तंत्र-मंत्रासाठी वाघाच्या अवयवाची मागणी, मेळघाटात शिकारी टोळ्या अटकेत

तंत्र-मंत्रासाठी वाघाच्या अवयवाची मागणी, मेळघाटात शिकारी टोळ्या अटकेत

अमरावती : वाघ वाचवण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी वाघाचा जीव घेण्यासाठी टपून बसलेले अनेक आहेत हे पुन्हा एकदा समोर आलंय. सूत्रांच्या माहितीनुसार, मध्य भारतातील एक नाही, तर तीन-तीन शिकारी टोळ्यांचा पर्दाफार्श सध्या सुरु असलेल्या मेळघाट वन विभाग चौकशीत झाला आहे. वाघाच्या शिकारीसाठी पैसा हे तर कारण आहेत. पण मध्य भारतात गेल्या दोन ते तीन वर्षात तंत्र-मंत्रासाठी म्हणून वाघाच्या अवयवाच्या मागणीत मोठी भर पडली असल्याचं बोललं जातंय

भोंदू बाबांनी लोकांना वाघाच्या शिकारीसाठी भाग पाडलंय. ‘वाघाच्या कातडीचा उपयोग करून छतातून पैशाचा पाऊस पाडता येतो. वाघाच्या सुळ्यांना लॉकेटमध्ये घातले की चांगले दिवस येतात. पंजेही तंत्र-मंत्रासाठी वापरले जाऊ शकतात. हेच चांगले दिवस वाघाच्या मिश्या जवळ बाळगल्यानेबी येतात. वाघाच्या मिश्या कोणाच्या अन्नात टाकल्या तर ते विषाचे काम करते,’ अशा अनेक गैरसमजुती आणि अंधश्रद्धा तंत्र-मंत्राच्या आणि मांत्रिकांच्या जगतात आहेत. मात्र त्याचा धक्कादायक परिणाम हा आहे की गेल्या काही वर्षात मध्य भारतात या अवयवांच्या मागणीत प्रचंड वाढ झाल्याचं बोललं जातंय. यामुळेच वाघाच्या शिकारीला महत्त्व आलंय.

अमरावतीमध्ये वाघाच्या शिकारीप्रकरणी एका पाठोपाठ एक अटक करण्यात आलेल्या टोळ्यांमुळे हा धक्कादायक खुलासा समोर आलाय. आरोपींचा एकूण आकडा आता 13 झाला आहे. एका प्रकरणात वाघाचे पंजे कापून नेले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपींच्या चौकशी दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली. पाच आरोपींनी चार वाघ आणि एक बिबट्या मारल्याची कबुली दिली, तर परतवाडा चिखलदारा मार्गावर भिलखेडा येथे कातडीसह सहा आरोपी अटक झाले. त्यांच्याकडेही वाघाचे इतर अवयवाचे अवशेष होते.

चौरकुंड वन परीक्षेत्र चोपण गावातील दोन अटक आरोपींनी वाघाला विषप्रयोग करून मारल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून वाघाची हाडे आणि नखे जप्त करण्यात आली आहेत. या चौकशीतून स्थानिक पातळीवर तीन शिकारी टोळ्या कार्यरत असल्याचं समोर आलंय. या टोळ्यांचे पुढचे खरेदीदार आणि धागे थेट मध्यप्रदेशशी जुळले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, कबुलीत हा खटाटोप घालणाऱ्या या टोळीला वाघाच्या एका कातडीचे 10 हजार रुपये मिळतात. तेही या टोळीला आपापसात वाटून घ्यावे लागतात.

स्थानिक शिकारी हे जास्त विषप्रयोग करतात. तर मध्यप्रदेशप्रणित शिकारी असेल तर कटणी ट्रॅप वापरल्याचे पाहिले जाते. शोकांतिका हीच आहे की अवघ्या 10 हजार रुपयांसाठी एक पूर्ण टोळी वाघ मारायला तयार होते. पुढे त्याची किंमत ही लाखात असली, तरी इथल्या टोळींना मात्र गरीबीवर तात्पुरतं उत्तर हे एवढंच कारण आहे. जंगलावर आधारित दिनचर्या असणारे हे शिकारी पशुपालन करतात. लाकूड, बांबू, डिंक, मोहफुले अशा व्यवसायावर जगतात. पण पैशांमुळे वाघ मारायलाही तयार होतात.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI