ST Strike: मेस्मा लावण्याची धमकी म्हणजे मुघलशाही, पडळकरांची परबांवर टीका; करोडोंच्या जमिनीवर डोळा असल्याचा आरोप

ST Strike: मेस्मा लावण्याची धमकी म्हणजे मुघलशाही, पडळकरांची परबांवर टीका; करोडोंच्या जमिनीवर डोळा असल्याचा आरोप
अनिल परब, परिवहन मंत्री.

परिवहन मंत्री अनिल परबांची आंदोलनकर्त्या एस. टी. कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्याची धमकी म्हणजे हा मुघलशाहीचा प्रकार आहे, अशी घणाघाती टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

राहुल झोरी

| Edited By: मनोज कुलकर्णी

Dec 11, 2021 | 11:45 AM

मुंबईः परिवहन मंत्री अनिल परबांची आंदोलनकर्त्या एस. टी. कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्याची धमकी म्हणजे ही मुघलशाही आहे, अशी घणाघाती टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ज्या पद्धतीने मुंबई मिल कामगारांचा संप चिघळवला आणि नंतर मिल मालकांसोबत मिलीभगत करत जमिनी विकून करोडोंची टक्केवारी गोळा केली. त्याच हेतूने एस. टी. कर्मचाऱ्यांचा संप चिघळवून विविध शहरातील करोडोंच्या जमिनीचा विल्हेवाट लावण्याचा परबांचा डाव दिसतोय, असा आरोपही त्यांनी केला.

काय म्हणाले परब?

परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर यावे, असे आवाहन पुन्हा एकदा केले आहे. ते म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे एकूण 10 हजार कामगारांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र, या कामगारांना एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपर्यंत कर्मचारी कामावर आले तर त्यांचे निलंबन मागे घेतले जाईल, असे सांगतानाच सोमवारपर्यंत मेस्मा न लावण्याचा तूर्तास निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. जे कामगार सोमवारपर्यंत कामावर येतील त्यांचे निलंबन मागे घेऊ. जो डेपो 50 टक्के संख्येने सुरू होईल त्यांना तिथेच कामावर घेऊ. पण जिथे ही संख्या पूर्ण होत नाही. त्यांना बाजूच्या डेपोत सामावून घेतले जाणार आहे. त्याबाबतचे लेखी आदेश काढणार आहोत, असे परब यांनी सांगितले आहे.

पडळकर आक्रमक

परिवहन मंत्री अनिल परबांच्या इशाऱ्यानंतर गोपीचंद पडळकर आक्रमक झाले आहेत. ते म्हणाले की, परबांनी आपले अपयश झाकण्याकरिता, मी आणि सदाभाऊ हे एस. टी. कर्मचाऱ्यांचे डोके भडकवत आहोत, असे वारंवार आरोप केले. पण तीन आठवड्यांचा कालावधी गेल्यानंतरसुद्धा ते आपल्या विभागाच्या कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी मंत्री म्हणून अपयशी ठरले आहेत. आता ते मुघलशाही पद्घतीने मेस्मा कायदा लावण्याची धमकी देतायेत. त्याचा आम्ही विरोध व निषेध करत असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी

पडळकर म्हणाले की, ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी करत अधिकाऱ्यांमार्फत माझ्यावर दबाव आणण्यासाठी माझ्या भावाला बेकायदेशीरपणे सांगली जिल्हाबंदी केली आहे. त्याच चलाखीचा वापर करत जर खरोखर मनापासून कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन केला असता, तर आज नक्कीच काही तरी मार्ग निघाला असता. मात्र, ज्या पद्धतीने मुंबई मिल कामगारांचा संप चिघळवला व शेवटी अनिर्णयीत परिस्थितीत आणून ठेवला आणि नंतर मिल मालकांसोबत मिलीभगत करत जमिनी विकून करोडोंची टक्केवारी गोळा केली होती. त्याच हेतूने एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळवून विविध शहरातील करोडोंच्या जमिनीचा विल्हेवाट लावण्याचा परबांचा डाव दिसतोय, असा आरोपही त्यांनी केला.


इतर बातम्याः

scam: आदिवासी महामंडळ नोकरभरती घोटाळ्यात 2 बड्या अधिकाऱ्यांवर 5 वर्षांनी गुन्हा, राजकीय पदाधिकाऱ्याला अभय

Special Report: जीवन नशीलं, राज्यसत्ता कारस्थान अन् राज्य लोकांना भ्रष्ट करणारं षडयंत्र; सत्य उच्चारून श्वास सोडणाऱ्या ‘लिओ’ची चित्तरकथा!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें