आख्खी ऊसाची ट्रॉली धाडधाड रिल्सस्टारच्या अंगावर, नवऱ्याचा मृत्यू, ती मात्र वाचली! न्यायासाठी आंदोलन
बीड येथील रील स्टार गणेश डोंगरे यांचा ऊसतोडणीच्या ठिकाणी भीषण अपघात झाला. पत्नी अश्विनी फेसबुक लाईव्ह करत असतानाच त्यांच्यावर ऊसाची ट्रॉली कोसळली, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अश्विनी मात्र थोडक्यात बचावली. सोशल मीडियावर याची प्रचंड चर्चा असून, डोंगरे कुटुंबाला कारखान्याकडून आर्थिक मदतीची मागणी केली जात आहे.

बीडमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका रिलस्टारबाबतची ही घटना आहे. दोघं नवरा बायको रिलस्टार होते. त्यांच्या रिल्स तुफान चालायच्या. गावचं निसर्ग सौंदर्य अस्सल गावराणी भाषेत दाखवायचे. दोघेही ऊसतोड कामगार मजूर. पण सोमवारचा दिवस त्यांच्यासाठी अत्यंत काळाकुट्ट ठरलं. फेसबुक लाइव्ह करण्यासाठी ही महिला थोडी बाजूला आली. एकच मिनिट झाला असेल अचानक ऊसाची ट्रॉली कोसळली आणि त्यात तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वच हादरून गेले आहेत. या घटनेनंतर ऊसतोड कामगार संतप्त झाले असून त्यांनी गणेश डोंगरे यांच्या कुटुंबीयांना कारखान्याकडून आर्थिक मदत मिळावी म्हणून आंदोलन सुरू केलं आहे.
बीडच्या वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी येथील गणेश डोंगरे हे पत्नी अश्विनीसह लातूर जिल्ह्यातील साखर कारखान्यावर ऊस तोडीसाठी गेले होते. ऊस वाहतुकी दरम्यान त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर ट्रॉली कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे डोंगरे कुटुंब उघड्यावर आले असून आता या कुटुंबाला कारखान्याने मदत करावी, अशी मागणी नातेवाईकांकडुन केली जात आहे. दरम्यान अश्विनी आणि गणेश डोंगरे हे वेगवेगळ्या रिल्स च्या माध्यमातून सोशल मीडियात देखील लोकप्रिय होते. रील स्टारचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्याने त्यांच्या चाहत्यांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना फेसबुक लाईव्ह सुरू असताना मोबाईलमध्ये कैद झाली आहे.
नेमकं काय घडलं?
गणेश आणि अश्विनी नेहमीप्रमाणे साखर कारखान्यावर आले होते. ऊस तोडणीच्या कामासाठी ते आले होते. साखर कारखान्यात वजन काट्याजवळ ऊस मोजणीसाठी बरीच गर्दी होती. त्यामुळे गणेश आणि त्याचा साथीदार नंबर येण्याची वाट पाहत होते. नंबर यायला वेळ लागणार असल्याने अश्विनीने फेसबुक लाइव्ह सुरू करून साखर कारखान्याची माहिती द्यायला सुरुवात केली. ऊसाच्या आलेल्या ट्रॉल्या, ड्रायव्हरने गाड्या कश्या उभ्या केल्या आणि लोकं कसे जागीच बसून जेवत आहेत याची माहिती अश्विनी देत होती. नवऱ्यापासून दूर जाऊन एकच मिनिट झाला असेल. तेवढ्यात गणेश ज्या ठिकाणी बसला होता तिथे अचानक ऊसाची ट्रॉली कोसळली. हे पाहून लगेचच बयो म्हणून किंचाळली. केवळ एका मिनिटाच्या अंतरामुळे अश्विनीचा जीव वाचला होता. पण तिच्या आयुष्याच्या साथीदाराचा मृत्यू झाला होता.
गणेशच्या अंगावर ऊसाची ट्रॉली पडताच लोकं धावली. सर्वांनी तात्काळ गणेशला रुग्णालयात नेले. पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे सर्वच हादरून गेले आहेत. डोंगरे कुटुंबावर आणि डोंगरेवाडीवरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. डोंगरे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घरातील कर्ता पुरुषच राहिला नाही. त्यामुळे कारखान्याने डोंगरे कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी केली जात आहे.
नातेवाईक आणि कामगारांचं आंदोलन
गणेशच्या मृत्यूमुळे ऊसतोड कामगार भयभीत झाले आहेत. या कामगारांनी आणि त्याच्या नातेवाईकांनी उमरगा तालुक्यातील साखर कारखान्यावर आंदोलन सुरू केलं आहे. गणेशच्या मुलांना 10 लाखांची मदत देण्याची मागणी नातेवाईकांनी केला आहे. तीन मुलींच्या नावे 10 लाखांची एफडी करण्यात यावी अशी मागणी हे आंदोलक करत आहेत. कारखान्याच्या गव्हाणीतच बसून आंदोलन सुरू आहे.
