शहरात आज वाहतूक पोलिसांचं एक वेगळं रूप पाहायला मिळालं. याला निमित्त होतं ते “नो चलान डे” चं. बदलापूरच्या गांधी चौक आणि स्टेशन परिसरात आज सकाळपासून वाहतूक पोलीस बंदोबस्तावर होते. नेहमीप्रमाणे एखादा नियम मोडणारा वाहनचालक दिसला की त्याला बाजूला घेतलं जात होतं. मात्र त्याच्याकडून दंड घेतला जात नव्हता. तर चक्क गुलाबाचं फुल देऊन त्याच्यासोबत फोटोसेशन केलं जात होतं. तसेच पुढच्या वेळी चूक करू नका, अशी गोड समज दिली जात होती.
राज्य सरकारनं वाहतूक विभागाचे नियम बदलले असून आता दंडाची रक्कम मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर वाहनचालकांमध्ये जनजागृती करून त्यांना नियम पाळण्याचं आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलं. तर रिक्षाचालकांनाही नियम पळून रिक्षा चालवण्याचं आवाहन करण्यात आलं. मात्र ही गोड भाषा नियम मोडणाऱ्यांना किती दिवस लक्षात राहते, हेदेखील पाहणं महत्त्वाचं आहे. अन्यथा पुढच्या वेळी मात्र पावती फाडावी लागणार आहे.
दरम्यान, नो चलान डेच्या निमित्ताने ठाण्यात वाहतूक पोलिसांनी जनजागृती केली. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करतील अशा 10 ते 15 वाहन चालकांचे गट तयार करून त्यांना महत्वाच्या ठिकाणी नेऊन त्यांचे वाहतूक नियमांसंदर्भात 15 ते 20 मिनिटे समुपदेशन करण्यात आले. त्यांना वाहनांची कागदपत्रे तपासून अपूर्ण कागदपत्रांची जाणीव करून देण्यात आली.
इतर बातम्या :