
महाराष्ट्रात मान्सून बारा दिवस आधीच पोहचला आहे. त्याचवेळी राज्यातील अनेक भागांत मान्सूनपूर्व पाऊस सुरु आहे. पुणे आणि मुंबईत प्रचंड पाऊस झाला आहे. बारामतीमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सकाळीच बारामती तालुक्यातील नुकसानीची पाहणी केली. सोमवारी राज्यातील सहा जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. पाऊस चांगला झाला असला तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. सोलापूरमधील माळशिरसमध्ये कुरुबावी गावात पुरात अडकलेल्या सहा जणांना एनडीआरएफने वाचवले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आज नागपूर दौरा आहे. सकाळी ११ वाजता अमित शहा यांच्या हस्ते नॅशनल कँसर इंस्टिट्यूटमधील स्वस्तिक भवनचे भुमिपूजन होणार आहे. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा..
नवी मुंबईत सकाळपासून मुसळधार पावसामुळे हजेरी लावली आहे. संपूर्ण बेलापूर बस डेपो हा पाण्याखाली गेलेला आहे, बस सेवा रद्द करण्यात आलीय. नवी मुबंईकराना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बस डेपोत पाणी शिरल्याने बस सेवा खंडीत झाल्याची माहिती मिळत आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाचा शिरकाव
कल्याणमध्ये कोरोनाने एका महिलेचा मृत्यू, तर चार रुग्णावर उपचार सुरू
दोन रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु, तर एकाला कळवा रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल
विरारमध्ये स्लॅबचे प्लॅस्टर डोक्यावर पडल्याने 30 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. लक्ष्मी राजू सिंग असं मृत महिलेचं नाव आहे. गोपचरपाडा परिसरात असलेल्या पूजा अपार्टमेंटमध्ये रूम नंबर 335 मध्ये दुपारी 3 वाजता ही दुर्दैवी घटना घडली आहे.लक्ष्मी सिंग या आपल्या दोन मुलांसह झोपल्या होत्या. तेव्हा ही घटना घडली. या दुर्घटनेत लक्ष्मी यांचा दुर्देवी अंत झाला. मात्र दोन्ही मुले सुदैवाने थोडक्यात बचावली.
वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी मयत महिलेसह तिच्या मुलांना बाहेर काढलं. पूजा अपार्टमेंट ही इमारत 30 वर्षे जुनी होती. त्यामुळे वसई विरार मधील अतिधोकादायक इमारतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.
मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस सुरु आहे. या जोरदार पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामन्यांना ऑफीसमध्ये पोहचायला विलंब झाला. आता परतीच्या प्रवासाची वेळ झालेली असताना पुन्हा एकदा मध्य रेल्वेची वाहतूक 20-25 मिनिटं उशिराने असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे दादर आणि इतर प्रमुख स्थानकांवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे.
मुंबईत गेल्या काही तासांपासून जोरदार पाऊस बरसतोय. अशात अनेक ठिकाणी पाणी साचलंय. पावसामुळे लोकल रेल्वे सेवा उशीराने धावत आहे. मुंबईतील अनेक भागात अनेक घटना घडल्या आहेत. अशात पालकमंत्री आशिष शेलार यांच्याकडून मुंबईतील स्थितीचा आढावा घेतला जात आहे.मुंबईतील पूर परिस्थितीत, धोकादायक ठिकाण आणि इमारती यांचा आढावा घेतला जात आहे.
पुण्यातीप खेडमधून बातमी समोर आली आहे. मासेमारी करणाऱ्या युवकांच्या अंगावर वीज पडल्याने जागीच मृत्यू झआा आहे. खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणाच्या कडेला पाईट येथे ही घटना घडली. संतोष गुलाब खांडवे असे वीज पडून मृत्यू झालेल्या युवकाचं नाव आहे.
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी त्यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव याला पक्ष आणि कुटुंबातून काढून टाकले आहे. तेज प्रताप यांच्या फेसबुक पोस्टवरून ते अनुष्का यादवसोबत 12 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे उघड झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, तेज प्रताप यांची पत्नी ऐश्वर्या राय यांनी टीव्ही 9 ला एक मोठा खुलासा केला आहे. तो म्हणाला, ‘काढून टाकल्याची चर्चा फक्त नाटक आहे, कोणीही कोणालाही काढून टाकलेले नाही. जेव्हा मला मारले तेव्हा सामाजिक न्याय कुठे होता? ‘
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ (एनएफएसयू) कॅम्पसचे भूमिपूजन केले.
#WATCH | Nagpur, Maharashtra: Union Home Minister Amit Shah performs the Bhumi Pujan of National Forensic Sciences University (NFSU) campus in the presence of Maharashtra CM Devendra Fadnavis and Union Minister Nitin Gadkari. pic.twitter.com/vqJPIqdW0M
— ANI (@ANI) May 26, 2025
मुंबईतील शिवसेना (यूबीटी) नेते आनंद दुबे म्हणाले, “पावसाळा अद्याप पूर्णपणे आलेला नाही, परंतु थोड्याशा पावसाने मुंबई ज्या प्रकारे गोंधळली आहे ती दुर्दैवी आहे. मागील बीएमसी निवडणूक 2017 मध्ये झाली होती, आज आपण 2025मध्ये आहोत, महापौर नाही, स्थायी समितीही नाही, लोकसेवक नाहीत, फक्त अधिकारी त्यांच्या पदांवर बसले आहेत. आम्हाला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे की काही तासांच्या पावसानंतर रस्ते पाण्याखाली का जातात? केएम हॉस्पिटलच्या तळमजल्यावर पाणी शिरले आहे जिथे लहान मुले औषधांसाठी येतात, मुंबईकरांना इतक्या समस्यांना तोंड द्यावे लागत असेल पण त्याबद्दल कोणीही बोलण्यास तयार नाही.”
हवामान विभागाने (IMD) राज्यातील मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी येथे मुसळधार पावसाबाबत रेड अलर्ट जारी केला आहे.
रायगड जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या मुसळधार अवकाळी पावसामुळे अंबा नदीची पाणीपातळी 9.4 मीटरवर पोहोचली आहे. सामान्यतः ही पातळी मान्सून काळात पाहायला मिळते, मात्र यंदा अवकाळी पावसामुळेच अशी स्थिती निर्माण झाली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकहुन मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांचा आढावा घेतला. राज ठाकरे नाशिकवरुन पुण्याला जाणार होते. मात्र दौरा अर्धवट सोडून ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
नागपूर – हैदराबाद महामार्गावरील जाम चौरस्त्यावर सोयाबीनने भरलेल्या ट्रकने पेट घेतला आहे. ट्रकला आग लागल्याने ट्रकसह सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बॅटरीमध्ये स्पार्किंग होऊन धूर निघाल्याने चालकाने ट्रक थांबवला होता. त्यानंतर लगेच ट्रकला आग लागली.
वरळीच्या भुयारी स्थानकात पावसाचं पाणी साचलं आहे. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. त्याबाबत आदित्य ठाकरेंनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे पाहणी करण्यासाठी आले असता आदित्य ठाकरेंनाही रोखण्यात आलं. प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “मुंबईत नालेसफाईचं काम झालेलं नाही. CM ऑफिस, नगरविकास खात्यातील यंत्रणा भ्रष्ट आहेत. 1 मे रोजी उद्घाटन झालं, आता आतही सोडत नाहीये. एकनाथ शिंदेनी काही काम केलं नाही. रस्ते खड्डेमुक्त केले नाही. त्यामुळे मुंबईत पावसाचं पाणी साठलं आहे.” असं म्हणत आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.
मुसळधार पावसामुळे मुंबईकर हैराण. पावसाचा मुंबईतील भुयारी मेट्रोलाही फटका. वरळीच्या भुयारी मेट्रो स्थानकात पाणी साचलं आहे. भुयारी स्थानकात पाणी शिरल्याने प्रवाशांची तारांबळ उडतेय.वरळी भुयारी मार्ग पाण्यात असून चिखल आणि पाण्यातून वाट काढताना नागरिकांना मात्र मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मुंबईला पावसाने चांगलंच झोडपलं आहे. मुबंईतील अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. मुंबईतील सारा सहारा मार्केटमध्ये पावसाचं पाणी साचलं आहे. त्यामुळ येथील नागरिकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसाच्या परिस्थितीचा व उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला दुपारी 2:00 वाजताच्या सुमारास भेट देणार आहेत.
चार दिवसाच्या विश्रांती नंतर आज सकाळ पासून रिमझिम पाऊस आणि धुक्याचा खेळ. जशी इगतपुरीची पावसाचे माहेरघर ओळख तशीच धुक्याचे शहर म्हणूनही ओळख. वाहनचालकांना आपल्या गाडीचे हेड लाईट लावून करावा लागतोय प्रवास.
सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे. सांगली शहरातल्या आयर्विन पूल या ठिकाणी पाण्याची पातळी आता 16 फुटांवर पोहचलेली आहे. सकाळपासून या पाण्याच्या पातळीमध्ये एक फुटाने वाढ झाली आहे. त्यामुळे कृष्णा व वारणा नदी दुथडी भरून वाहू लागलेली आहे.
अमित शाह यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक. फडणवीसांच्या संकल्पनेतून नागपुरात कॅन्सर इन्सि्टटयूट. सरकारने गरिबांसाठी 5 लाखापर्यंत उपचार मोफत केलेत. गेल्या 10 वर्षात आरोग्य क्षेत्रात सरकारने खूप काम केलय असं अमित शाह म्हणाले.
खेड-दापोली मार्गावरील पाताडी नदीला पूर आला असून पुराचं पाणी रस्त्यावर साचलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यालाही मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. तर फुरूस गावात नदीचं पाणी पात्राबाहेर आलंय. दापोली-खेड तालुक्याला जोडणारा मार्ग पाण्याखाली गेला आहे. दापोली-खेड मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली असून ही वाहतूक मंडणगड मार्गे वळवली आहे.
बदलापूर : मुसळधार पावसामुळे बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी शिरलंय. बदलापूर स्टेशन परिसरातील मुख्य बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी शिरलंय. व्यापाऱ्यांच्या कपडे आणि अन्य मालाचं नुकसान झालं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशकात दाखल झाले आहेत. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे आढावा बैठक घेणार आहेत. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी प्रमुख पदाधिकारी उपस्थित असतील.
पावसामुळे मध्य रेल्वे खोळंबली आहे. ठाणे ते सीएसएमटीकडे जाणारी जलद लोकल 40 मिनिटे उशिराने धावत आहे. ठाणे ते कल्याणकडे जाणारी जलद आणि धीमी लोकल 15 मिनिटे उशिराने धावत आहे. ठाणे रेल्वे स्थानकावर काही इंडिकेटर बंद असल्यामुळे रेल्वे प्रवाशांची तारांबळ उडत आहे.
मध्ये रेल्वे मार्गावरील सीएसएमटीकडे जाणारी स्लो लोकल सेवा ठप्प झाली आहे. सीएसएमटी ते भायखळादरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचलंय. तर पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. अंधेरी सब-वे पाण्याखाली गेला असून मुंबईसह उपनगरातील सखल भागात पाणी साचलं आहे.
मुंबईत पहाटेपासूनच मुसळधार पावसाच्या सरी कोसळत असून वांद्रे येथील कलानगर परिसरातील सखल भागांत पाणी साचू लागलं आहे. अनेक वाहनं बंद पडली आहेत.
माळशिरस तालुक्यातील पूर परिस्थितीची आमदार उत्तमराव जाणकारांनी पाहणी केली. पूरबाधित शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपयाची आर्थिक मदत करण्याची आमदार जानकर यांची मागणी तर पुराचं पाणी घरात जाऊन झालेल्या नुकसानग्रस्तांना एक लाख रुपयाची देण्याची मागणी करण्यात आली आहे.
मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई लोकलसेवा आता खोळंबली आहे. सीएसएमटी ते भायखळा या मार्गावरील रेल्वे रुळांवर पाणी साचलं असून त्यामुळे मध्य रेल्वेचं वेळापत्रक विस्कळीत झालं आहे.
कल्याण डोंबिवली परिसरात सकाळ पासून ढगाळ वातावरण असून अधून मधून रिमझिम पाऊस सुरु असून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दौंड तालुक्यात मुसळधार पावसाने रस्ताच गेला वाहून. पुणे – सोलापूर हायवेवरून चिंचोली, मालटण, राजेगांव, लोणारवाडी मार्गे दौंडला जाणारा रस्ता खचला असून दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली असून सायन किंगसर्कल परिसरर, तसेच हिंदमाता परिसरात पाणी साचलं आहे. पावसाचा परिणाम रेल्वे सेवेवरही दिसत असून लोकल उशीराने धावत आहेत.
दौंड तालुक्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीतील माती वाहून गेलीय… शेताचे बांध देखील फुटलेले आहेत तर विहीर गळाने गच्च भरलीय…
शेतकऱ्यांनी साठवलेले धान्य पूर्णतः भिजवून तसेच वाहून गेल्याचे पाहायला मिळतेय… धान्य तसेच गुरे देखील वाहून गेल्याचं पाहायला मिळतेय…
रविवारी झालेल्या पावसानं व्यापाऱ्यांना साठवून ठेवलेल्या कांद्याचे नुकसान झाले आहे. निवडण्यासाठी ठेवलेला कांदा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. व्यापाऱ्याच्या खळ्यात ठेवलेल्या कांद्याचे नुकसान झाले आहे.
मुंबई उपनगर सह ठाण्यात मोठ्या प्रमाणात ढग दाटून आलेत… पूर्णतः काळोख पसरला असून, विजांच्या कडकडाटसह रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे… घराबाहेर पडताना अनेक जण छत्री घेऊन बाहेर पडत आहे…. पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ उडणार आहे..
गेल्या पाच ते सहा दिवसापासून सांगली जिल्ह्यात पडत असलेल्या सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील येरळा नदी ही दुथडी भरून वाहत आहे. कडेगाव खानापूर आणि तासगाव तालुक्यातील वाहणाऱ्या या येरळा नदीचे पात्र पाण्याने पूर्ण भरले आहे.
राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. बारामतीमधील काटेवाडी परिसरात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भागातील नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली.
पुण्याच्या भीमाशंकर परिसरात रात्रभर पावसाची संततधार सुरू आहे. खेड तालुक्यातील पाभे गावाचा संपर्क तुटला आहे. रात्रभर पाऊस पडत असल्याने बंधारा पाण्याखाली गेला आहे. पहिल्या पावसातच भीमा नदीला पूर आहे.
मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर तळकोकणातसह कोकण, महाराष्ट्रामध्ये दाखल झाला आहे. सिंधुदुर्ग ,रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतो आहे.
पंढरपूरमधील नीरेच्या खोऱ्यात पडत असलेल्या दमदार पावसामुळे नीरा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. माळशिरस तालुक्यातील कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहे. माळशिरस तालुक्यातील माळीनगर येथील नीरा नदी काठावरील घरांमध्ये रात्री नीरा नदीचे पाणी शिरले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज आज नागपूर शहरात येत आहे. सकाळी ११ वाजता अमित शाह यांच्या हस्ते नॅशनल कँसर इंस्टिट्यूटमधील स्वस्तिक भवनचे भुमिपूजन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून नागपूरात नॅशनल कँन्सर इंस्टिट्यूट उभारले आहे.