Maharashtra Breaking News LIVE : मराठा उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील जरांगेंच्या भेटीला

Maharashtra Political News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE : मराठा उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील जरांगेंच्या भेटीला
Breaking news
| Edited By: | Updated on: Oct 11, 2025 | 8:33 AM

जालना शहरातील रेल्वे स्थानकाबाहेर पाणी विक्रीच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी झाली असल्याची घटना समोर आलीय. स्थानकावर असलेल्या परवानाधारक कॅन्टीन चालकाने बाहेरील पाणी विक्रेत्यांना रेल्वे स्थानकावर मज्जाव केल्याने दोघांमध्ये बाचाबाची,भांडण झाले. या नंतर हे दोन गट थेट समोरासमोर भिडले आणि तुंबळ हाणामाऱ्या झाल्या. या प्रकरणी पोलिसांनी हस्तक्षेप करत वाद मिटवला. याप्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये पाच आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत कॅन्टीन चालकासह 2 जण जखमी झालेत. त्यांच्यावरती सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे. नाशिकच्या वाढत्या गुन्हेगारीत राजकीय कनेक्शन उघड. पोलीस तपासात आली धक्कादायक बाब समोर. सातपूर गोळीबार प्रकरणात आरपीआयच्या बड्या नेत्याला अटक. आरपीआय आठवले गटाचा नेता प्रकाश लोंढे गजाआड.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 09 Oct 2025 07:59 PM (IST)

    कपिलधारवाडी येथील भूस्खलनग्रस्त भागाची भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाकडून पाहणी

    कपिलधारवाडी येथील भूस्खलनग्रस्त भागाची भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाकडून पाहणी

    जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला अहवाल सादर

    दहा फूट डोंगर खचल्याचं अहवालातून स्पष्ट

    खाली दरी असून दरीकडे डोंगर खचत चालला आहे, तर दुसरीकडे गावाच्या वरच्या बाजूला मोठा डोंगर

    डोंगरावरील दगडं खाली कोसळण्याची भीती

     

     

  • 09 Oct 2025 07:35 PM (IST)

    ई-बस प्रवाशांसाठी एसटीकडून मासिक व त्रैमासिक पास योजना सुरु

    महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई-बस सेवेला अधिक प्रतिसाद मिळवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता राज्यातील ई-बस प्रवाशांना मासिक व त्रैमासिक पास सवलत योजना उपलब्ध होणार आहे. पास योजनांचा मुख्य उद्देश नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने दररोज एकाच मार्गावर प्रवास करणाऱ्या नियमित प्रवाशांना ई-बस सेवेकडे आकर्षित करणे हा आहे.

     

     

  • 09 Oct 2025 06:58 PM (IST)

    मराठा उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील जरांगेंच्या भेटीला

    मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. जरांगेंची अंतरवाली सराटी येथे त्यांच्या निवसस्थानी भेट घेतली. ओबीसींचा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची आहे.

  • 09 Oct 2025 06:47 PM (IST)

    देशात सुशासन हा शब्द लागू करण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले: अमित शहा

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी सुशासनाची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. त्यांनी देश सुरक्षित करण्याचे,  अर्थव्यवस्था पुढे नेण्याचे आणि स्वातंत्र्याच्या शताब्दी साजरी झाल्यावर जगात प्रत्येक क्षेत्रात प्रथम क्रमांकावर असलेले राष्ट्र निर्माण करण्याचे वचन दिले आहे.

  • 09 Oct 2025 06:34 PM (IST)

    बिहार: जन सूराज पक्षाने 51 उमेदवारांची घोषणा

    जन सूराज पक्षाने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 51 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये सोनपूरचे चंदन मेहता, बेलहारचे ब्रिजकिशोर पंडित, कारगहरचे रितेश पांडे आणि सिंगर यांचा समावेश आहे.

  • 09 Oct 2025 06:17 PM (IST)

    हंगेरियन लेखक लास्जलो क्रास्जनाहोरकाई यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक

    2025 चा साहित्यातील नोबेल पुरस्कार हंगेरियन लेखक लास्झ्लो क्रॅस्नाहोरकाई यांना त्यांच्या आकर्षक आणि दूरदर्शी कार्यासाठी देण्यात आला आहे.

  • 09 Oct 2025 06:13 PM (IST)

    सोलापुरात दोन शाखांमध्ये चेक चोरीला जाण्याचा घडला प्रकार

    शेतकऱ्याचा बँकेतून चोरी झालेल्या 4 लाखाच्या चेकचे प्रकरण समोर आलं आहे.  सोलापुरात दोन शाखांमध्ये चेक चोरीला जाण्याचे प्रकार घडले आहेत. पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी माहिती दिली आहे. बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला अर्ज दिलेला आहे, त्यामध्ये ठेवीदाराचा चेक चोरीला गेला असा उल्लेख आहे.  चेक दुरुस्ती करण्याच्या कारणाने ड्रॉप बॉक्स मधून चेक स्वतः च्या हातात घेतला आणि त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर करून संबंधित खात्यातील पैसे ट्रान्सफर करून घेतले आहेत.  एफआयआर दाखल झाल्यानंतर पुढील तपास केला जाईल.

  • 09 Oct 2025 06:01 PM (IST)

    बीडमधील कपिलधारवाडी येथील भूस्खलनग्रस्त भागाची पाहणी

    बीडमधील कपिलधारवाडी येथील भूस्खलनग्रस्त भागाची भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाकडून पाहणी करण्यात आली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला या पाहणीचा अहवाल सादर करण्यात आला आहे. दहा फूट डोंगर खचल्याचं स्पष्ट या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.

    खाली दरी असून दरीकडे डोंगर खचत चालला आहे. तर गावाच्या वरच्या बाजूला मोठा डोंगर आहे. त्यावरील मोठे दगड देखील कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तीन ते चार कुटुंब सर्वाधिक प्रभावित आहेत. मात्र संपूर्ण गावाला सद्यस्थितीला धोका नसल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र नागरिकांचं स्थलांतर करण्याचा भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाचा सल्ला आहे.

  • 09 Oct 2025 05:33 PM (IST)

    डोंबिवलीत शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची गाडीची तोडफोड

    डोंबिवलीतील गावदेवी परिसरातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. पैशांच्या देवाणघेवाण वरून नातेवाईकांचा भर रस्त्यावर वाद झालेला पाहायला मिळाला.

    शिवसेना ठाकरे गट पदाधिकारी सुजल म्हात्रे यांची गाडी अडवून गाडीची तोडफोड करण्यात आली. भररस्त्यात राडा घातला गेला. राडा करणाऱ्या रोहन म्हात्रे, रोमेश म्हात्रे आणि रुचित म्हात्रे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच तोडफोड करणारे नातेवाईक असून त्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारीची असल्याची माहिती आहे.

  • 09 Oct 2025 05:06 PM (IST)

    केडीएमसीची सफाई कामगारांवर कारवाई, कारण काय?

    कल्याण डोंबिवली महानगर पालिकेकडून सफाई कामगारांवर कारवाई करण्यात आली आहे. केडीएमसीने एकाच वेळेला 50 सफाई कामगारांना तडकाफडकी कामावरून कमी केलं आहे. त्यामुळे मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. कामगारांनी मुख्यालयाबाहेर कामबंद सुरू केले आहे. तसेच केडीएमसीची हिटलरशाही खपवून घेणार नाही, मनसेने असा इशारा पालिकेला दिला आहे.

  • 09 Oct 2025 04:56 PM (IST)

    मनसेचा वाशी वॉर्ड ऑफिसवर टाळ वाजवा मोर्चा, लोकांच्या समस्यांकडे वेधले लक्ष

    नवी मुंबई – विविध नागरी समस्यांसाठी मनसेने वाशी वॉर्ड ऑफिसवर “टाळ वाजवा मोर्चा” आयोजित केला होता. वाशी विभागातील नागरिक विविध समस्यांनी त्रस्त आहेत. खराब रस्ते-पदपथ, मलेरिया डेंग्यू ची साथ, अतिक्रमणाचा विळखा, अपुरा आणि दूषित पाणी पुरवठा, उद्यानाची दूरवस्था, रस्त्यावर पडलेला घनकचरा, अशा विविध नागरी समस्यांनी वाशी मध्ये थैमान घातले आहे. त्यामुळेच हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता.

  • 09 Oct 2025 04:36 PM (IST)

    बीडमधील एल्गार ग्रुपचा ठाकरेंच्या शिवसेनेत आज पक्षप्रवेश

    बीड – शहरातला एल्गार ग्रुप ठाकरेंच्या शिवसेनेत आज करणार पक्षप्रवेश आहे. बिलाल भाई शेख यांच्यासह शेकडो तरुण संभाजीनगरच्या दिशेने रवाना झाले आहेत. जिल्हाध्यक्ष गणेश वरेकर यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश होणार आहे.

  • 09 Oct 2025 04:02 PM (IST)

    अर्नाळ्यात प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक, पोलिसांना मोठे यश

    विरारच्या अर्नाळा गावातील कुटुंबावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात क्राईम ब्रँच युनिट 3 च्या पथकाला यश आले आहे. ऑनलाईन गेम खेळण्याच्या नादात कर्जबाजारी झाल्याने चोरीच्या उद्देशाने घरात घुसताच घरातील व्यक्ती जागी झाल्याने चोरी न करता धारदार हत्याराने वार करून आरोपी फरार झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. अर्नाळा गावातील बंदरपाडा येथील गोवारी कुटुंबावर सोमवारी पहाटे 3 वाजता हा प्राणघातक हल्ल्या करून फरार झाला होता.

  • 09 Oct 2025 03:40 PM (IST)

    सुनंदा पवार यांनी गुंड निलेश घायवळ यांचे कौतूक करतानाचा व्हिडीओ व्हायरल

    गुंड निलेश घायवळ यांचे कौतूक करतानाचा रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कोविड काळात निलेश घायवळ यांनी शाळेला केलेल्या मदतीचे सुनंदा पवार यांच्याकडून कौतुक करण्यात आले आहे. कोविड काळातला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • 09 Oct 2025 03:25 PM (IST)

    माणिकराव व्हिडिओ प्रकरणात रोहित पवार यांची चौकशी – वकील

    विधिमंडळातील माणिकरावांचा व्हिडिओ कोणी काढला या संदर्भात पोलिसांकडून सखोल तपास होणार आहे. पोलिसांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचा दिल्या सूचना आहे. माणिकराव कोकाटे रम्मी व्हिडिओ प्रकरणी पोलिसांच्या चौकशी दरम्यान रोहित पवारांची देखील चौकशी होण्याची शक्यता असल्याचे कोकाटे यांचे वकील ॲड. मनोज पिंगळे यांनी म्हटले आहे.

  • 09 Oct 2025 03:13 PM (IST)

    गुळ पावडर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीसाठी अजित पवार यांचा विरोध – व्यंकटराव गुंड

    गुळ पावडर कारखान्यांना इथेनॉल निर्मिती करण्यासाठी अजित पवार यांनी विरोध केल्याचा आरोप धाराशिव जिल्ह्यातील गुळ पावडर कारखानदार आणि भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य व्यंकटराव गुंड यांनी केला आहे. धाराशिव जिल्ह्यात राज्य सरकार आणि गुळ पावडर कारखानदाराच्या वादामध्ये शेतकऱ्यांना फटका बसत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

  • 09 Oct 2025 03:00 PM (IST)

    खासदार निलेश लंके वकील राकेश किशोरच्या घरी संविधानाची प्रत देण्यासाठी दाखल

    खासदार निलेश लंके वकील राकेश किशोरला संविधानाची प्रत देण्यासाठी त्यांच्या घरी दाखल झाले आहेत.सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी 71 वर्षीय वकिला राकेश किशोर यांनी थेट सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार केला होता. या घटनेचा देशभरातून निषेध केला जात आहे. त्याच वकीलाच्या घरी निलेश लंके संविधानाची प्रत घेऊन दाखल झाले आहेत.

  • 09 Oct 2025 02:45 PM (IST)

    गुन्हेगारी प्रवृत्तीला पुढे आणण्याचं काम करणार नाही : योगेश कदम

    गुंड निलेश घायवळच्या भावाला शस्त्रपरवाना मिळण्यासाठी योगेश कदम यांनी शिफारसपत्र दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यावर आता योगेश कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘परवाना पोलीस आयुक्तांच्या सहीनंच मिळतं. गुन्हेगारी प्रवृत्तीला पुढे आणण्याचं काम करणार नाही’ असं म्हणत योगेश कदम यांनी विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे.

     

  • 09 Oct 2025 02:25 PM (IST)

    उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांना योगेशचा राजीनामा हवा आहे : रामदास कदम

    रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. “अनिल परब आमच्या कुटुंबाची बदनामी करत आहेत.  उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांना योगेशचा राजीनामा हवा आहे . संजय कदम आणि अनिल परब यांनी आम्हाला लुटलं आहे.” असं परब यांनी म्हटलं आहे.

  • 09 Oct 2025 02:09 PM (IST)

    बाळासाहेब आमचे दैवत, त्यांची बदनामी करणार नाही : रामदास कदम

    ‘बाळासाहेबांबद्दल फक्त संशय व्यक्त केला होता.बाळासाहेब आमचे दैवत आहेत. त्यांची बदनामी होईल असं काहीही करणार नाही’ असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

  • 09 Oct 2025 01:58 PM (IST)

    दि बा पाटील नव्हे मोदी आंतरराष्ट्रीय विमानतळ

    नवी मुंबई विमानतळाचे नाव दि बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ न ठेवता ते नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्याचा डाव असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. भाजप आणि गौतम अदानी यांचे तसे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. भूमिपूत्राचे नाव डावलले जाणार असल्याचा आरोप त्यांनी केला.

  • 09 Oct 2025 01:50 PM (IST)

    भास्कर जाधव यांची योगेश कदम रामदास कदम कुटुंबीयांवर टीका

    गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या निर्णयावर भास्कर जाधव यांनी हल्लाबोल केला. पुणे पोलिसांनी एका गुंडाचा रिवॉल्वर परवाना नाकारला होता.मात्र गृहराज्यमंत्री व शिंदे शिवसेनेचे नेते योगेश कदम यांनी आपल्या विशेष अधिकाराचा वापर करून तोच परवाना मंजूर केला. या निर्णयावर आमदार भास्कर जाधव आक्रमक झाले. “कदम कुटुंबीय छम-छम बारवाले आहेत. बारमधून पैसा कमावणाऱ्यांना ना संस्कार आहेत, ना नीतिमत्ता,” अशी टीका जाधवांनी केली. “गुंडांना लायसन्स देणं, हेच त्यांना शोभून दिसणारं आहे,” असे जाधव म्हणाले.

  • 09 Oct 2025 01:40 PM (IST)

    पोलिस विभागाच्या अहवालानुसारच शस्त्र परवाना-योगेश कदम

    शिक्षक व व्यावसायिक सचिन घायवळ यांनी माझ्याकडे केलेल्या शस्त्र परवाना अपील प्रकरणात, पोलिस विभागाकडून आलेल्या अहवालानुसार, सुनावणीच्या दिवशीपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते, त्यामुळे त्यांना शस्त्र परवाना देण्यात आला आहे , असे स्पष्टीकरण गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम यांनी ट्विटद्वारे केले आहे.

    गृह राज्यमंत्री म्हणाले, उपलब्ध कागदपत्रे आणि मा. न्यायालयाच्या न्यायनिर्णयाने निर्दोष मुक्त केल्याच्या आदेशाचे अवलोकन करून, नियमानुसार सदर प्रकरणात आवश्यक ती कार्यवाही करण्यात आलेली आहे. म्हणूनच, सध्या चर्चेत असलेल्या अन्य प्रकरणाशी अपीलासंदर्भात माझ्या नियमानुसार केलेल्या कारवाईला जोडणे हे पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहे.

  • 09 Oct 2025 01:30 PM (IST)

    रडता कशाला, चौकशी करा -अनिल परब

    बाळासाहेबांच्या नावाने शिवसेना चाललीय. उद्धव ठाकरे बाळसााहेबांचे पूत्र म्हणून ओळखले जातात. म्हणून बाळासाहेबांचे नाव डॅमेज करायचे आहे. सीबीआयची चौकशी मागावी. चौकशी व्हावी. माझ्यावर जे आरोप आहेत. ते इलेक्शन अॅफिडेव्हिट वाचलंय. मुलगा होम मिनिस्टर आहे. रडता कशाला. चौकशी करा असे खुलं आवाहन उद्धव सेनेचे नेते अनिल परब यांनी दिले. घर खाली केली म्हणतात, तिथे जाऊन विचारा. मी तिथे कधी गेलो का. ८ हजार लोकांना बेघर केलं. तिथे तेवढी वस्ती तरी आहे का. त्यांना कोण माहिती पुरवतं हे माहीत आहे, असा टोलाही परब यांनी लगावला.

  • 09 Oct 2025 01:20 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांना सांगतो वेळीच कारवाई करा -अनिल परब

    मी पर्सनल टीका केली नाही. त्यांच्या मुलाने मंत्री म्हणून वाळू चोरली, ही पर्सनल टीका आहे. गृहराज्यमंत्र्याच्या आईच्या नावाने डान्सबार चालतो. मुली नाचवल्या जातात. तीनदा रेड होते. त्याचा एफआयआर आहे. ही पर्सनल टीका आहे? असा सवाल नेते अनिल परब यांनी केला. त्यांच्या पत्नीच्या जळीत प्रकरणात मी चौकशीची मागणी केली. त्यांनी बाळासाहेबांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केली. तशीच माझी मागणी आहे. त्यांना बाळासाहेबांचं मृत्यू प्रकरण जाणून घेण्याची इच्छा आहे. तसेच त्यांच्या पत्नीच्या जळीत प्रकरणाची माहिती जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. त्यात पर्सनल काय? बाजूला बसून पत्नीला किती दम दिला असेल माहीत नाही. बाजूला बसून दम दिला म्हणून गोष्ट सिद्ध होत नाही. ती कोर्टात सिद्ध झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांना सांगतो वेळीच कारवाई करा. कोर्टाचे ताशेरे आल्यानंतर कारवाई करण्यात अर्थ नाही, असा इशारा परब यांनी दिला.

  • 09 Oct 2025 01:10 PM (IST)

    बाळासाहेबांनाही हे लोक व्हिलन बनवायला लागले आहेत

    बाळासाहेबांनाही हे लोक व्हिलन बनवायला लागले आहेत असा आरोप उद्धव सेनेचे नेते अनिल परब यांनी रामदास कदम यांच्यावर केला आहे. मृत्यूनंतर हाताचे ठसे उद्धव ठाकरेंनी घेतले हे चित्र तयार त्यांना तयार करायचं आहे. याचा अर्थ काय होतो माहीत आहे का. याचा अर्थ असा होतो की बाळासाहेबांचे पैसे स्विस बँकेत होते. तुम्हाला असं म्हणायचं बाळासाहेबांचे पैसे स्विस बँकेत होते. सांगावं. त्यांचं अकाऊंट नसेल तर ठसे कशाला हवं. हे हळूहळू बाळासाहेबांचं नाव पुसायला निघाले आहेत. बाळासाहेबांचे पैसे स्विस बँकेत होते आणि ठश्यांशिवाय अकाऊंट उघडू शकत नाही असं यांना भासवायचं आहे. आरोपाचा मतितार्थ असा आहे. बाळासाहेबांचं अकाऊंट स्विस बँकेत आहे असं त्यांना सांगायचंय. अकाऊंट नसेल तर ठश्यांचं काय करणार. उद्धव ठाकरे ठसे कशाला घेतील. यांना बाळासाहेबांचं नाव हळूहळू कमी करायचे आहे, असे मत परब यांनी मांडले.

  • 09 Oct 2025 01:00 PM (IST)

    माझी पुन्हा चौकशी करा -अनिल परब

    रामदास कदम यांची अक्कल किती आहे, ती त्या दिवशी दिसली. त्यांनी जे शपथपत्र दिलं ते माझ्या इलेक्शनचं शपथपत्र आहे. त्यात मी गाड्या कशा घेतल्या त्याचा उल्लेख आहे. एखाद्या बिल्डरने गाडी दिली असेल तर मी शपथपत्रात लिहू शकतो का. माझं तर साधं मत आहे. सरकार त्यांचं आहे. त्यांचा मुलगा गृहराज्यमंत्री आहे. चौकशी करा ना. माझ्याकडे गाड्या कुठून आल्या त्या. दोन मर्सिडीज आहेत. माझा धंदा आहे. त्यावर मी काय करू शकतो. ईडी आणि इन्कम टॅक्सने चौकशी केली आहे. रामदास कदम कोण आहे. मला विचारणारा. मला विचारण्याचा अधिकार ईडी आणि इन्कम टॅक्सला आहे. माझ्या चौकशीचा अहवाल काढा. पुन्हा ईडी चौकशी करा असे आवाहन उद्धव सेनेचे नेते अनिल परब यांनी दिले.

  • 09 Oct 2025 12:55 PM (IST)

    रामदास कदम यांची अक्कल किती आहे, ती त्या दिवशी दिसली- अनिल परब

    रामदास कदम यांची अक्कल किती आहे, ती त्या दिवशी दिसली. त्यांनी जे शपथपत्र दिलं ते माझ्या इलेक्शनचं शपथपत्र आहे. त्यात मी गाड्या कशा घेतल्या त्याचा उल्लेख आहे. एखाद्या बिल्डरने गाडी दिली असेल तर मी शपथपत्रात लिहू शकतो का, असा सवाल अनिल परबांनी केला.

  • 09 Oct 2025 12:49 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली नाही तर थेट लोकायुक्तांकडे तक्रार- अनिल परब

    यांची डान्सबार, वाळूचोरी आणि ही प्रकरणं मी लोकायुक्तांकडे घेऊन जाणार आहे. कोर्टात घेऊन जाणार आहे. पहिली संधी मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे. कोर्टाने चूक दुरुस्त करावी. अन्यथा मला कोर्टात जाण्यावाचून पर्याय राहणार नाही, असा इशारा अनिल परबांनी दिला.

  • 09 Oct 2025 12:39 PM (IST)

    बाळासाहेबांचे पैसे स्विस बँकेत होतं असं म्हणायचं आहे का? अनिल परबांचा सवाल

    “माझ्याकडे गाड्या कुठून आल्या, त्याची चौकशी करा. तुमचं सरकार आहे ना, मग करा माझी चौकशी. योगेश कदमांनी किती शस्त्रपरवाना दिले, याची माहिती मागतोय. बाळासाहेबांचे पैसे स्विस बँकेत होतं असं म्हणायचं आहे का? यांना बाळासाहेबांचं नाव डॅमेज करायचं आहे,” असं अनिल परब म्हणाले.

  • 09 Oct 2025 12:36 PM (IST)

    शस्त्रपरवाना नाकारणारे पोलीस मूर्ख आहेत का?- अनिल परब

    “पोलिसांनी शस्त्रपरवाना नाकारला होता. शस्त्रपरवाना नाकारणारे पोलीस मूर्ख आहेत का? योगेश कदमांनी आतापर्यंत किती परवाने दिले? योगेश कदम खुर्चीचा अपमान करत आहेत. याप्रकरणा शिवसेना म्हणून आम्ही रस्त्यावर उतरणार”, असं अनिल परबांनी स्पष्ट केलं.

  • 09 Oct 2025 12:26 PM (IST)

    योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अनिल परबांची मागणी

    योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा. मुख्यमंत्र्यांची काय अडचण आहे, मला माहीत नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची यासंदर्भात मी भेट घेणार आहे. योगेश कदमांसारख्या लोकांना कधीपर्यंत पाठिशी घालणार, असा सवाल अनिल परबांनी पत्रकार परिषदेत केला.

  • 09 Oct 2025 12:21 PM (IST)

    गृहराज्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात थैमान घातलंय- अनिल परब

    “गृहराज्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात थैमान घातलंय. लाखो रुपये आले कुठून? मोदींच्या राज्यात दोन लाखांच्या पुढे कॅश घेऊन जाण्याची परवानगी नाही. दोन लाखांच्यावर कॅश न्यायची असेल तर बँकेचं सर्टिफिकेट लागतं आणि यांनी म्हटलंय मला लाखो रुपयांची कॅश द्यावी लागते,” असं अनिल परब म्हणाले.

  • 09 Oct 2025 12:17 PM (IST)

    पुराव्याअभावी सुटका म्हणजे निर्दोष मुक्तता नाही- अनिल परब

    “पुराव्याअभावी सुटका म्हणजे निर्दोष मुक्तता नाही. सचिन घायवळवर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी यांसारखे गुन्हे आहेत. गुंड घायवळ सरकारच्या हातावर तुरी देऊन पळून गेला,” अशी टीका अनिल परबांनी केली.

  • 09 Oct 2025 12:14 PM (IST)

    पुण्यातील गँगवॉरला सरकारचं पाठबळ, अनिल परबांचा मोठा आरोप

    “पुण्यातील गँगवॉरला सरकारचं पाठबळ आहे. निलेश घायवळचे गुंड थैमान घालतात. सर्व तपासणी करून शस्त्रपरवाना दिला जातो. सचिन घायवळला योगेश कदमांनी शस्त्रपरवाना मंजूर करून दिला. पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गँगवॉर सुरू आहे,” असा आरोप अनिल परबांनी केला.

  • 09 Oct 2025 12:12 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांनी योगेश कदमांना पाठिशी घातलं- अनिल परब

    “मुख्यमंत्र्यांनी गृहराज्यमंत्र्यांना पाठिशी घातलं. योगेश कदमांचे अनेक कारनामे समोर आणलेत. योगेश मी तुझ्या पाठिशी असल्याचं शिंदेंनी म्हटलं होतं. पुणे जिल्ह्यात मोठा गँगवॉर सुरू आहे. पुण्यात 70 गँग्स कार्यान्वित आहेत,” असं अनिल परब म्हणाले.

  • 09 Oct 2025 12:07 PM (IST)

    अहिल्यानगरमध्ये असदुद्दीन ओवेसींची आज सभा

    अहिल्यानगरमध्ये असदुद्दीन ओवेसींची आज सभा होणार आहे. सभास्थळी सीसीटीव्हीची करडी नजर असेल. स्टेज आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा पार पडणार आहे. सभेला पोलिसांनी अटी आणि शर्ती घालून परवानगी दिली.

     

  • 09 Oct 2025 11:57 AM (IST)

    कल्याण – धक्कादायक घटना, APMC मार्केट परिसरात गटारात सापडला मृतदेह

    कल्याणमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. येथील APMC मार्केट परिसरात गटारात नग्न अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. दगडाने ठेचून इसमाची हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत असून बाजारपेठ पोलीस घटना स्थळी दाखल झाले आहेत. पोलीसांकडून तपास सुरू.

  • 09 Oct 2025 11:46 AM (IST)

    सोलापूर – महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंता आणि अधिकारी संयुक्त कृती समितीच्यावतीने 3दिवसाचा संप

    सोलापूर –  महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंता आणि अधिकारी संयुक्त कृती समितीच्यावतीने 3दिवसाचा संप.  राज्यभरात विद्युत विभागातील विविध संघटनानी एकत्रित येतं संप पुकारला आहे.  या संपाला सोलापुरातील विद्युत कर्मचारी, अभियंते आणि अधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे. सोलापुरातील महावितरण अधिक्षक अभियंता कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु आहे.

  • 09 Oct 2025 11:24 AM (IST)

    बीड – सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी 28 ऑक्टोबरला

    बीड – सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी 28 ऑक्टोबर रोजी होणार आहे.  आज महत्त्वाच्या अर्जावर ऑर्डर होण्याची शक्यता आहे.  वाल्मीक कराड व विष्णू चाटे वगळता 03 ते 07 आरोपीच्या दोष मुक्ती अर्जावर आज दिवसभरात कोर्टाकडून ऑर्डर येण्याची शक्यता आहे. तसेच वाल्मीक कराडसह इतर आरोपींच्या संपत्ती जप्तीवरही आदेश होऊ शकतो.

  • 09 Oct 2025 11:18 AM (IST)

    कण मध्ये होत असलेल्या वाहतुक कोंडी साठी PMRDA वर धडक मोर्चा

    चाकण मध्ये होत असलेल्या वाहतुक कोंडी साठी PMRDA वर धडक मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये “चाकणचं ट्रॅफिक मस्त आहे आणि इथल्या लोकांचे मरण स्वस्त आहे” हे गाणे गाजत आहे .  स्थानिक नागरिकांच्या सोबतच कंपनी मधील कामगारांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय.

  • 09 Oct 2025 11:05 AM (IST)

    जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात तब्बल अडीच हजारांची वाढ

    जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात तब्बल अडीच हजार रुपयांनी वाढ झाली असून चांदीच्या दराने नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे.  जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच चांदीचे दर विना जीएसटी 1 लाख 55 हजार रुपयांवर पोहोचले आहेत.  सोन्याच्या दरात देखील 500 रुपयांनी वाढ झाली असून सोन्याचे दर विना जीएसटी 1 लाख 23 हजार रुपयांवर पोहोचले.

  • 09 Oct 2025 10:54 AM (IST)

    चाकण परिसरात 2 वर्षांत 1700 अपघात, 7000 लोक बेघर

    पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण ते नाशिकफाटा दरम्यानची वाहतूक कोंडी आता अपघातांचे केंद्र बनली आहे. गेल्या दोन वर्षांत चाकण परिसरात तब्बल १७०० अपघात झाले असून, या अपघातांमुळे ७००० लोक बेघर झाले आहेत, तर अनेकांना आपले अवयव गमवावे लागले आहेत. या भागातील नागरिकांना गेल्या २० वर्षांपासून वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे २०१५ मध्ये PMRDA (पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) ची स्थापना होऊनही कोणतीही ठोस सुविधा उपलब्ध झालेली नाही. PMRDA ने वेळेत काम केले असते तर ही समस्या आली नसती, अशी तीव्र भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. कागदावर असलेले अनेक रस्ते प्रत्यक्षात आले नसल्याने शालेय विद्यार्थी, डॉक्टर, कामगार वर्ग आणि स्थानिक नागरिक यांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे, मात्र शासनाचे या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत आहे.

  • 09 Oct 2025 10:39 AM (IST)

    योगेश कदम यांनी गृहराज्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, सुषमा अंधारेंची मागणी

    कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शस्त्र परवाना दिल्यावरून तीव्र टीका होत आहे. पोलिसांनी गंभीर गुन्हे खुनाचा प्रयत्न आणि मोक्कासारखे कलम दाखल असलेल्या व्यक्तीला परवाना देऊ नये असा अहवाल दिला आहे. पण योगेश कदम यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत हा विशेष परवाना दिला. त्यांनी एका गुंडाला बळ पुरवले. या कृतीमुळे कदम यांना गृहराज्यमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे

  • 09 Oct 2025 10:29 AM (IST)

    वसई-विरारमध्ये FDA ची औषध तपासणी मोहीम

    वसई-विरार शहरात मध्यप्रदेशातील बालमृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाने मोठी तपासणी मोहीम सुरू केली आहे. शहरातील शासकीय, निमशासकीय आणि खासगी रुग्णालयातील औषधसाठा तपासला जात आहे. विशेषतः लहान मुलांच्या सिरप औषधांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवले जात आहेत.  या मोहिमेदरम्यान, मेडिकल स्टोअरमध्ये फार्मासिस्टशिवाय अन्य व्यक्ती सिरपची विक्री करत आहेत का, याची तपासणी केली जात आहे. तसेच, सिरप उत्पादक कंपन्यांची तपासणी करणे आणि औषधांच्या आवक-जावक रजिस्टरची कसून तपासणी करणे, यावरही FDA भर देत आहे. लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या औषधांची गुणवत्ता व विक्री नियमांनुसार होत आहे की नाही, हे सुनिश्चित करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.

  • 09 Oct 2025 10:18 AM (IST)

    बँक ऑफ महाराष्ट्रचा भोंगळ कारभार; शेतकऱ्याच्या खात्यातून ४ लाखांचा चेक चोरीला

    बार्शीतील शेतकरी उत्तम दत्तात्रय जाधव यांच्यासोबत बँक ऑफ महाराष्ट्रच्या भोंगळ कारभाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोयाबीनच्या बिलापोटी मिळालेला ४ लाख रुपयांचा चेक त्यांनी बँकेत भरला होता, मात्र तो चोरीला गेला आणि नंतर एका अनोळखी व्यक्तीने तो वटवला देखील. सुरुवातीला बँकेने चेक जमा केला नसल्याचा कांगावा केला, पण सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर आपली चूक मान्य केली. ही घटना घडल्यापासून सात-आठ दिवस उलटले तरी बँक अधिकारी फक्त चौकशी सुरू असल्याचे कारण देत शेतकऱ्याला पैसे देण्यास टाळाटाळ करत आहेत. चोरीला गेलेला आणि वटवलेला ४ लाखांचा चेक स्वतःच्या खात्यावर जमा न झाल्याने संतप्त झालेल्या उत्तम जाधव यांनी अखेर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

  • 09 Oct 2025 10:08 AM (IST)

    नाशिकमध्ये अल्पवयीन गुन्हेगारी रोखण्यासाठी मोफत समुपदेशन केंद्र

    नाशिक शहरात अल्पवयीन मुलांची गुन्हेगारी वाढू लागल्याने, या समस्येवर मात करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. वृशीनीत सौदागर यांनी पुढाकार घेतला आहे. उद्यापासून शहरात मोफत समुपदेशन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. विशेषतः अल्पवयीन मुलांसाठी नो मोबाईल अभियान देखील राबवले जाईल. गुन्हेगारीच्या मार्गावर गेलेल्या किंवा जाण्याची शक्यता असलेल्या मुलांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

  • 09 Oct 2025 10:00 AM (IST)

    उपायुक्त शंकर पाटोळे लाच प्रकरणात न्यायालयीन कोठडीत

    ठाणे महानगरपालिका उपायुक्त शंकर पाटोळे लाच प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत. ठाणे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस एस शिंदे काल मध्ये सुट्टीवर गेल्याने तिघांच्या जामीन अर्जावरील सुनावणी काल होऊ शकली नाही..

     

  • 09 Oct 2025 09:50 AM (IST)

    वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील कार अपघात हा एक एक्सीडेंट

    वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील कार अपघात हा एक एक्सीडेंट आहे. रेस अँड ड्राईव्हचे प्रकरण नाही. अपघातग्रस्त कार मालक मीरा रोड येथील रहिवासी आहे आणि तो एका व्यावसायिकाचा मुलगा आहे, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेत कोणीही सहभागी नव्हते आणि इतर कोणतेही वाहनही सामील नव्हते. आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

  • 09 Oct 2025 09:40 AM (IST)

    मुंबईच्या आजाद मैदानावर कुणबी समाजाचा ओबीसी एल्गार मोर्चा

    सकाळपासून शेकडो कुणबी कार्यकर्ते उपस्थित, डोक्यात ‘जय कुणबी’ गांधी टोपी, हातात निषेधाचे पोस्टर.मुख्य मागणी: मराठा समाजाच्या कुणबी किंवा मराठा-कुणबी नोंदींवर सरकारचा कट, त्वरित मागे घ्या. मराठा समाज ओबीसीत समाविष्ट होऊ नये, ५८ लाख नोंदी तात्काळ रद्द.

     

  • 09 Oct 2025 09:20 AM (IST)

    Pune- आकुर्डी येथील कार्यालयावर धडक मोर्चा

    पुण्याच्या चाकण औद्याेगिक पट्ट्यासह चाकण परिसरातील वाहतूक कोंडी, खराब रस्ते, कचरा प्रश्न, एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधांचा अभाव आदी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी चाकण कृती समितीतर्फे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आकुर्डी येथील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येत आहे.

  • 09 Oct 2025 09:10 AM (IST)

    धक्कादायक प्रियकरासोबत मिळून आईनेच केली प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या आपल्या मुलाची हत्या

    अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील धक्कादायक घटना. आरोपी आई व तिच्या प्रियकराला पोलिसांनी केली अटक..प्रेम संबधाची कुरकुर मुलाला लागल्याने आपल्या मुलाची केली हत्या..

  • 09 Oct 2025 09:00 AM (IST)

    आकुर्डी येथील कार्यालयावर धडक मोर्चा

    पुण्याच्या चाकण औद्योगिक पट्ट्यासह चाकण परिसरातील वाहतूक कोंडी, खराब रस्ते, कचरा प्रश्न, एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधांचा अभाव आदी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी चाकण कृती समितीतर्फे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आकुर्डी येथील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येत आहे

  • 09 Oct 2025 08:40 AM (IST)

    लाडक्या बहिणींसाठी पुन्हा सामाजिक न्याय विभागाच्या निधीवर डल्ला

    दरम्यान याच सप्टेंबर महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या 410.30 कोटींच्या निधीवर डल्ला मारण्यात आला असून ते पैसे आता लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्यात येणार आहेत. महिला व बालविकास विभागाने हा निधी अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थ्यांसाठी वापरण्यात यावा यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र यामुळे नवा वाद पेटू शकतो.

  • 09 Oct 2025 08:38 AM (IST)

    जालना जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे संथ गतीने

    जालना जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे संथ गतीने. 3 आठवड्यात केवळ 48% पंचनामे झाले पूर्ण. 4 लाख 23 हजार 32 हेक्टर क्षेत्रापैकी केवळ 2 लाख 5 हजार 772 हेक्टर वरील पंचनामे झाले. नुकसानीच्या पंचनाम्यात जालना तालुका अव्वल तर परतुर तालुका सर्व खाली. नुकसानीच्या पंचनाम्याचा एकाही तालुक्याचा अंतिम अहवाल प्राप्त झाला नसल्याने शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहण्याची धास्ती. 10 दिवसात 100 टक्के पंचनामे पूर्ण करून अहवाल देण्याचं जिल्हा प्रशासनासमोर आव्हान. पीक अनुदान वाटपात यापूर्वी अपहार झाला, त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून दक्षताही घेण्यात येत असल्याचं जिल्हा प्रशासनाकडून आलं सांगण्यात.

  • 09 Oct 2025 08:11 AM (IST)

    बॉल इमारतीत गेला म्हणून दोन लहान मुलांना बेदम मारहाण, डोंबिवलीतील घटना

    डोंबिवलीच्या हाय-प्रोफाईल सोसायटीत क्रूरता. बॉल इमारतीत गेला म्हणून दोन लहान मुलांचे हात बांधून त्यांना बेदम मारहाण. सुरक्षा रक्षकाची पालकांसोबतही मुजोरी. मारहाण करणारा सुरक्षा रक्षक राजेंद्र खंदारे मानपाडा पोलिसांच्या ताब्यात.तपास सुरु आहे.