
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या सुनेच्या आत्महत्येप्रकरणी रोहित पवारांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहिली आहे. ‘हे प्रकरण साधं दिसत नाहीये. तिच्या अंगावरील जखमा या भयानक असून यावरून ही आत्महत्या नाही तर हत्या असल्याचाच संशय येतोय. पण अजूनही तिचा पती आणि सासरा हे फरार आहेत. त्यांनी खरंच पोलिसांना गुंगारा दिलाय की पोलिसांच्या आशीर्वादाने गायब झाले, हे कळत नाही. पण पैशासाठी माणसाचा जीव घेणाऱ्या अशा लालची, लोभी आणि निर्दयी आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी सरकारने फरार आरोपींना तातडीने अटक करावी, ही विनंती’, असं त्यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे हाँगकाँग, सिंगापूर आणि दक्षिण आशियामध्ये करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मुंबईमध्येही करोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. मुंबईमध्ये मागील 21 दिवसांमध्ये करोनाचे 120 रुग्ण सापडले असून दोघांचा करोनाने मृत्यू झाला आहे. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा..
रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेतकरी, चाकरमानी आणि मच्छीमार वर्ग यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. अनेक ठिकाणी लग्न कार्य सुरु असताना आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
धाराशिवच्या तुळजापुरात विजांच्या कडकडाटसह मुसळधार पाऊस
तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची तारांबळ
पावसामुळे नववधूवरांचीही फजिती
तुळजाभवानी मंदिराच्या दालनातील व्यापाऱ्यांचे पावसामुळे हाल
धाराशिव जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसापासून पाऊस सुरूच
कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर प्रथमच छगन भुजबळ यांचं मतदारसंघात आगमन
येवला-लासलगाव विधानसभा मतदार संघातील विंचूर येथे मंत्री छगन भुजबळांचे जंगी स्वागत
फटाक्याची आतिषबाजी आणि क्रेनच्या साह्याने वीस फुटी हार घालून भुजबळांचे स्वागत
भुजबळांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते हजर
हगवणे कुटुंबाच्या जाचाचा त्यांची सून मयुरी जगताप यांनी पर्दाफाश केला आहे. सून, नणंद आणि दीर यांच्याकूडन मला त्रास दिला जायचा, असं मयुरी जगताप यांनी सांगितलंय.
जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथील प्रसिद्ध दल सरोवरावर भाजपने तिरंगा शिकारा रॅलीचे आयोजन केले होते. ऑपरेशन सिंदूरसाठी भारतीय सशस्त्र दलांच्या सन्मानार्थ तिरंगा रॅली काढण्यात आली.
बिकानेरमधील जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देश विकसित भारताकडे वाटचाल करत आहे. येथील प्रत्येक क्षेत्रात जलद गतीने काम केले जात आहे.
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप असलेल्या ज्योतीच्या रिमांडमध्ये आणखी 4 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. पोलिसांनी रात्री 11.15 वाजता ज्योतीची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर, आज सकाळी 9.30 वाजता त्याला हिसार न्यायालयात हजर करण्यात आले, जिथून पोलिसांना आणखी 4 दिवसांची रिमांड मिळाली.
सुरक्षा यंत्रणांच्या तपासात असे दिसून आले आहे की दिल्लीतील पाक उच्चायुक्तालयात तैनात असलेला एहसान उर रहमान उर्फ दानिश हा आयएसआय एजंट होता.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आता उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणालेत की, “या प्रकरणाची पोलिसांनी कसून चौकशी केली पाहिजे. ती जर हत्या असेल तर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. या महाराष्ट्रात पुन्हा अशा हुंड्यासाठी किंवा पैशांसाठी हत्या करण्याचे धाडस कोण करणार नाही.” अशी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे.
मान्सूनपूर्व पावसाचा आंबोली घाटाला फटका बसला आहे.आंबोली घाटात दरड कोसळल्याने वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.घाटातील एका वळणावर मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर आले. यामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक पूर्णपणे थांबली.या मार्गावरून प्रवास करणाऱ्या अनेकांना अडकून पडावे लागले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाचे अधिकारी आणि बांधकाम विभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी यंत्रसामुग्रीच्या साहाय्याने रस्त्यावर आलेली दरड हटवण्याचे काम तातडीने सुरू केले आहे.
श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ अबुधाबीला पोहोचलं आहे. सर्व शिष्टमंडळाने मंत्री शेख यांची भेट घेतली. श्रीकांत शिंदें यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली. ऑपरेशन सिंदूरची यशोगाथा यावर चर्चा करण्यात आली.
सध्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी तिचा छळ केला आणि त्यामुळे मुलीचा जीव गेला असा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला होता. आता तृप्ती देसाईंनी वैष्णवीच्या कुटुंबीयांची, कस्पटे कुटुंबाची भेट घेतली आहे.
वैष्णवी हगवणेच्या काकांनी नुकताच या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘आमचं बाळ आमच्या ताब्यात मिळालं आहे. आम्हाली बाकी काहीच बोलायचे नाही. आता आरोपी कसे पकडले जातील एवढच पाहायचं आहे. आरोपींना लवकरात लवकर पकडावं आणि योग्य ती शिक्षा द्यावी ही विनंती आहे. हे बाळ एका अज्ञात व्यक्तीने आम्हाला फोन केला आणि बाणेरच्या हायवेवर आमच्या ताब्यात दिले. आम्ही ते आमच्या ताब्यात घेतलं. आमचं बाळ सुखरुप आहे. आम्ही आनंदी आहोत. त्यांनी इतर कोणतीही माहिती दिली नाही. आम्ही अज्ञात व्यक्ती कोण आहे? काय आहे? हेही विचारलं नाही.’
पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेने हुंड्याच्या छळामुळे आत्महत्या केल्याची घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी आहे. वैष्णवीने आधीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तिचे लव्ह मॅरेज झाले होते, पण लग्नानंतर तिचा सासऱ्यांकडून छळ सुरू झाला. आता तिचे सहा महिन्याचे बाळ आई-वडिलांकडे सोपावण्यात आले आहे.
हे बाळा जसं माझ्या ताब्यात दिलं, तस माझ्या मुलीला न्याय द्यावा. लवकरात लवकर हगवणे कुटुंबातील सदस्यांना अटक करावी. पक्षातून हकालपट्टी करून भागणार नाही तर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी वैष्णवीचे वडील, अनिल कस्पटे यांनी केली आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांना फोन केला. या प्रकरणात इतर कारवाई होत असताना, वैष्णवीचे 9 महिन्यांचं बाळ कुठे आहे, याचा तातडीने शोध घ्या आणि ते तिच्या आईच्या कुटुंबीयांना सुपूर्द करा, अशी विशेष सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.
या प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशसुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
माझा त्या प्रकरणाशी दुरान्वयेही संबंध नाही. मी त्यासंदर्भात पत्रकार परिषद घेणार आहे, वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी अजित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परळ रेल्वे स्थानकातील पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या व्हिडिओ कॉन्फरन्स कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या हस्ते अमृत भारत स्टेशन योजनाअंतर्गत 103 पुनर्वीकसिक स्टेशनांचे उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमात असलेल्या परळ रेल्वे स्थानकाचे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन होईल.
या संपूर्ण प्रकरणावर मंत्री अर्जुन खोतकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकार आणि समितीला बदनाम करण्यासाठी हा प्लॅन तर आखला नाही ना, असा सवाल खोतकरांनी केला आहे. आपण हे सर्व आरोप फेटाळत असल्याचे खोतकर म्हणाले. तर गोटे यांना असे आरोप करण्याची जुनी सवयच असल्याचा आरोप ही खोतकरांनी केला आहे.
लवकरच उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचे धाराशिव रेल्वे स्थानक नाव होणार आहे. राज्य सरकारने पाठवलेल्या प्रस्तावाला केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची मंजुरी दिली. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडून नामांतर प्रक्रियेसाठी पाठपुरावा केला होता.
भारत आणि पाकमधील संघर्षात अमेरिकेची मध्यस्थी झाली नसल्याचे खणखणीत उत्तर भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिले. त्यांनी ट्रम्प यांचा श्रेय लाटण्याचा दावा खोडून काढला.
वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याचा आरोप असणारे राजेंद्र हगवने आणि त्यांचा मुलगा सुशील अजूनही फरार आहेत. दोन्ही आरोपींना शोधण्यासाठी बावधन पोलिसांची दोन पथके परराज्यात गेल्याची माहिती मिळतेय. तर मयत वैष्णवी यांचं 10 महिन्याचे चिमुकले बाळ ज्या निलेश चव्हाण नामक व्यक्तीकडे होतं त्याने ते बाळ हगवणे कुटुंबीयांकडे सुपूर्द केल्याची माहिती मिळतेय
राजेंद्र हागवणे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी दिली. सगळ्या पदावरून त्यांना काढून टाकण्यात आला आहे. जी घटना त्यांच्या घरात घडली ती मानवतेला काळीमा फासणारी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या प्रवृत्तीचा निषेध करते, असे ते म्हणाले.
धुळ्यातील शासकीय विश्रामगृहातील रोकड प्रकरणा संजय राऊत यांनी जोरदार हल्ला चढवला. अंदाज समितीच्या कारभारवर त्यांनी आसूड ओढला. विधीमंडळापर्यंत त्याचे तार असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
लोणावळ्यात पर्यटकांना झोडपून काढलं. गेल्या 24 तासात लोणावळ्यात 26 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. या वर्षात 165 मिलिमीटर पाऊस कोसळला आहे. गेल्या वर्षी आत्तापर्यंत केवळ 54 मिलिमीटर इतका पाऊस झाला होता.
अमेरिकेत इस्रायली दुतावासामधील 2 कर्मचाऱ्यांची हत्या झाली आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टनमधील कार्यक्रमाला हे कर्मचारी गेले असताना त्यांची गोळ्या झाडून हत्या झाली. इस्रायली दूतावासाचे प्रवक्ते ताल नैम यांची ट्विट करत ही माहिती दिली.
आळंदीमधील इंद्रायणी नदी पुन्हा फेसळली आहे. अवघ्या महिनाभरावर आळंदीत आषाढी यात्रेचा सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर इंद्रायणी नदीत वारंवार फेसाळत आहे. महानगरपालिकेकडून यासंदर्भात काहीच उपाययोजना होत नाही.
गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणारी दोन विमाने वळवण्यात आली. एक पुण्याहून आणि दुसरे मुंबईहून कमी दृश्यमानतेमुळे अन्य विमानतळांवर वळवली गेली. पुणे-गोवा विमान मंगळवारी हैदराबादला वळवले गेले. तसेच मुंबई-गोवा विमान बेळगावला वळवले गेले.
जळगावात एमआयडीसीच्या परीक्षेत डमी उमेदवार बसवून नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. उमेदवाराचा अर्जातील फोटो, परीक्षेतील फोटो व कागदपत्र पडताळणी वेळीच्या तफावत आढळून आल्यावर संपूर्ण प्रकार उघड झाला होता.
मागील पंधरा ते वीस दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. यामुळे सुरू असलेल्या खरीप हंगामातील पूर्व मशागतीच्या कामांना आता ब्रेक लागल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. अजून पुढील दोन दिवस पाऊस आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
पुणे- बाणेर टेकडीवर फिरायला आलेल्या कोरियातील अभियंता तरुणाला लुटल्याच्या घटनेनंतर तळजाई टेकडीवर आणखी एक प्रकार घडला आहे. या टेकडीवर फिरायला गेलेल्या युवकाला तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखवून त्याच्या गळ्यातील दीड लाख रुपयांची सोनसाखळी चोरांनी लुटली. टेकड्यांवरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
जळगाव जिल्ह्यात १४ दिवसांत पडलेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीमुळे ७ हजार ४८२ हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक ४ हजार ४०९ हेक्टर एवढे केळीचे नुकसान झाले आहे. केळीपाठोपाठ फळे आणि मका पिकाला मोठा फटका बसला आहे. वादळासह झालेल्या मान्सूनपूर्व पाऊस तसेच विजांच्या कोसळल्याने जिल्ह्यात एकूण १८ जनावरांचा मृत्यू झाला आहे.
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी ज्योती मल्होत्रा मुंबईत आली होती. तिने लालबागच्या राजाच्या गर्दीचे व्हिडीओ काढले होते. तिने चार वेळा मुंबई दौरा केल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या ज्योती मल्होत्राने अखेर आयएसआयशी संबंधांची कबुली दिली आहे. याचदरम्यान आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सह्याद्री अतिथी गृह इथं उद्या दुपारी ३ वाजता उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मनसे शिष्टमंडळ आणि सिडको सोडतधारक यांची बैठक होणार आहे. सिडकोच्या २६ हजार घरांच्या सोडती मधील महाग घरांच्या किंमती कमी व्हाव्यात म्हणून मनसे प्रवक्ते गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मागील तीन महिन्यांपासून सिडको सोडतधारक यांचे आंदोलन सुरु आहे.
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर भाजप नेत्याच्या गाडीचा अपघात झाला आहे. सोलापुरातील चिखली गावाजवळ हा अपघात झाला. सोलापूर-पुणे रस्त्याच्या विस्तारिकरणाचं काम सुरू आहे. मात्र रस्ते कंत्राटदाराने काम सुरू असलेल्या रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक बसवले नसल्याने अपघात झाल्याची तक्रार अपघातग्रस्त नागरिक करत आहेत. दरम्यान या ठिकाणी एकाचवेळी भाजप नेत्यासह आणखी एका गाडीला अपघात झाला आहे. दोन्हीही गाडीतील अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मुंढेगाव इथल्या जिंदाल कंपनीत लागलेल्या आगीची परिस्थिती जशीच्या तशी आहे. एबीसीडी विभाग आगीच्या पूर्ण भक्ष्यस्थानी असून या आगीत कंपनीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. फोमच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते. परंतु पूर्ण आग विझण्यास अजून तीन ते चार दिवस लागण्याची शक्यता आहे.
“वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण हे साधं दिसत नाहीये. तिच्या अंगावरील जखमा या भयानक असून यावरुन ही आत्महत्या नाही तर हत्या असल्याचाच संशय येतोय. पण अजूनही तिचा पती आणि सासरा हे फरार आहेत. त्यांनी खरंच पोलिसांना गुंगारा दिलाय की पोलिसांच्या आशिर्वादाने गायब झाले, हे कळत नाही. पण पैशासाठी माणसाचा जीव घेणाऱ्या अशा लालची, लोभी आणि निर्दयी आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी सरकारने फरार आरोपींना तातडीने अटक करावी, ही विनंती,” असं ट्विट रोहित पवारांनी केलंय.
कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल 10 ते 12 मिनिटे उशिराने धावत आहेत. तांत्रिक बिघाड आणि सिग्नल अडचणींमुळे लोकल गाड्या 10 ते 15 मिनिट उशिराने धावत आहेत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. त्यामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्या त्याचबरोबर सिग्नल यंत्रणा आणि तांत्रिक बिघाडामुळे लोकल ट्रेन उशिराने धावत आहेत.